Sunday, 18 February 2018

कथा - या वळणावर

या वळणावर

दोन दिवसांची रजा संपवून नेहा ऑफिसमध्ये आली. तिला आलेली बघून तिची कलिग सलोनी तिच्याजवळ येउन म्हणाली, "नेहा, सरांनी शेफालीचा प्रोजेक्ट ॲप्रूव्ह केला."
      "काय ? कसं शक्य आहे ? मी होल्डवर ठेवला होता तो प्रोजेक्ट. खूप चूका होत्या त्या प्रोजेक्टमध्ये. तस मी काही चुका रेक्टिफाय केल्या होत्या पण एवढ्या चुका असताना प्रोजेक्ट ॲप्रूव्ह कसा काय होवू शकतो तो ही माझ्या सहीशिवाय?  आणि प्रोजेक्टची डेडलाईन तर पुढच्या आठवड्यातली होती ना?" – नेहा.
 " तुला फोन केला होता सरांनी पण तुझा फोन 'आऊट ऑफ कव्हरेज' होता.क्लाएंटला  प्रोजेक्ट थोडा लवकर हवा होता. प्रोजेक्ट याच आठवड्यात मिळावा म्हणून क्लाएंटने  रिक्वेस्ट  केली आणि तनयाचा प्रोजेक्ट क्लाएंटला तितकासा आवडला नाही. मग सर म्हणाले की, नेहा आल्यावर शेफालीच्या प्रोजेक्टमध्ये आवश्यक ते बदल करेल. तसही क्लाएंटला हा प्रोजेक्ट आवडला आहे  तर हाच प्रोजेक्ट ॲप्रूव्ह करावा लागणार." सलोनी.
     "अग पण याला काय अर्थ आहे? याला प्रोफेशनॅलिझम नाही म्हणत. अर्जंट हवा होता मिन्स? डेडलाईन तर त्यांनीच ठरवली होती ना?" नेहा.
      शेफाली काही बोलणार इतक्यात सरांनी कॉल करुन नेहाला केबिनमध्ये बोलावलं. नेहा केबिनमध्ये गेली.
    "नेहा सॉरी, पण अर्जन्सी असल्यामुळे तुझ्या सहीशिवाय मी शेफालीचा प्रोजेक्ट ॲप्रूव्ह केला.  तुझी आजची सगळी कामं सलोनीला डेलीगेट कर. आजचा पूर्ण दिवस  क्लाएंट बरोबर कॉन्फरन्स रुममध्ये बसून शेफालीच्या प्रोजेक्टमधे असलेल्या मिस्टेक्स रेक्टिफाय करुन त्यात क्लाएंटच्या इच्छेनुसार आवश्यक ते बदल कर आणि प्रोजेक्ट फायनल कर.  क्लाएंटला  प्रोजेक्ट लवकर हवा आहे." सर
      खरतर नेहाला मनातून प्रचंड राग आला होता. पण तरीही शक्य तितकं शांत रहायचा प्रयत्न करत तिने 'ओके' म्हणून मान हलवली.
    "गुड! मीट अवर क्लाएंट  मिस्टर अनुप सरदेसाई." असं म्हणून सरांनी  समोर बसलेल्या क्लाएंटची ओळख करुन दिली.   
       सरांच्या केबिनमध्ये येताना नेहा इतकी  चिडलेली होती की तिला त्यांच्या केबिनमध्ये अजून कोणी  बसलं आहे  हे सुद्धा लक्षात आलं नाही. नेहाने  क्लाएंटकडे बघितल आणि समोर अनुपला बघून  तिला कसं रीॲक्ट व्हावं तेच कळल नाही. कितीतरी वर्षांनी ती अनुपला बघत होती.
  "हॅलो नेहा ?" अनुपच्या आवाजाने नेहा भानावर आली.  चेहऱ्यावर कसंबसं हसू आणत त्याला 'हॅलो' म्हणाली.
      नेहाने केबिनच्या बाहेर येउन शक्य तितकं नॉर्मल रहायचा प्रयत्न करत सलोनीला सगळी कामं समजावली. आज पूर्ण दिवस अनुपबरोबर घालवायचा या कल्पनेने ती काहीशी उदास झाली होती. तिला आठवलं; कॉलेजला असताना  याच अनुपचे तिच चांगल स्क्रिप्ट रिजेक्ट केलं होतं. पण आता जे आहे ते प्रोफेशनल रिलेशन आहे त्यामुळे शक्य तितकं प्रोफेशनली वागायचा प्रयत्न करायचा असा विचार करुन ती कॉन्फरन्स रुममध्ये  गेली.

      अनुप आणि नेहा एकाच कॉलेजमधले. अनुप नेहाला दोन वर्षांनी सिनिअर पण कॉलेजच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमूळे  दोघंही एकाच ग्रूपमध्ये होते.  कॉलेजचा कल्चरल ग्रूप सोडून या दोघांना जोडणारा अजून एक कॉमन धागा होता; तो म्हणजे विकास. नेहा विकासची बालपणापासूनची मैत्रीण तर विकास आणि अनुपची मैत्री कॉलेजमधली. अनुपची  नेहाशी ओळख झाली तिच मुळी  विकासची गर्लफ्रेंड म्हणून. अनुपचं विकास आणि नेहा दोघांबरोबरही छान जमत असे. विकासने अनुपला प्रत्येक गोष्टीत मदत केली होती. या नवीन शहरात विकासामुळेच अनुप चटकन रूळला होता.  दोघही एकदम खास मित्र बनले होते. नेहा आणि अनुपचही  एकमेकांशी छान पटायचं. त्या दोघांच्या आवडीनिवडीही बऱ्यापैकी कॉमन होत्या.  विकास शांत सिन्सिअर तर अनुप आणि नेहा एकदम त्याच्याविरुद्ध बिनधास्त, मस्तीखोर. विकास आणि नेहाच्या लुटूपुटूच्या भांडणात मात्र  नेहमीच अनुपचं सॅण्डविच होत असे. पण हे सारं तो छान एंजॉय करत असे.
     सगळं सुरळीत चालू असताना अचानक या तिघांच्याही मैत्रीला वेगळच वळण देणारी  एक घटना  ग्रूपच्या पावसाळी पिकनिकच्या दिवशी घडली. त्यानंतर मात्र अनुप नेहा आणि विकासापासून हळूहळू दुरावत गेला.

        "एस्क्युज मी सर मे आय कम इन?" , नेहाच्या आवाजाने  कॉन्फरन्स रुममध्ये विचारांच्या तंद्रीत हरवलेला अनुप भानावर आला.

  "ओह येस शुअर! टेक युअर सिट प्लीज. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होतोय"- अनुप.

 "इट्स ओके, डोंट माईंड प्लीज! आपण प्रोजेक्टवर वर्किंग सुरु करुया का?" अस म्हणत नेहा पुढे येउन त्याच्या समोरच्या चेअरवर बसली . 

       अनुपनेही मानेनेच होकार दिला. खरं तर अनुपला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं पण कुठून सुरुवात करायची हेच त्याला कळत नव्हतं. तो विचारात हरवलेला असतानाच नेहा त्याच्याकडे लॅपटॉप सरकावत म्हणाली, "खरं तर या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच चुका आहेत यातल्या काही चुका आणि त्यांची करेक्शन्स मी रजेवर जाण्यापूर्वी या फाईलमध्ये स्टोअर करुन ठेवल्या होत्या. उरलेल्या चूका कशा काय सुधारायच्या यावर  आपण नंतर चर्चा करुच पण तुम्ही आधी ही सजेशन्स तुम्हाला पटतात का ते बघाल का?" नेहाने शक्य तेवढं प्रोफेशनली बोलायचा प्रयत्न करत अनुपला विचारल.

     तिचं असं प्रोफेशनल वागणं बघून अनुप काहीसा निराश झाला. पण तरीही क्षणात स्वतःला सावरुन तो लॅपटॉपवरची फाईल  काळजीपूर्वक बघू  लागला. दोघांमध्ये बराच वेळ प्रोजेक्ट या विषयावरच चर्चा सुरु होती. दोघं चर्चेमध्ये इतके गढून गेले की,  तहान भूक कशाचच भान उरल नाही. अखेर संध्याकाळी साडेचारच्या सुमारास सगळं वर्किंग पूर्ण झालं. नेहाने अतिशय हुशारीने शेफालीच्या मूळ प्रोजेक्टला धक्का न लावता त्यातल्या त्रूटी दूर केल्या होत्या. तिची  हुशारी आणि कामाप्रतिचं डेडीकेशन बघून अनुप चांगलाच इंप्रेस झाला होता.  प्रोजेक्ट पुन्हा एकदा नजरेखालून घालत अनुप नेहाकडे बघत म्हणाला, 'परफेक्ट!' ...  हे ऐकून नेहाही रिलॅक्स झाली.

   "ओके, आता मी जाऊ शकते का?"नेहा.

     खरं तर  अनुपला मनातून तिला सांगावसं वाटत होतं; 'थांब ना थोडावेळ इतके वर्षांनी भेटलोय...' पण मनातलं सगळं मनातच ठेवून तो म्हणाला, "ओके थॅंक्स ॲंड सॉरी!"

       "इट्स ऑल राईट ॲंड आफ्टरऑल इट्स माय ड्युटी!" असं म्हणून नेहा जायला निघाली. तेवढ्यात अनुपने तिला विचारल, "तुझ्या मुलाला बरं नव्हतं असं कळलं कशी आहे त्याची तब्येत आता?"

"ठिक आहे, म्हणूनच आज ऑफिसला आले ना?" नेहा
"आणि विकास कसा आहे?"- अनुप

या प्रश्नावर नेहा क्षणभर स्तब्ध झाली. पण मग स्वतःला आणि डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना थांबवत ती म्हणाली, " विकास आता या जगात नाही, ही इज नो मोअर."

    तिचं उत्तर ऐकून अनुपला धक्का बसला. काय बोलायचं त्याला काहीच सुचत नव्हत. स्वतःला सावरुन तो नेहाला काही विचारणार तोपर्यंत नेहा निघून गेलेली होती. त्यानंतरही कितीतरी वेळ तो कॉन्फरन्स रुममध्ये तसाच बसून होता. "विकास आता या जगात नाही, ही इज नो मोअर...." नेहाचे हे  शब्द त्याच्या कानात गरम तेल ओतल्यासारखे घुमत होते. विकासच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले.

        कॉलेजला असताना दोघांनी मिळून केलेली  धम्माल; ते कल्चरल प्रोग्रॅम्स, रुमच्या कट्ट्यावर आणि विकासच्या घराच्या गच्चीत जागवलेल्या रात्री..... सगळं एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोर आलं. आणि त्यानंतरची पावसाळी पिकनिक ......  पावसाळी पिकनिक आठवली  आणि अनुप विकासच्या आठवणींमधून बाहेर आला.

     दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी अनुप विकासच्या घरी गेला. दार नेमकं नेहाने उघडल. नेहाला समोर बघून अनुप गोंधळला पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, "विकासच्या आई बाबांना  भेटायचं आहे."

    नेहाने त्याला आत बोलावून बसायला सांगितल. हॉलमध्ये भिंतीवर टांगलेला विकासचा फोटो बघून अनुपचे डोळे पाणावले. तो त्या फोटोसमोर गेला पण तेवढ्यात विकासचे बाबा बाहेर आले. त्यांना पाहून अनुपने चटकन पुढे होवून त्यांना नमस्कार करत अनुप म्हणाला, "काका मला ओळखलत? मी अनुप ... विकासचा मित्र .आम्ही कॉलेजला एकत्रच..... "

    "अरे हो.... ओळखलं तुला. तू तर गायबच झालास एकदम. कुठे होतास इतकी वर्ष?" विकासचे बाबा.

   "पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी म्हणून US ला गेलो आणि मग तिथेच नोकरी मिळाली. आत्ता दोन वर्षांपूर्वीच आई गेली. बाबा तिकडे यायला तयार नाहीत म्हणून मग मी  इकडे भारतात परत यायचा निर्णय घेतला. आता वर्षभरापूर्वीच इथे स्वतःचा छोटासा बिझनेस सुरु केला आहे. योगायोगाने ऑफिसच्या कामानिमित्त काल नेहाची भेट झाली आणि विकासाबद्दल कळलं. ते ऐकल्यावर मी सून्न झालो एकदम. काल रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. कसं झाल हे काका?" -अनुप.

    "नियतीच्या मर्जीपुढे कोणी जाऊ शकत नाही. साधासा ताप वाटला होता पण तपासण्या केल्यावर  डेंग्यू आणि मलेरिया दोन्ही एकदम झाल्याचं निदान झालं . दिड महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. पण .......बोलता बोलता विकासच्या बाबांचा कंठ दाटून आला.

   "काका मी समजू शकतो तुमचं  दु:ख. मी विकासची जागा नाही घेऊ शकत पण एक सांगतो, विकास नसला तरी मी आहे. कधीही कसलीही गरज लागली तर मला हक्काने सांगा." – अनुप.

      तेवढ्यात विकासची आई गरमागरम पोहे आणि चहा घेवून येते आणि अनुपला म्हणते, "तू आल्याचं कळलं आणि लगेच पोहे करायला घेतले. तू आणि विकास दोघांनाही माझ्या हातचे पोहे खूप आवडायचे. आठवतय का तुला तुमच्या दोघातं पैज लागायची कोण जास्त पोहे खातंय ...... बोलता बोलता विकासच्या आईचा स्वर कापरा झाला. नकळत अनुपचे डोळे पाणावले. तेवढ्यात  एक तीन साडेतीन वर्षांचा मुलगा  स्कूल ड्रेस घालून बाहेर आला आणि विकासच्या बाबांना बिलगला. हा नक्कीच विकासचा मुलगा असणार हे अनुपने  लगेच ओळखलं.

   "विहान, हा अनुप काका आहे तुझा कसा फ्रेंड आहे अर्णव, तसा हा तुझ्या बाबांचा फ्रेंड अनुप”. विकासचे बाबा म्हणाले.

   "हॅलो अनुप काका" विहान गोड आवाजात म्हणाला.

अनुपने त्याला जवळ बोलावल आणि खास त्याच्यासाठी आणलेली कॅडबरी त्याच्या हातात दिली. कॅडबरी बघून सहाजिकच विहान खूष झाला. तेवढ्यात नेहा बाहेर आली.

    "आई, मी विहानला शाळेत सोडून पुढे ऑफिसला जाते आज त्याची स्कूलबस येणार नाही त्यामुळे तुम्हाला किंवा बाबांनाच त्याला आणावं लागेल." नेहा.

   नेहा आणि विहान निघून गेल्यावर विकासचे  बाबा अनुपला म्हणाले, "या दोघांकडे बघूनच जगतोय आता आम्ही. नाहीतर एकूलता एक मुलगा निघून गेल्यावर आम्ही अगदी खचून गेलो होतो. पण नेहा आणि विहानकडे बघून सावरलं स्वतःला. विकास गेला तेव्हा  दिड वर्षांचा होता रे विहान. त्याला तर विकास आठवतही नसेल. पण बाबाची कमी मात्र जाणवते. नेहापुढे तर अख्ख आयुष्य पडलय पण विकास गेल्यापासून ती हसणच विसरलेय. अनुप, कॉलेजला असताना तू नेहाचाही चांगला मित्र होतास ना?  जमलं ना तर तिला या दु:खातून बाहेर काढशील? आम्ही थकलो आता तिला समजावून." बोलता बोलता विकासच्या बाबांना रडू कोसळलं.

    "रडू नका काका. होईल सगळं व्यवस्थित. मी मगाशीच तुम्हांला सांगितल ना, 'विकास नसला तरी मी आहे. तुम्हांला कधीही काहीही वाटलं तरी हक्काने सांगा मला आणि हो काळजी करु नका मी बोलेन नेहाशी." अनुप.

    विहानला शाळेत सोडून नेहा ऑफिसला गेली. पण अनुप आणि त्याच्यामुळे  पुन्हा आठवलेली पावसाळी पिकनिक काही तिच्या डोक्यातून जात नाही. दिवसभर ऑफिसमध्ये नेहा यांत्रिकपणे वावरत होती.

       असेच काही दिवस सरले. अनुप आणि नेहाची ऑफिसच्या कामानिमित्त अधूनमधून भेट होत होती. पण नेहा मात्र त्याच्याशी शक्य तितकं प्रोफेशनल वागत होती. अनुप अधूनमधून विकासच्या आई बाबांना भेटायला त्यांच्या घरी जात होता, पण नेहा नसताना. कारण नेहाचं प्रोफेशनल वागणं बघून मनातून कुठेतरी तो दुखावलेला होता. नेहाच्या मुलाची; विहानची आणि अनुपची मात्र खूप छान गट्टी जमली होती.

       एक दिवस संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहा पार्किंगमध्ये गाडी काढायला जात असताना नेमका त्याच वेळी अनुप तिथे आला . अनुप समोर आल्यावर कसं रिॲक्ट व्हावं तेच तिला कळत नव्हतं. भूतकाळात काहीही घडलेलं असलं तरी वर्तमानात अनुप तिच्या ऑफिसच्या रेग्युलर आणि महत्वाच्या क्लाएंटपैकी एक क्लाएंट होता. त्यामुळे त्याला डावलून पुढे जाणं तिच्या प्रोफेशनल एथिक्समध्ये बसणारं नव्हतं. ती काही बोलणार इतक्यात अनुप तिला म्हणाला, "मी तुलाच भेटायला आलो होतो नेहा. मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी."

   "प्रोफेशनल का पर्सनल?" नेहाने अलिप्तपणे विचारलं.

   "पर्सनल !" तिने जितक्या अलिप्तपणे विचारलं अनुपने तितक्याच सहजपणे तिला सांगितल.

  "बोल, काय बोलायचं आहे ? नेहा

    "इथे नको आपण बाहेर जाऊया. तुझी गाडी राहूदे इथेच मी घरी सोडतो तुला. तसही उद्या सकाळी मला तुमच्या ऑफिसला यायचच आहे. मी येता येता तुला पिक करेन. चालेल ?" अनुप

     "ठिक आहे. तू हो पुढे मी घरी कळवते उशीर होइल म्हणून." नेहा.

   तिच असं चटकन 'हो' म्हणणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. पण ही तर फक्त सुरुवात होती. त्याला जे बोलायचं होतं ते ऐकल्यावरही ती इतक्याच शांतपणे रीॲक्ट होइल ही अपेक्षा करणंसुद्धा चूकीचं आहे याची  त्याला कल्पना होती. पण तरीही त्याला आज मनातलं सगळं तिच्याशी शेअर करायचं होतं. खास करुन त्या पावसाळी पिकनिकच्या दिवसाबद्दल!

    अनुपची गाडी हायवे सोडून एका गावाकडच्या रस्त्याला लागली. अगदीच निर्मनुष्य नसला तरी रस्ता तसा शांत होता. तिथल्याच एका चहाच्या टपरीच्या थोड पुढे जाऊन अनुपने गाडी थांबवली आणि नेहाला विचारलं, "नेहा इथेच गाडीबाहेर उभ राहून चहा घेत बोलूया का? मिन्स इफ यू आर कंफर्टेबल."

"इट्स ओके नो प्रॉब्लेम", नेहा.

अजूनही तिच्या बोलण्यातला अलिप्तपणा गेलेला नाही हे अनुपला पुन्हा जाणवलं.

    गाडीतून बाहेर येवून नेहा गाडीला टेकून उभी राहिली. समोरुन आलेल्या गार वाऱ्याच्या झुळूकीमुळे तिला अगदी प्रसन्न वाटत होतं. कितीतरी दिवसांनी नव्हे महिन्यांनी ती अशी मोकळं वातावरण अनुभवत होती. या अशा वातावरणात ती आणि विकास खूप वेळा फिरायला येत असत. विकासच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले.

"नेहा चहा!" अनुपच्या आवाजाने नेहा भानावर आली.

अनुपच्या हातातला चहाचा ग्लास बघून अचानक तिला पावसाळी पिकनिक आठवली. क्षणभर तिची आणि अनुपची नजरानजर झाली. त्याच्या नजरेत तिला आजही तेच भाव दिसत होते जे तिला 'त्या' दिवशी दिसलेले होते. "पण मग  नक्की  कुठे  चुकलं आणि काय?" नेहाच्या मनात भूतकाळातल्या विचारांची गर्दी झाली.

    "नेहा चहा घे गार होतोय... आणि मला माहिती आहे तुला एकदम कडक चहा लागतो. तुझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुला मिळतील. खरतर त्याचसाठी आपण आलोय इथे”, अनुप.

     "इतक्या वर्षांनंतर  आज तुला ती सगळी उत्तरं द्यावीशी वाटतायत?"  नेहाने चहाचा ग्लास हातात घेत विचारलं.

   " हो! या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ येईल अस मला कधीच वाटलं नव्हतं. इनफॅक्ट ही वेळ यावी असही मला वाटत नव्हतं. पण दुर्दैवाने म्हण किंवा आणखी काही, पण आज ती वेळ आलेय", अनुप.

    "प्रेम करत होतास माझ्यावर?" नेहा.

     "तुला वाटतय असं?" अनुपने प्रतिप्रश्न केला.

    "मला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटत होतं हे जाणून घ्यायचं आहे मला", नेहा.

   "तू आवडायचीस आधीपासून. आपलं ट्युनिंगही खूप छान जुळलं होतं. पण यापलीकडे जाऊन त्यावेळी माझ्या मनात दुसरी कुठलीच भावना नव्हती किंवा दुसऱ्या कुठल्या भावनेचा मला विचार करायचा नव्हता. कारण तू विकासची गर्लफ्रेंड होतीस. पण मला आजही आठवतोय तो पावसाळी पिकनिकचा दिवस.....

