Sunday, 14 January 2018

ब्लॅक

ब्लॅक! नुसतं ब्लॅक हा शब्द म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कुठलीना कुठली गोष्ट ही येतेच. 
  काहींच्या डोळ्यासमोर 'ब्लॅक मॅजिक' येत, तर काहींच्या डस्की स्किन. काही विज्ञानप्रेमींना  'ब्लॅक होल' आठवेल तर तत्वज्ञानींच्या नजरेसमोर  मात्र 'वर्णभेद' येइल. काहींना 'ब्लॅक मनी' तर काहींना   मात्र काळाकूट्ट 'अंधार' आठवेल. सद्ध्या संक्रांतीमुळे मात्र  अनेक स्त्रियांच्या डोळ्यासमोर ब्लॅक म्हटल्यावर काळी साडी किंवा ड्रेस  येत असेल.
     ब्लॅक! काळा रंग! हा रंग तिमिराकडून तेजाकडे जाताना क्षणाक्षणाला आपल्या छटा बदलून आपल्या नकळत नष्ट होतो तर संध्याकाळपासून रात्रीपर्यंत अगदी अलगद पाऊल न वाजवता सर्वदूर परसतो. कुठल्याही रंगात काळा रंग मिसळला तर त्या रंगाच अस्तित्वच नष्ट