सम्याची गाडी बंद पडली आणि विकास त्याच्याबरोबर थांबला. खरतर तेव्हा मी सम्याबरोबर थांबाणार होतो पण विकासच आणि सम्याच घर एकाच रोडवर असल्यामुळे तो त्याच्याबरोबर थांबला." अनुप.

    त्यादिवशी मी तुझ्या गाडीवर बसले आणि आपण दोघ एका वेगळ्याच विश्वात  वावरू लागलो. आपण दोघही  भिजून ओलाचिंब झालो होतो. अशा परिस्थितीत तुझा ओझरता होणारा स्पर्शही मनात एक अनामिक धडधड निर्माण करत होता. मला तुझ्याबरोबरचे ते क्षण हरवू द्यायचे नव्हते. जास्तीत जास्त वेळ तुझ्याबरोबर घालवायचा होता. म्हणूनच  नंतर चहाची टपरी दिसल्यावर जेव्हा  आपण चहा घ्यायला थांबलो  तेव्हा मी  समोरच्या डोंगरावर जायचा हट्ट केला; मुद्दाम ठरवून नाही; ती अगदी सहज रिॲक्शन होती मनाची. हे सगळं मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होते. विकासबरोबर असताना या अशा भावना कधी निर्माणच झाल्या नव्हत्या मनात", नेहा.

      त्या डोंगरावर गेलो तेव्हा पहिल्यांदा ग्रूप किंवा विकास सोडून फक्त आपण दोघच एकत्र होतो. त्या दिवशी मला आयुष्यात पहिल्यांदा  तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली. तुला मनमोकळेपणे बोलताना, हसताना मी प्रथमच इतकं निरखून बघत होतो. अचानक एका क्षणी तू अगदी जवळ आलीस आणि स्वतःवरचा ताबा सुटतोय की काय असं वाटत असताना मी स्वतःला सावरलं. त्या क्षणी स्वतःला  तुझ्या मिठीतून बाजूला केलं ते कायमच दूर होण्यासाठीच. त्यानंतर मी जाणीवपूर्वक तुझ्यापासून लांब रहायचा प्रयत्न केला म्हणूनच कल्चरल प्रोग्रॅमच्या वेळी तुझ स्क्रिप्ट उत्तम असतानाही मी ते रिजेक्ट केलं कारण मला तुझ्यापासून लांब रहायचं होतं. तुझ्या आणि विकासच्यामध्ये मला कधीच यायच नव्हतं. कारण तुझ्यापेक्षा विकास आणि त्याची मैत्री माझ्यासाठी खूप महत्वाची होती", अनुप.

   "सगळं काही एकट्याने किती सहज ठरवून टाकलस ना तू. माझा विचारही नाही केलास. तुझ्यामुळे मला आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं होतं की विकास आणि माझ्यामध्ये खूप छान मैत्री आहे खूप छान बॉन्ड आहे पण ते प्रेम नाही. पण तरीही मी कनफ्युज होते. मनातल्या विचारांचा गुंता सुटत नव्हता. कळत नव्हतं नक्की मला वाटतय तसच आहे का तुझ्याबद्दल वाटणाऱ्या क्षणिक आकर्षणामुळे असं वाटतय? एकीकडे मी अशा गोंधळलेल्या मनस्थितीत होते आणि दुसरीकडे तू मला टाळतोयस हे मला स्पष्ट जाणवत होतं. कळतच नव्हतं मला काय करावं.  तुझ्याशिवाय  याबद्दल मी  कोणाशीच बोलू शकत नव्हते. पण तू तर माझ्यापासून शक्य तितका दूर रहायचा प्रयत्न करत होतास. तुझ्या मनात नक्की काय आहे हेच मला कळत नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं; तू माझं स्क्रिप्ट रिजेक्ट केल्यामुळे आपण दुरावलोय पण प्रत्यक्षात जे काय घडलं होत ते आपल्या दोघांशिवाय कोणालाच माहिती नव्हतं", नेहा.

    "मला माफ कर नेहा पण मला तुमच्यामध्ये यायचं नव्हतं. मुख्य म्हणजे मला विकासची मैत्री गमवायची नव्हती. जी माझ्यासाठी खूप महत्वाची होती. पण आज विकासच या जगात नाहीये तर स्वतःच घातलेली स्वतःवरची बंधन झुकारुन मी तुझ्याशी बोलायच ठरवलं. आज मी प्रामाणिकपणे कबूल करतो की हो प्रेम करत होतो मी तुझ्यावर अगदी मनापासून!" अनुप

      हे सगळं ऐकून नेहा सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. थोडावेळ कोणीच काही बोलत नाही.

  "नेहा, फक्त एवढच नाही तर अजूनही खूप काही सांगायच आहे तुला." अनुप.

    "बोल अनुप, जे काही बोलायच असेल ते आज बोलून टाक. बोलायच होत पण बोलता आलं नाही असं नंतर नको वाटायला”, नेहा.

  "विकासच्या बाबांनी मला तुझ्याशी लग्न करशील का? असं विचारलय", अनुप.

 "काय ? हे कसं.... कधी?.... मला काहीच माहिती नाही यातलं", नेहा.


    "गेल्या आठवड्यातच विचारलं त्यांनी. त्यांना तुझी खूप काळजी वाटते नेहा. एकदा का तू तुझं आयुष्य नव्याने सुरु केलस की ते रिलॅक्स होतील, असं वाटतय त्यांना. खरतर माझ्यासाठीही हा प्रश्न अनपेक्षित होता. पण 'मी विचार करतो' असं म्हणून विषय थांबवला", अनुप.

     "सॉरी अनुप. पण तू त्यांच्या बोलण्याचा एवढा सिरिअसली विचार नको करुस. मी समजावेन त्यांना." नेहा.

   "मी विचार करतोय नेहा. पण त्यापूर्वी मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच भेटलोय आपण आज", अनुप.

   "पूर्वीची गोष्ट वेगळी होती अनुप आता मी एक विधवा आहे. एका मुलाची आई आहे आणि तू सिंगल आहेस. उगाच भावनेच्या भरात असा  कुठलाही निर्णय घेऊ नकोस ज्याचा पुढे जाऊन आपल्या दोघांनाही त्रास होइल." नेहा.

   "भावनेच्या भरात नाही नेहा. गेला आठवडाभर विचार करत होतो मी यावर. विहानच आणि माझं छान जमतं. त्याला या वयात आई इतकीच पित्याच्या प्रेमाचीही गरज आहे. कुठेतरी तो माझ्यामध्ये त्याचे वडील शोधत असतो. सगळ्यात महत्वाच म्हणजे विहान विकासचा मुलगा आहे. त्याची शेवटची आठवण! ही आठवण मला आयुष्यभर जपायची आहे. माझ्याकडून विहानला कधीच सावत्र वागणूक मिळणार नाही. पण या साऱ्याबरोबरच मला तुझा विचार पण तितकाच महत्वाचा वाटतो. म्हणूनच तू कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तुला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायच आहे", अनुप.

     "भूतकाळाबद्दल? आता अजून कुठला भूतकाळ अनुप?" नेहा

     "तुमच्या दोघांपासून दूर जायचं म्हणून मी यु. एस. ला निघून गेलो. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुदैवाने मला नोकरीही मिळाली.  नोकरीत स्थिरावत असतानाच तुमच्या लग्नाची बातमी कानावर आली. मनातून जेवढा आनंद झाला तेवढच अंतर्मनात खोल कुठेतरी प्रचंड दु:ख झालं होतं. या सगळ्यातून सावरणं मला खूप कठीण जात होतं. नेमकं त्याचवेळी 'सारा' माझ्या आयुष्यात आली. आधी खूप छान मैत्री झाली पण नंतर एका रात्री आम्ही खूप जवळ आलो. साराला लग्न करायच नव्हतं. तिचा विवाहसंस्थेवर विश्वासच नव्हता. त्यानंतर आम्ही दोन वर्ष 'लिव्ह इन" मध्ये रहात होतो. मी जेव्हा भारतात परत यायचा निर्णय घेतला तेव्हा तिने खूप विरोध केला. पण माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. बाबांसाठी मला परत यावच लागणार होतं. भावनिकदृष्ट्या आम्ही दोघही एकमेकांमध्ये गुंतलो होतो. मी सारासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण ती तिच्या मतावर ठाम होती. अखेर नाईलाजाने मला ते रिलेशन तोडावं लागलं. सारानेही प्रॅक्टिकल विचार करुन हे "ब्रेकअप" स्विकारल. त्यानंतर मी भारतात परत आलो. भारतात परत आल्यावर मात्र माझा आणि साराचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. हे सगळं तुला सांगण खूप आवश्यक वाटलं मला म्हणून मी सांगितल. बाकी  तुझा जो काही  निर्णय असेल तो मला मान्य असेल. पण माझा निर्णय झालाय. मी तुला विहानसकट स्विकारायला तयार आहे", अनुप.

     "आपण सगळं बोलतोच आहोत तर इतके दिवस मनात साठवलेलं बोलून मी ही मोकळी होते. माझं आणि विकासच लग्न झाल्यानंतरही मी तुला विसरु शकले नव्हते अनुप. विकासला मला कधीच फसवायचं नव्हतं पण माझ्या मनातला गोंधळ मी त्याच्यासमोर व्यक्तही करु शकत नव्हते. कारण मुळात माझ मलाच काही कळत नव्हतं. विकास नेहमीच आदर्श नवरा आदर्श मित्र होता. पण तो माझा प्रियकर नाही होवू शकला. विकासबद्दल माझी काहीच तक्रार नाही/ नव्हती; कारण मुळात चूक माझीच होती. मी  स्वतःच्या भावना समजूच शकले नाही. माझ्या मनातल्या  'त्या' भावना विकासासाठी कधीच नव्हत्या त्या तुझ्यासाठी होत्या हे मला खूप उशीरा समजलं. पण समजूनही मी काहीच करु शकले नाही आणि जे समोर आहे ते स्विकारत गेले. पण तरीही आज आपण एकत्र नाही येऊ शकत. कारण  जे नातं कोणाच्यातरी नसण्यावर अवलंबून आहे असं नातं मला जोडायचच नाहीये", नेहा.

  "कोणाच्यातरी नसण्यावर? म्हणजे मी समजलो नाही. तुला नक्की काय म्हणायच आहे ते",अनुप.

   "मला जे म्हणायच आहे ते तुला कितपत समजावता येइल ते नाही माहिती मला पण प्रयत्न करते.
      अनुप तू विकाससाठी माझ्यापासून लांब राहिलास. आज विकास नाही म्हणून तू तुझं  माझ्यावर  असणारं प्रेम व्यक्त केलस. पण परिस्थिती जशी आहे तशी नसती तर? विकास आज आपल्यामध्ये असता तर? तर काय अनुप? आयुष्यभर मी हे कधी समजूच शकले नसते की तुझही माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे हे नातं नेहमीच विकासच्या अस्तित्वावर अवलंबून होत. कदाचित नियतीला आपण एकत्र येणं कधी मंजूरच नव्हतं”, नेहा.

 "इथे नियतीचा प्रश्न कुठे आला नेहा? तू चुकीच्या दिशेने विचार करतेयस. जर तू ठरवलस तर आपण आजही एकत्र येऊ शकतो” , अनुप.

   नाही, मी कुठलाही चुकीचा विचार करत नाहीये. आज आपल्यात ते नातं  निर्माण नाही होवू शकत जे तेव्हा होवू शकलं असत. जर त्यावेळी हे नातं निर्माण झालं असतं तर विकास दुखावला गेला असता पण त्याने हे सगळं मोकळ्या मनाने  स्विकारल असतं. आणि आपल्यामध्ये प्रेमाच एक सुंदर नातं निर्माण झालं असतं. पण आज सगळीच परिस्थिती बदलली आहे.", नेहा.

  "नेहा  रिमॅरेज हे बहुतांश वेळा कोणाच्यातरी नसण्यावरच अवलंबून असतं.", अनुप.

  "हो पण ते पूर्णपणे नव्याने तयार होणारं नातं असतं. आपल्याबाबतीत तसं नाही आपलं नातं नेहमीच 'विकास' या एकाच गृहितकावर आधारित होतं आणि ही परिस्थिती कायम अशीच राहील.
      तू एक चांगला माणूस आहेस म्हणूनच मला तुझी आयुष्यभर सोबत हवी आहे पण एक चांगला मित्र म्हणून. कारण प्रेमापेक्षा जास्त चांगल तू मैत्रीचं नातं निभावशील. आयुष्याच्या 'या वळणावर' मला खरच एका मित्राची गरज आहे. आणि तुझ्यापेक्षा चांगला मित्र मला दुसरा कोणीच मिळू शकत नाही म्हणूनच मला हे मैत्रीच नातं गमवायचं नाहीये.  आपण आज पुन्हा नव्याने या मैत्रीच्या नात्याला सुरुवात करुया अर्थात तुझी इच्छा असेल तर”, नेहा.

   "मी तुझ्याबरोबर नेहमीच असेन नेहा. मग ती मैत्री असो वा प्रेम! नात्याच नाव महत्वाच नाही.  माझ्यासाठी तू खूश असणं महत्वाच आहे. आयुष्यातल्या त्या सुंदर वळणावर आपण एकत्र नाही येऊ शकलो पण 'या वळणावर' मात्र  पुन्हा एकदा जगातल्या सगळ्यात सुंदर आणि निरपेक्ष अशा मैत्रीच्या नात्याची सुरुवात करुया आपण!" अनुप.

    नेहाच्या चेहऱ्यावर आज कितीतरी दिवसांनी समाधान दिसत होतं. आयुष्यात प्रथमच तिला हवं असणारं नातं निर्माण झालं होतं. आणि ते ही अगदी आयुष्यभरासाठी!

समाप्त
©मानसी जोशी.




 

 


 











   



 

   
 
 
 



Tuesday, 13 February 2018

व्हॅलेंटाइनच्या आठवणी


आजकाल तर शाळेतल्या मुलांनाही #व्हॅलेंटाइन_डे माहिती असतो. व्हॅलेंटाइन डे म्हणजे काय? हे मला बारावीत असताना पहिल्यांदा कळल आणि #व्हॅलेन्टाइन_वीक हा प्रकार याच वर्षात माझ्या जनरल नॉलेजमध्ये दाखल झाला.
   
     बारावीत असताना माझ्या एका मैत्रीणीला एका मुलाने व्हॅलेन्टाइन डे च्या दिवशी  प्रपोज केलं.
    बिचारा घाबरत घाबरत तिला म्हणाला, "Will you be my Valentine?"
    तिला व्हॅलेंटाइन म्हणजे काय हेच माहिती नव्हतं त्यामुळे तिला काहीच कळल नाही आणि ती काही न बोलता निघून आली. मी विचारल तर म्हणाली, "तो काय बोलला तेच कळलं नाही ग..... "
    नंतर त्याच्या मित्राकडून सगळा प्रकार कळल्यावर मात्र आम्ही खूप हसलो होतो.

       FY ला असताना एका मैत्रीणीबरोबर तिच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला म्हणून "आर्चिस" गॅलरीमध्ये गेले होते. तिथली सुंदर सुंदर ग्रिटिंग कार्ड्स आणि 'हार्ट शेपची' शो पिसेस बघून एकदम भारी वाटत होतं. पण त्याच्यावरचे प्राईस टॅग  बघितले आणि वाटलं, "बरं झाल आपल्याला बॉयफ्रेंड नाहीये, नाहीतर सगळा पॉकेटमनी गिफ्ट खरेदी करण्यातच संपला असता.
       FY SY चा व्हॅलेन्टाइन पॉकेटमनीच्या विचारात संपला. TY ला असताना मात्र नटून सजून कॉलेजला आलेल्या एका जाड्या भरड्या मुलीला एक मुलगा रोझ बुके, ग्रिटिंग आणि "स्टाईल" मूव्हीमध्ये दाखवलेल "धडकता हुवा हार्ट" देत असताना बघितल; तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकला का काय म्हणतात तसं झालं. नकळत मी मैत्रीणीला म्हणाले, "या मोटीला सुद्धा व्हॅलेंटाइन गिफ्ट देणारे आहेत? आणि आपण..." त्यावेळेस माझं हे बोलणं ऐकून मैत्रीणीचा त्रासलेला दु:खद चेहरा अजूनही आठवतोय. आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा बॉयफ्रेंड नसल्याच्या कमीची जाणीव झाली होती. पण तेवढ्यापुरतच! त्यानंतर कॅंटिनला वडापाव खाताना वॉलेटमधले पैसे बघून; बॉयफ्रेंड नसल्याच दु:ख हलकं झालं.
 
    पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला LL.B चा रुक्ष अभ्यास करताना एवढा छान ग्रूप जमला की "व्हॅलेन्टाइन, बॉयफ्रेंड" या गोष्टींच अप्रूप कमी झालं.

    लग्न ठरल्यानंतर "अहों" ना व्हॅलेंटाइन वगैरेच काही फारसं कौतुक नव्हतं. लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेन्टाइनच्या वेळी तर मी रत्नागिरीला आणि अहो पुण्याला. त्यामुळे सेलिब्रेशनचा प्रश्नच नव्हता.
      आमची कन्यका अडीच वर्षांची असेल तेव्हा अचानक काय झालं काय माहिती व्हॅलेन्टाइनच्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर  कन्यका आसपास नाही बघून "अहो"   रेड रोझ आणि डेरी मिल्क माझ्यासमोर धरत मला चक्क, "Happy Valentine Day" असं म्हणाले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मला क्षणभर काहीच सुचलच नाही. तेवढ्यात आमची कन्यका कुठूनतरी धावत आली आणि  अहोंच्या  हातातली 'डेरी मिल्क आणि रेड रोझ'  जवळपास हिसकावून घेत "Thank you बाबा" म्हणून निघूनही गेली. त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. माझं आयुष्यातल पहिलं वहिलं #व्हॅलेन्टाइन_गिफ्ट माझ्यासमोर माझ्या कन्येनेच हिसकावून घेतलं होतं. त्यानंतरच्या व्हॅलेन्टाइनला मात्र  अहोंनी माझं लिपस्टिक हरवलं होतं म्हणून मेबेलीनच  लिपस्टिक आणलं. ( सुरुवातीला हा ब्रॅंड लक्षात ठेवला हेच माझ्यासाठी धक्कादायक होतं. नंतर कळलं मॉलमधल्या मुलीने सजेस्ट केल होतं ते.) तेच माझं पहिलं वहीलं व्हॅलेन्टाइन गिफ्ट. Expiry date उलटून गेली असली तरी आजही मी ते जपून ठेवलय. माझ्या पहिल्यावहिल्या व्हॅलेन्टाइनची आठवण! असे प्रेमाचे हलकेफुलके क्षणच आयुष्यात गोड आठवणी बनून रहातात.

      व्हॅलेन्टाइन डे चे विरोधक, "प्रेम व्यक्त करण्यासाठी स्पेसिफिक दिवसच कशाला हवा?" असा प्रश्न सर्रासपणे विचारतात. खरच नसते गरज अशा स्पेसिफिक दिवसाची. गरज असते ती प्रेमाच्या व्यक्त होण्याची. पण एखादा दिवस फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून असेल तर बिघडलं कुठे? नवीन नवीन असताना सगळेच प्रेम व्यक्त करतात पण मुरलेल्या नात्यालाही या प्रेमाच्या व्यक्त होण्याची गरज असते. अशा "स्पेसिफिक डे" च्या रुपाने एक संधी मिळते प्रेम व्यक्त करायला. महत्व दिवसाला नाही. महत्व आहे ते व्यक्त होण्याला. फक्त महागडी गिफ्ट्स, हॉलिडे पॅकेजेस म्हणजे प्रेम नव्हे हे १००% मान्य. पण कधीकधी यामुळेच नात्यांमध्ये नव्याने रंग भरले जातात हे सुद्धा तितकंच खरं आहे.

©मानसी जोशी







Friday, 2 February 2018

अ - अध्यात्माचा


आजकाल "अध्यात्म" हा शब्द अनेकांच्या तोंडून ऐकायला येतो. अनेक ठिकाणी "अध्यात्म सेंटर्स" चालू झाली आहेत. काही दिवसांसाठी हजारो रुपये फी आकारुन 'जगण्यातलं अध्यात्म' शिकवलं जातय. काहीजण अध्यात्म मानतात काही जण नाही मानत. पण अध्यात्म म्हणजे नक्की काय? हा प्रश्न विचारल्यानंतर मात्र अनेकांना उत्तर सूचत नाही. किंवा एखाद्याने उत्तर दिलं तरी अगदीच पुस्तकातलं पाठ केल्यासारखं तांत्रिक उत्तर असतं.  खरच काय आहे अध्यात्म म्हणजे? अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायच तर, "चांगल्या विचारांमुळे मनात निर्माण होणाऱ्या चांगल्या इच्छा म्हणजे अध्यात्म".  अध्यात्म या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. फक्त नामस्मरण, जप, पूजाअर्चा म्हणजे अध्यात्म नव्हे. फार फार तर आपण असं म्हणू हे सारे  अध्यात्मापर्यंत पोचण्याचे काही मार्ग असू शकतात किंवा आहेत.  या साऱ्यामुळे मन शांत व स्थिर होतं. मनातले नकारात्मक भाव दूर होतात आणि त्याची जागा सकारात्मक विचार घेतात.  या सकारात्मक विचारांमधून चांगल्या इच्छा जन्म घेतात. चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच. अशा सर्व इच्छापूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म.
      ज्या सृष्टीमध्ये आपण जन्म घेतला, त्या सृष्टीप्रती परोपकाराचा भाव मनात ठेवून  त्या सृष्टीचा आदर ठेवणे, ज्या समाजामध्ये आपण रहातो त्या समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा भाव मनात असणे म्हणजेही  आध्यात्म आहे. या जगात शाश्वत असं काहीच नसतं. अगदी हे जगही अशाश्वत आहे. मग तरीही आपण  राग, द्वेष असे वाईट भाव आयुष्यभर जपत असतो. आपल्यातल्या 'मी' कुरवाळत बसतो. अध्यात्म या साऱ्याच्या पलीकडे आहे. तरीही ते खूप कठीण नाहीये. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातही जगण्यातलं अध्यात्म शोधता आलं पाहिजे. त्यासाठी ग्रंथ, पोथी किंवा जपमाळ घेऊन बसायची गरज नाही. आपल्या चांगल्या वर्तणूकीतूनही आपल्याला आध्यात्मिक समाधान मिळू शकतं.
   भिकाऱ्याला भिक्षा देणं चुकीचं की बरोबर हा विचार काही क्षण बाजूला ठेवूया. पण उपाशी असणाऱ्याला अन्न देणं किंवा समोरचा संकटात असताना त्याला आधार देणं या गोष्टी आपण अगदी सहज करु शकतो.
     "दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती" बाबा आमटे, प्रकाश आमटे, गाडगे महाराज अशा अनेक व्यक्तींच नाव जरी कोणी उच्चारलं तरी मनात आपोआपच आदर दाटून येतो. याच कारण म्हणजे त्यांनी जगण्यातलं अध्यात्म खऱ्या अर्थाने आपलसं केल होतं. भगवी वस्त्र घालून, जटा वाढवून आणि हातात कमंडलू घेऊन कोणीही अध्यात्मिक होईलच अस नाही. आध्यात्मिकता ही आत्म्याशी / मनाशी निगडीत आहे. दिखावूपणाशी नाही.  आपलं मन नेहमी शुद्ध हवं. निरपेक्ष भावनेने अगदी छोटीशी का होईना पण कोणालातरी मदत केल्यावर जे समाधान मिळतं ते लाखो करोडो रुपये खर्च करुनही कोणीही विकत नाही घेऊ शकत. निर्मळ, निरपेक्ष मन हि परमेश्वराची देणगी आहे. ती जन्मजातच आपल्याला मिळालेली असते. पण आपण मात्र आपल्या विचारशक्तीच्या जोरावर दुसरं मन तयार करतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हिरावून बसतो.
     एखादं लहान बाळ हसताना किंवा शांतपणे झोपलेल असताना किती गोड आणि निरागस दिसतं. हि निरागसता असणे हे सुद्धा एक प्रकारच 'अध्यात्म'च आहे. ज्या गोष्टींमधून मनाला 'सात्विक आनंद' मिळतो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अध्यात्म आहे. मग तो विस्तीर्ण पसरलेला सागरकिनारा असो वा बागेत उमललेलं एखाद सुंदर फूल असो किंवा एखाद्या गायकाने गायलेल मत्रमुग्ध गाणं असो वा एखाद्या चित्रकाराने रेखाटलेलं एखाद सुंदर चित्र असो; गोष्ट निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित ते महत्वाच नाही. महत्वाच असतं ते आनंद मिळणं. छोट्या छोट्या गोष्टीत जगण्यातलं खरं आध्यात्म सापडतं. परमेश्वराने निर्माण केलेलं जग हे फार सुंदर आहे; फक्त आपला   दृष्टीकोन बदलायला हवा; सकारात्मक विचारसरणी आचरणात आणायला हवी. हे ज्याला जमलं त्यालाच खऱ्या अर्थाने   'अध्यात्म' म्हणजे काय हे समजलं. तुझे आहे तुजपाशी... आणि हे आपल्यापाशी असणारं  आपल्यालाच शोधावं लागतं.
©मानसी जोशी





Sunday, 28 January 2018

सारेगम

१ मे १९९५..... या दिवशी झी टिव्हीवर एक आगळावेगळा शो चालू झाला होता #सारेगम नावाचा. एका संगीतपर्वाचा नितांतसुंदर प्रवास सुरु झाला तो "सारे सुरोंका हैं यही मिलन.. "  या साधना सरगम आणि सोनू निगमच्या आवाजातल्या टायटल सॉंगने. त्यानंतर "बजे सरगम... " या सोनू निगम आणि स्पर्धकांच्या सुरेल गाण्याने प्रेक्षकांना मत्रमुग्ध केलं.या गाण्यानंतर कार्यक्रम खऱ्या अर्थाने सुरु झाला. सोनू निगमच शांत संयत सूत्रसंचालन, 'कुमार सानू' सारखे परिक्षक आणि मुख्य म्हणजे अगदी सर्वसामान्य कपड्यातले, कुठलाही ड्रामा न करता मनापासून सुरेल गाणी गाणारे चार स्पर्धक; दोन स्त्री स्पर्धक आणि दोन पुरुष स्पर्धक (यामध्ये एक स्वप्निल बांदोडकर होता).

      स्पर्धेच स्वरुपही अगदी साधं; एकूण आठ प्राथमिक फेऱ्या; प्रत्येक फेरीमध्ये चार स्पर्धक आणि चार राउंडस. त्यानंतर चार सेमी फायनल आणि मग फायनल. प्राथमिक फेरीलाच 'कॉड राउंड' आणि 'जजेस चॉइस राउंड' यासारखे दोन कठीण राउंड्सही होते. ज्यामध्ये खरोखरच स्पर्धकांचा कस लागत होता. कुठेही आरडाओरडा नाही,  स्पर्धकांचा ड्रामा नाही,  परिक्षकांच अपमानास्पद बोलणं नाही, सूत्रसंचालकाचा किंवा परिक्षकांचा फ्लर्ट नाही;  होती ती फक्त सुंदर आणि श्रवणीय गाणी. स्पर्धेच्या शेवटी कुमार सानू सरांनी प्रत्येक स्पर्धकाचे मार्क्स कोणालाही न दुखावता सांगितले. यावर स्पर्धकांच्या रिॲक्शनही अगदी सयंत आणि शांत होत्या.

      पहिलाच भाग असल्यामुळे या भागात काही त्रूटीही होत्या.  सूत्रसंचालनाच्या दृष्टीकोनातून एपिसोड म्हणाव तसा खुलला नाही. अगदी एका सरळ रेषेत झालेला कार्यक्रम वाटला. पण गायकांची गाणी मात्र मनाला स्पर्श करुन गेली. कालांतराने हळूहळू हि कमीही भरुन निघाली. सोनू निगमच्या शांत संयत सूत्रसंचालनाला हलक्याफुलक्या विनोदांची, अनुभवाची जोड मिळत गेली आणि कार्यक्रम अधिक रंगतदार होत गेला. कुमार सानू,  अनू मलिक आणि उदित नारायण यासारखे परिक्षक या सारेगपच्या पहिल्याच सिझनला लाभले होते. १९९५ पासून २००० पर्यंत सोनू निगमने सारेगमच सूत्रसंचालन केलं. यामधून संजीवनी, बेला शेंडे, श्रेया घोषल यासारख्या अनेक चांगल्या गायिका पुढे आल्या. १९९८ मध्ये तर या कार्यक्रमाची #मेगा_फायनल झाली होती. यामध्ये १९९८ पर्यंतच्या सगळ्या विनर्सना सामाविष्ट करण्यात आलं.  'एकसे बढकर एक' असणाऱ्या स्पर्धकांमध्ये अगदी चुरशीची स्पर्धा रंगली. स्पर्धेसाठी संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती परिक्षक म्हणून लाभल्या. अत्यंत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या मेगा फायनलची विजेती होती ती महाराष्ट्रातील #संजीवनी ही गायिका.

     पुढे २००० सालानंतर 'अमान व अयान खान' या भावांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.   

   त्यानंतर २००३ सालामध्ये या शो च नाव बदलून #सारेगमप असं करण्यात आलं.  पुढे २००६ सालापर्यंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'शान'  या गायकाने केले. वेळोवेळी कार्यक्रमाच्या  नियमांमध्ये, राउंड्समध्ये, परिक्षकांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. तरीही कार्यक्रम आपला दर्जा राखून होता. याच कार्यक्रमातून हृषीकेश रानडे, राहुल सक्सेना अर्पिता मुखर्जी यासारखे अनेक गायक/ गायिका पुढे आले. सन २००६ मध्ये तर "सारेगमप लिटल चॅंप्स" हा लहान मुलांसाठीचा सिझनही यशस्वी झाला.  पुढे २००७ मध्ये "आदित्य नारायण"  याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.   त्यानंतर मात्र कार्यक्रमाचा दर्जा हळूहळू खालावत गेला.  तोपर्यंत अनेक वाहिन्यांवर साधारणतः याच धर्तीवर आधारीत अनेक कार्यक्रम सुरु झाले होते.

   हिंदीनंतर झी टिव्हीने अनेक प्रादेशिक वाहिन्यांवरही 'सारेगमप' हा रिॲलिटी शो सुरु केला. झी मराठी वर चालू झालेल्या #सारेगमप ला पल्लवी जोशीच सुंदर सूत्रसंचालन आणि अवधूत गुप्ते आणि देवकी पंडित सारखे परिक्षक लाभले. हा शो हिट झाला आणि २००९ मध्ये आलेल्या लिटल चॅम्प्सने तर  'सारेगमप' चा मेकओव्हर केला आणि कार्यक्रमाच्या यशाला 'चार चॉंद' लावले. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत या पाच फायनलिस्ट्सना तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. शो संपल्यानंतर या पाचही फायनलिस्ट्सच्या  गाण्यांचा #पंचरत्न नावाचा अल्बमही झी मराठीने बाजारात आणला. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. लिटिल चॅम्प्सच्या हा सिझन इतका हिट झाला होता की त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळेत मुंबईतल्या रस्त्यांवरही शुकशुकाट असायचा.  रामायणानंतर एवढा हिट झालेला (निदान महाराष्ट्रात तरी) हा एकमेव कार्यक्रम होता.

    आता मात्र सगळच चित्र बदललं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्यांना गाण्याच ज्ञान असतच असं नाही. गाण्यांपेक्षा/गायकांपेक्षा जास्त चर्चा "बाकीच्या" मंडळींवरच होते.  गाण्यापेक्षा फॅशन, ड्रामा अधिक खुलतो. काही कार्यक्रमांमध्ये तर परिक्षकही असे होते की ज्यांचा गाण्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता. असे कार्यक्रम कधी आले आणि कधी गेले हे कळलच नाही. असो. पण  हे शो बघितले की जुन्या "सारेगम" चे दिवस आठवतात. खरतर सारेगम चालू झाल तेव्हा मी खूप लहान होते. त्यामुळे सुरवातीच्या २/३ वर्षातले काही एपिसोड्स मी ही बघितले नव्हते. पण १९९८ ची मेगा फायनल मात्र चांगली आठवतेय. परवा कुतूहल म्हणून सहज "यु ट्यूबवर" झी टिव्हीच्या सारेगमच्या प्रोग्रॅमचा पहिला एपिसोड सर्च केला. व्हिडिओ क्वालिटी एवढी खास नाहीये. पण तरीही मी पूर्ण एपिसोड बघितला. खरतर हा ओरिजीनल एपिसोडही मी पूर्वी बघितला होता.

      अनेक वाहिन्यांवर सद्ध्या सुरु असलेले गाण्याचे #रिॲलिटी_शोज बघितले की वाटतं नक्की गाण्याचा कार्यक्रम आहे की फॅशन शो आहे की ड्रामा शो आहे?  प्रेक्षकांच्या माथी काहीही मारलं तरी खपतं, या भ्रमातून लवकरच या वाहिन्या बाहेर येतील आणि पुन्हा एकदा गाण्याचा एखादा दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळेल अशी आशा करणसुद्धा आता व्यर्थ वाटायला लागलय.

झी सारेगम च्या पहिल्या भागाची लिंक
https://youtu.be/3r2EbsQildA

फोटो: गूगलवरुन साभार

©मानसी जोशी



Friday, 19 January 2018

तुझे आहे तुजपाशी

    आज मॉर्निंग वॉकला गेले तेव्हा दोन मुके मित्र एकमेकांशी बोलताना दिसते. बोलताना म्हणजे हातवारे करुन एकमेकांशी संवाद साधताना. खरंतर हे दोघेही मला बरेचदा एकमेकांशी छान संवाद साधत मॉर्निंग वॉक करताना दिसतात.  बोलता येत नसलं तरी छान संवाद साधता येतो हे अशा लोकांकडे बघून जाणवतं. गेले चार दिवस "तोंड आल्यामुळे" मला बोलता येत नाहीये. त्यामुळे माझी सहाजिकच चिडचिड होतेय. पण ज्यांना आयुष्यात कधी बोलताच आलं नाही किंवा येणार नाही, अशा लोकांच दु:ख किती मोठ असेल? पण या गोष्टीचा कुठलाही बाऊ न करता एकमेकांशी छान संवाद साधत मॉर्निंग वॉक करणारे ते मित्र बघून मला जाणवलं छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण किती पॅनिक होतो. खरंच याची गरज असते का? माझ्या माहितीत अशी काही जोडपी आहेत ज्यांना बोलता येत नाही (दोघही मुकी आहेत). पण जेव्हा त्यांना कळलं की त्यांचा मुलगा बोलू शकतो तेव्हा मात्र त्यांना प्रचंड आनंद झाला. आपल्या बाळाच्या तोंडून जेव्हा आपण 'पहिला' शब्द ऐकतो तेव्हा आपणही किती खूष होतो; तर आयुष्यभर मुकेपण सोसणाऱ्या माणसांना किती आनंद होत असेल, याची आपण कल्पनाही करु शकत नाही.

      "ऑल द बेस्ट" नाटकातील एक प्रसंग मला चांगलाच आठवतोय. या नाटकात आधंळा,बहिरा आणि मुका असे तीन मित्र असतात आणि हे तिघेही एकाच मुलीवर प्रेम करत असतात. यातला मुका मुलगा जेव्हा आपलं प्रेम व्यक्त करायचं ठरवतो, तेव्हा त्याच्यासमोर सगळ्यात मोठी अडचड असते ती संवादाची. तो आपल्या परीने तिला सांगायचा प्रयत्न करत असतो. पण तिला नीटसं काहीच समजत नसतं. अखेर हताश होवून तो कागद पेन हातात घेतो. पण ती त्याला थांबवते आणि संवाद साधायचा प्रयत्न करायला सांगते. हा प्रसंग अगदीच 'हार्ट टचिंग' या कॅटॅगरीला;  डोळ्यात पाणी आणणारा!

      आमच्या कॉलेजमध्ये दीक्षित नावाचे एक इंग्रजीचे प्रोफेसर होते. ते जन्मत: आंधळे नव्हते पण चुकीचे ड्रॉप्स डोळ्यात घातले गेल्यामुळे लहानपणीच त्यांना अंधत्व आलं होतं. पण परिस्थितीशी दोन हात करुन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीही केली. सामान्यातले असामान्य म्हणतात ते असेच असावेत बहुदा.

    आपल्याजवळ असणाऱ्या अनेक गोष्टींची साधी कल्पनाही आपल्याला नसते.  काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मैत्रीणीचं मिसकॅरेज झालं होत त्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती. आधीच खूप वर्षांनी ती प्रेग्नंट राहिली होती. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक पाचव्या महिन्यात तिचं मिसकॅरेज झाल्यामुळे ती खूप दु:खी होती. तिच्याशी फोनवर बोलत असताना माझी मुलगी मला सतत हाका मारुन, काही ना काही विचारुन डिस्टर्ब करत होती. मी तिच्यावर वैतागले तर पलीकडून मैत्रीण म्हणाली, "नको ग चिडूस तिच्यावर. तिच्या रुपाने खूप मोठं सुख मिळालंय तुला आयुष्यात. आणि कुठल्याही स्त्री साठी इतर कुठल्याही हाकेपेक्षा 'आई' म्हणून मारलेली हाक किती महत्वाची असते, हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच सांगू शकत नाही. तुला नाही कळणार हे दु:ख कारण तू दिवसातून सतत ती हाक ऐकत असतेस. तिचं बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले. खरच खूप वाईट वाटलं होतं तेव्हा.

     आपण नेहमीच आपल्याजवळ जे नाही त्याचा विचार करुन कुढत रहातो. जरा मोकळेपणाने आपल्याला खूप काही मिळालं आहे असा विचार केला तर कदाचित आयुष्यात बराच फरक पडू शकेल. अनेक प्रॉब्लेम्स जे आपल्याला खूप मोठे वाटतात; ते अगदीच सर्वसामान्य वाटू लागतील.  problems are too easy we make them difficult.

©मानसी जोशी


Tuesday, 16 January 2018

कथा - रेशीमगाठ

रेशीमगाठ

आदित्य कोल्हटकर, एक सक्सेसफुल बिझनेसमन! अतिशय गरीब परिस्थितीतून आपल्या मेहनतीच्या जोरावर आयुष्यात यशस्वी झालेला. अगदीच नाही पण काहीसा अबोल. मनातल सारं मनातच ठेवणारा. लाथ मारेन तिथे पाणी काढेन इतका आत्मविश्वास असणारा आदित्य अनेकांना त्यांचा आयडॉल वाटत होता तर अनेकजण त्याच्यावर  जळत  होते. कितीही नाही  म्हटल तरी आदित्यला यशाची थोडी नशा चढलेली होतीच. कंपनीतही मी म्हणेन ती पूर्व असा ॲटीट्यूड ठेवून वावरणारा आदित्य अनेकांच्या हिट लिस्टवर होता. 'नाही' हा शब्द त्याच्या खिजगणतीतही नव्हता. आदित्यने घेतलेला निर्णय हा नेहमी अंतिम निर्णय असे त्याला विरोध करायची हिम्मत कोणामध्येच नव्हती. 
     आदित्य बिझनेसमन म्हणून कितीही स्ट्रिक्ट असला तरीही तो एक चांगला एंप्लॉयर होता यात वादच नव्हता. कंपनीमध्ये अगदी सामन्य वर्कर ते हाय प्रोफाइल एंप्लॉयीपर्यंत प्रत्येकजण अगदी आनंदाने नोकरी करत होता. कंपनीमधल वातावरण नेहमी हेल्दी  रहावं यासाठी आदित्य नेहमी प्रयत्नशील असे. कंपनीमध्ये कोणालाही आर्थिक  मदतीची गरज असेल तर आदित्य स्वतः जातीने लक्ष घालून त्याला मदत करीत असे.   आदित्यचा प्रत्येक निर्णय जसा कंपनीच्या हिताचा असे तसा तो वर्कर्स आणि एंपलॉयीज यांचाही विचार करुन घेतलेला असे. AK ग्रूपमध्ये काम करणं हे अनेकांच स्वप्न होत. पण तरीही चंद्रावरचा डाग म्हणजे आदित्यचा 'अहं - मी जे करतो तेच योग्य' असा ॲटीट्यूड.
मनाली पटवर्धन म्हणजे ब्युटी विथ ब्रेनच एक परिपूर्ण उदाहरण. तिच्या हुशारीवर कोणी तीळमात्रही शंका घेऊ शकत नव्हत. MBA फायनान्स झालेली मनाली प्रचंड हुशार तर होतीच त्याच जोडीने ती अत्यंत प्रामाणिक आणि संवेदनशील मुलगी होती.
 मनालीने AK ग्रूप जॉईन केल्यापासून कंपनीमध्ये असे अनेकजण होते ज्यांना  तिचा हेवा वाटत असे. क्वालिफिकेशन आणि अनुभव यापेक्षा मेहनत आणि हुशारीला प्राधान्य देणाऱ्या आदित्यने अत्यल्प अनुभव असणाऱ्या मनालीला कंपनीमध्ये खूप वरची पोझिशन दिली होती. त्यामुळे सहाजिकच अनेकांना तिचा हेवा वाटत असे.
    त्या दिवशी  मिटिंगमध्ये एका प्रोजेक्टसंदर्भात आदित्यने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांवर चर्चा चालू होती. आदित्यने घेतलेले काही निर्णय अनेकांना पटत नव्हते. पण  आदित्यच्या निर्णयाला विरोध करायचा म्हणजे स्वतःचा अपमान करुन घेणे. त्यात पुन्हा नोकरी जाण्याचा धोका ही होताच. अगदी नोकरी गेली नाही तरी आदित्यच्या 'हिट लिस्टमध्ये' ॲड व्हायची रिस्क कोणालाच घ्यायची नव्हती.
      आदित्य अगदी आत्मविश्वासाने प्रेसेंटेशन करत होता. प्रेसेंटेशन संपल्यावर जवळपास मिटिंग संपल्यातच जमा होती. पण मिटिंग संपण्यापूर्वी मनाली उठून आदित्यला म्हणाली , " आय ॲम सॉरी सर बट आय थिंक यू शुड थिंक अबाऊट युअर डिसिजन".
"व्हॉट यू वॉन्ट टू से मिस मनाली?" आदित्य.
   मनाली आणि आदित्यच बोलण ऐकून मिटिंगमध्ये असलेल्या अनेकांनी भुवया उंचावल्या. इतकी वर्ष या कंपनीमध्ये काढूनही आदित्यशी या भाषेत बोलायची हिम्मत आपण कधीही केली नाही आणि ही काही महिन्यांपूर्वी जॉईन झालेली आणि फारसा अनुभव नसलेली मुलगी अशा भाषेत आदित्यशी बोलतेय याच सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आता बहुदा मनाली आदित्यच्या 'हिट लिस्टवर' जाणार किंवा कंपनीतून बाहेर जाणार; अस तिथे असलेल्या प्रत्येकालाच वाटत होतं.
    "तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं मला वाटतय. तुम्ही जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे कदाचित  कंपनीला तोटा होवू शकत; अस माझा अभ्यास सांगतोय. खरतर माझ्यापेक्षा खूप अनुभवी मेंबर्स इथे उपस्थित आहेत तरीही त्यांच्यापैकी  कोणीच काही बोलत नाहीये याच मला प्रचंड  आश्चर्य वाटतय." मनाली आत्मविश्वासाने म्हणाली.
    मनालीच्या या बोलण्यानंतर मिटिंगमध्ये चुळबुळ सुरु झाली. आता आदित्यचा स्टॅंड काय असेल यावरच सगळ्यांच लक्ष केंद्रित झाल होत.
"ओके, तुम्हाला  माझ प्रेसेंटेशन बेसलेस किंवा इलॉजिकल किंवा चुकीच्या गृहितकांवर आधारीत असणार असं वाटतय का ?
"सॉरी सर मला तस नव्हतं म्हणायच पण काही मुद्दे चुकीचे वाटत आहेत", मनाली.
"ठिक आहे. नो प्रॉब्लेम,  कॅन यू प्रूव्ह  इट?" आदित्य.
"येस आय कॅन." मनाली.
"देन गो अहेड ॲंड प्रूव्ह द सेम." आदित्य
    मनाली पटकन पुढे आली आणि तिने आदित्यच प्रेसेंटेशन ओपन करुन त्यातल्या त्रूटी सांगायला सुरवात केली. मिटिंगमध्ये 'पिनड्रॉप सायलेन्स' होता. आदित्य लक्षपूर्वक मनालीच बोलणं ऐकत होता. गेल्या काही वर्षात त्याला प्रथमच कोणाकडून तरी विरोध झाला होता. खरतर आदित्यला मनालीला चुकीच ठरवायची खूप इच्छा होती आणि म्हणूनच तो तिचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होता.
     मनालीच प्रेसेंटेशन संपल्यानंतर  मात्र काही जणांनी आदित्यला 'मनालीच म्हणणं बरोबर आहे' हे सुचवायचा प्रयत्न केला. तर काहींनी आदित्यची बाजू घेतली. बऱ्याच वेळ चाललेल्या डिस्कशनमध्ये आदित्य मात्र शांतपणे बसून विचार करत होता. कुठेतरी त्याला मनालीचे काही मुद्दे पटत होते.अखेर आदित्यने दुसऱ्या दिवशी पुन्हा मिटींग घ्यायचा डिसीजन घेतला.
      मिटींग संपल्यानंतर ऑफिसमध्ये फक्त मिटिंगचीच चर्चा रंगली होती. काहींना मनाली 'ग्रेट' वाटत होती तर काहींच्या दृष्टीने ती 'आगाऊ' मुलगी होती.
     त्या दिवशी आदित्य मात्र रात्री उशीरापर्यंत केबिनमध्ये बसून विचार करत होता. त्याने  प्रेसेंटेशेनचा पुन्हा नव्याने अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आल की खरच मनालीने त्याच्या कंपनीला खूप मोठ नुकसान होण्यापासून वाचवलं आहे. मनालीच्या हुशारीवर, तिच्या कामाप्रती असणाऱ्या निष्ठेवर आदित्य खुश झाला. प्रेसेंटेशनमध्ये आवश्यक ते बदल करुनच आदित्य घरी गेला. दुसऱ्या दिवशी मिटिंगमध्ये आदित्यने मनालीच कौतुक केल आणि नव्याने तयार केलेलं प्रेसेंटेशन सगळ्यांसमोर ठेवलं. मनालीमुळे आता बाकीच्यांनाही धीर आला होता. प्रत्येकजण 'डिसिजन मेकिंग' मध्ये भाग घेत होता. कंपनीमध्ये झालेला हा पॉझिटिव्ह चेंज बघून मनाली मनोमन सुखावली आणि हा बदल असाच कायम रहावा म्हणून नकळत तिने देवाकडे प्रार्थना केली.
       यानंतर आदित्य आणि मनालीमध्ये  एक निखळ मैत्रीचे नाते निर्माण होऊ लागल. मनाली काही महिन्यांपूर्वीच ऑफिसमध्ये रुजू झाली होती. त्यामुळे नवीन एंप्लॉयशी आदित्यची वाढत चाललेली सलगी अनेकांच्या डोळ्यात खुपत होती. आदित्यशी काही बोलायची कोणाची हिम्मत नव्हती. सहाजिकच  काही जणांनी आदित्य विरोधात मनालीचे कान भरायला सुरुवात केली. आदित्यचा ॲटीट्यूड, त्याचा इगो, एवढच नव्हे तर त्याची बायको त्याला चार वर्षापूर्वीच सोडून गेली आहे; हे सुद्धा मनालीच्या कानावर आलं होतं. पण मनाली शांत होती. मुळातच हुशार आणि संस्कारी असणाऱ्या मनालीला एक गोष्ट नक्की माहिती होती; ती म्हणजे कुठलाही माणूस मुळात वाईट नसतो परिस्थिती त्याला तस बनवत असते. तिने आदित्यविषयी जाणून घेऊन त्याला बदलायच ठरवलं. अशा या संस्कारी मनाली च्या सान्निध्यात आदित्यही हळूहळू निवळत होता.
 त्यादिवशी संध्याकाळी  क्लाएंटच्या ऑफिसमधून कंटाळवाणी मिटींग आटपून आदित्य आणि मनाली बाहेर पडले. बाहेर पडताच मोकळ्या वातावरणात आल्यावर दोघांना खूप बरं वाटल. मस्त पावसाळी हवा होती. आदित्यने तिथल्या जवळच्या कॉफी शॉपसमोर गाडी थांबवली. दोघांना खरच गरज होती एका शांत कॉफीची.
      मनाली कॉफीशॉपच्या काचेतून बाहेरच्या रोडवरची गर्दी बघत शांतपणे बसली होती. आदित्यने सहज तिच्याकडे बघितल. तिचा शांत, सुंदर, आत्मविश्वासी चेहरा बघून त्याचा थकवा कुठल्याकुठे पळाला. मनाली ऑफिसला जॉईन झाल्या दिवसापासून तिच्याबद्दल त्याला एक प्रकारच सुप्त आकर्षण आणि एक वेगळीच आत्मीयता जाणवत होती. तिच्या हुशारीच कौतुक तर होतच पण त्याही पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून मनाली त्याला मनापासून आवडत होती.  वेटरने कॉफीचे दोन वाफाळते मग टेबलवर आणून ठेवले. काही क्षणांची शांतता त्या मग ठेवण्याच्या आवाजाने भंग  पावली. आदित्य आणि मनाली अजूनही शांतच होते. अखेर आदित्य कॉफी घेता घेता मनालीला म्हणाला, "मनाली तू खरच खूप टॅलेंटेड आहेस. तू म्हणजे 'ब्यूटी विथ ब्रेन'च एक परिपूर्ण उदाहरण आहेस."
 "प्रपोज  करायचा विचार आहे का?" मनाली ने हसतच विचारलं.
 "हो विचार तर होता पण तुझ्या बोटातली एंगेजमेंट रिंग मला माझा विचार प्रत्यक्षात आणू देत नाहीये", आदित्य हसत म्हणाला.
"ओह! स्मार्ट हा! असणारच म्हणा; आफ्टरऑल यू आर आदित्य कोल्हटकर." मनाली हसत म्हणाली.
"बरं मला कळू दे तरी कोण आहे तो भाग्यवान?" आदित्यने विचारलं.
 "अभिषेक बापट, स्ट्रगलिंग ॲक्टर आहे.  कॉफी संपवतच मनाली म्हणाली.
"बापरे म्हणजे काही दिवसातच सेलिब्रेटी होणार तू!"
     आदित्यच्या या वाक्यावर दोघही मनमोकळेपणे हसले. आदित्यला आठवलं कितीतरी दिवसांनी तो एवढा मनमोकळा हसत होता. राधिकाला भेटायचा तेव्हाही अशाच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. राधिकाची आठवण आली आणि जखमेवरची खपली निघाली. तिच्या आठवणींनी त्याच मन भरून आल.
    त्यानंतर आदित्य मनालीला तिच्या घरी सोडून गडबडीतच घरी गेला. दुसऱ्या दिवशी त्याला खूप महत्वाची मिटींग अटेंड करायची होती. अर्थात मनालीही त्याच्याबरोबर जाणार होती. दुसऱ्या दिवशीही मिटींग आटपायला खूप उशीर झाला. पण मिटींग समाधानकारक झाल्याने दोघही खूप खूश होते. आदित्यची गाडी मनाली च्या बिल्डिंगबाहेर थांबली. तिने त्याला कॉफीसाठी घरी येण्याचा आग्रह केला. तो ही दिवसभराच्या दगदगीने थकला होता. त्यालाही एका कॉफीची गरज होतीच. दोघही घरी जाऊन कॉफी घेत निवांतपणे गप्पा मारत बसले होते. तितक्यात अभिषेक तिथे आला. मनालीने त्याची आणि आदित्यची ओळख करून दिली.
"मनाली जरा आत ये",  अस म्हणून अभिषेक आतल्या खोलीत गेला.
"एक्स्युज मी" अस आदित्यला म्हणून मनालीही त्याच्या मागोमाग गेली.   
     आदित्यला अभिषेकच वागणं खटकलं. पण तो काहीच बोलला नाही. थोड्याच वेळात आतल्या खोलीतून जोरजोरात भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले.
"किती दिवसांपासून चालू आहे हे...बॉस बरोबर अफेअर केल की झालं ...अग नसेन मी त्याच्याइतका यशस्वी पण होईन एक दिवस.. " अभिषेकचा ओरडत होता. अधून मधून मनाली चा गयावया केल्याचा आवाजही येत होता. अखेर हिम्मत करून आदित्य आतमध्ये गेला तेव्हा त्याने बघितले अभिषेकने मनालीवर हात उगारला होता. आदित्य ताबडतोब तिथून निघून घरी आला. घरी आल्यावर मनाली च्या घरचा प्रसंग त्याला आठवत होता. त्याने पेग वर पेग रिचवायाला सुरुवात केली.
   दुसऱ्या दिवशी मनाली सकाळीच आदित्यच्या घरी गेली. घर कसलं एक आलिशान बंगला होता तो; पण घरपण नसलेला. मनाली आत गेली तेव्हा आदित्य काहीसा नशेतच होता. मनालीने हिम्मत करुन आदल्या दिवशीच्या प्रसंगाबद्दल  त्याची माफी मागीतली.
 तिला थांबवत आदित्य म्हणाला, "तू कशाला माफी  मागतेयस? माफी तर मी मागीतली पाहिजे."
"तुम्ही का माफी मागताय माझी? तुमच काहीच चुकलेल नाहीये", मनाली.
 "तुझी नव्हे राधिकाची माफी मागायची आहे मला. तिला सॉरी म्हणायच आहे, राधिकाला; माझ्या पत्नीला!  चार वर्षांपूर्वी मी तिच्याशी असाच वागलो होतो, जसं काल अभिषेक तुझ्याशी वागत होता. शब्द वेगळे असतील पण ॲटीट्यूड मात्र तोच होता आणि म्हणूनच ती मला सोडून गेली," आदित्य नशेत असला तरी मनापासून बोलत होता.
  "मी समजले नाही", मनाली गोंधळून म्हणाली.
   "मनाली मी एकेकाळी एवढा सक्सेसफुल नव्हतो. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. आई बाबा मी  आठवीत असतानाच गेले. मग काकांनी माझी जबाबदारी घेतली. आमच घर सोडून मी काकांकडे रहायला गेलो. तिथे सतत त्यांच्या मुलाशी विकासची माझी तुलना केली जायची. काकू प्रत्येकवेळी सगळ्यांसमोर तो माझ्यापेक्षा किती सरस आहे हेच दाखवायचा प्रयत्न करायची. अखेर बारावी झाल्यावर मी ते घर सोडून माझ्या जुन्या घरी रहायला गेलो. पार्ट टाईम जॉब करुन कॉलेजच शिक्षण पूर्ण केल. त्यानंतर दुसरा जॉब न शोधता होता तोच जॉब सुरु ठेवूनच स्वतःचा छोटासा बिझनेस सुरु केला. त्या ऑफिसच्या सरांनी खूप मदत केली. त्याच ऑफिसच्या समोर राधिका रहायची. आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ते कळलंच नाही.  बिझनेस  धिम्या गतीने चालू होता. राधिकाही इंजिनिअर झाली आणि नोकरी करू लागली. तिला तिच्या ऑफिस मधल्या तिच्या एका सिनिअरचे स्थळ आल. ते स्थळ विकासच म्हणजेच माझ्या काकांच्या मुलाचेच होते. पण राधिकाने स्पष्ट नकार दिला आणि तिच्या घरीही तिने, 'ती माझ्याशीच लग्न करणार' असं  स्पष्ट सांगितल. आयुष्यात पहिल्यांदाच माझा इगो  सुखावला होता. घरच्यांचा विरोध पत्करून तिने माझ्याशी लग्न केले. आमचा संसार सुरु झाला. राधिकाची नोकरी चालूच होती. माझा बिझनेसमध्ये चांगलाच जम बसू लागला होता. मी जोमाने वाढणाऱ्या  बिझनेसमध्ये बिझी  होत होतो आणि अशातच एक दिवस एक वेगळाच आनंद घेऊन आला. राधिका प्रेग्नंट होती. आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.  राधिकाने नोकरी सोडली आणि काही महिन्यातच आमच्या घरी एक छोटीशी परी जन्माला आली. असेच चार महिने मजेत गेले. एक दोनदा मी विकासला आमच्या घराजवळून जाताना बघितले पण मी सोडून दिले. पण त्या दिवशी मिटींग कॅन्सल  झाल्यामुळे मी लवकर घरी आलो तर राधिका आणि विकास कॉफी घेत गप्पा मारत होते. मग मात्र माझा ताबा सुटला. मी तिला वाट्टेल ते बोललो. तिची बाजूला ऐकून न घेता तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. स्वाभिमानी राधिकाला हे सहन झाले नाही. ती आमच्या लहानग्या मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली." आदित्य भावनाविवश होऊन बोलत होता.
 “मग तुम्ही तिला परत घरी घेऊन यायचा प्रयत्न नाही केलात?" मनालीने विचारले.
आदित्यने नकारार्थी मान हलवली.
 "का तुमचा इगो,  विकासबद्दलचा तिरस्कार; तिच्या प्रेमापेक्षा अधिक महत्वाचा होता का?" मनाली.
  आदित्य निरुत्तर होता. "आज जर राधिका तुमच्या समोर आली तर तुम्ही काय कराल मिस्टर आदित्य?" मनाली
"तिची माफी मागून तिला घरी घेऊन येईन. खूप होरपळलोय या एकटेपणाच्या आगीत. तिच्या आठवणीत क्षणाक्षणाला तडफडतोय मी, आता तिची खूप गरज आहे मला." आदित्य.
"तुला गरज असताना राधिका तुझ्याजवळ नाही अस होईल का कधी?"
बोलता बोलता आलेल्या राधिकाच्या आवाजाने आदित्यने  दचकून मागे वळून पाहिले तर तिथे खरच राधिका आणि एका छोट्या मुलीला घेऊन अभिषेक उभा होता.
राधिकाला पाहून त्याला खूप आनंद झाला. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काय बोलावे दोघांनाही काहीच सुचत नव्हते.
    "राधिका... तू .... इथे?  आदित्य आनंदमिश्रित आश्चर्याने म्हणाला.
   "हो मी  परत आलेय आदि. जेवढा तू होरपळास तेवढीच मी सुद्धा होरपळलेय आणि या सगळ्यांची झळ नकळतपणे का होईना पण आपल्या परीलाही बसली आहे. अरे विकास फक्त मला परत ऑफिस जॉईन कर अस समजावत होता. त्याच्या किंवा माझ्या मनात दुसरं काहीच नव्हतं. तो माझा कलिग, माझा सिनिअर होता. बस यापलीकडे कधी आमच्यात साध मैत्रीचही नात निर्माण झालं नव्हतं." राधिका.
    "चुकलं माझ राधा. खरच चुकलं स्वतःच्या फाजील अहंकारामुळे मी तुला समजून घ्यायला कमी पडलो.  आज मनालीमुळे माझे डोळे उघडले. पण तू आत्ता इथे कशी आलीस ?" आदित्य.
 "कारण मला चांगला अभिनय करता आला. आणि हे आता सिद्ध झालं आहे आणि मला बेस्ट ॲक्टिंगच ॲवॉर्डही मिळाल", अभिषेक हसत म्हणाला.
     आदित्यने गोंधळून त्याच्याकडे बघितलं. त्याच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत अभिषेक म्हणाला, “कालच सगळ नाटक होत मि. आदित्य; मनालीच्या सांगण्यावरून केलेलं."
मनाली मिष्कील हसत म्हणाली, "राधिका माझ्या बिल्डिंगमध्येच रहाते. माझी आणि तिची ओळख झाली तेव्हा  सुरुवातीला मलाही काहीच माहिती नव्हते. पण मी AK ग्रूप मध्ये जॉब करते म्हटल्यावर तिच वागणं बदललं. ती मला टाळू लागली. मला संशय आला. पण मॅडम काही सांगतील तर ना. शेवटी मी सगळं शोधून काढलंच आणि तुम्हाला एकत्र आणायच ठरवलं. आज तुम्हा दोघांना एकत्र आलेलं बघून मला मनापासून आनंद होतोय. तुमची जुळलेली रेशीमगाठ अशीच आयुष्यभर अशीच राहूदे."
"थॅंक्स मनाली! तू माझ्या कंपनी बरोबर माझ आयुष्यही सावरलस. मी यासाठी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. आज अजून एक रेशीमगाठ जुळलेय आमच्या दोघांची तुम्हा दोघांशी. मी वचन देतो मी तुला मनाली, या दोन्ही रेशीमगाठी मी आयुष्यभर जपेन", आदित्य म्हणाला. 
 दुसऱ्या दिवशी AK ग्रूप मध्ये सगळ्यांना ई मेल  गेले. Due to some personal reason our chairman Mr. Aditya Kolhatkar Will unable to  attend the office for one month. Miss Manali Patwardhan will handle the office in his absence. official copy of Power of attorney is attached herewith......
©मानसी जोशी

Sunday, 14 January 2018

ब्लॅक

ब्लॅक! नुसतं ब्लॅक हा शब्द म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कुठलीना कुठली गोष्ट ही येतेच. 
  काहींच्या डोळ्यासमोर 'ब्लॅक मॅजिक' येत, तर काहींच्या डस्की स्किन. काही विज्ञानप्रेमींना  'ब्लॅक होल' आठवेल तर तत्वज्ञानींच्या नजरेसमोर  मात्र 'वर्णभेद' येइल. काहींना 'ब्लॅक मनी' तर काहींना   मात्र काळाकूट्ट 'अंधार' आठवेल. सद्ध्या संक्रांतीमुळे मात्र  अनेक स्त्रियांच्या डोळ्यासमोर ब्लॅक म्हटल्यावर काळी साडी किंवा ड्रेस  येत असेल.
     ब्लॅक! काळा रंग! हा रंग तिमिराकडून तेजाकडे जाताना क्षणाक्षणाला आपल्या छटा बदलून आपल्या नकळत नष्ट होतो तर संध्याकाळपासून रात्रीपर्यंत अगदी अलगद पाऊल न वाजवता सर्वदूर परसतो. कुठल्याही रंगात काळा रंग मिसळला तर त्या रंगाच अस्तित्वच नष्ट होतं.  रंगाचा बेरंग होतो अस म्हणतात ते हेच असाव बहुदा.
     काळ्या रंगाला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात येत. काळं म्हणजे वाईट असा एक (गैर?)समज समाजामध्ये आहे. एखाद्या गोष्टीत काही संशयास्पद असेल तर काही 'काळबेरं' तर नाही ना? अस म्हटल जात. लग्नासाठी बरेचदा 'गोऱ्या' मुलीचीच अपेक्षा असते. 'ब्लॅक मॅजिक' किंवा 'काळी जादू’ हा शब्दप्रयोग म्हणजे  काळ्या रंगाला अगदीच खलनायकी रंग दिल्यासारख आहे.
       हा रंग कसाही असला तरी मला आवडतो. प्रत्येक रंगात मिसळून आपलं अस्तित्व जपणारा असा हा रंग आहे. म्हणूनच की काय गोऱ्या रंगाच्या सौदर्यवतीपुढे अनेकदा  'डस्की ब्युटी' भाव खाऊन जाते. घनघोर अंधारात जाणवणाऱ्या नीरव शांततेत अनेकदा आयुष्याचा नवीन अर्थ कळतो. 
     बाकी काळ्या रंगाला कोणी कितीही नावं ठेवली तरी काही गोष्टींचा रंग मात्र काळाच असावा म्हणून अनेकांचा अट्टाहास असतो. उदाहरणार्थ केस ......
     मला मात्र काळ्या रंगांच्या कपड्यांच   पहिल्यापासूनच प्रचंड आकर्षण आहे. 'ब्लॅक  ॲन्ड रेड' हे माझ फेव्हरेट कॉम्बिनेशन आहे.  अशुभ मानल्या जाणाऱ्या काळ्या रंगाला संक्रातीमध्ये मात्र मानाचे स्थान मिळते. यामागे वैज्ञानिक किंवा धार्मिक कारण काहीही असल तरी याच सणाला  मुक्तपणे काळ्या रंगाचे कपडे घालता येतात.
©मानसी जोशी

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...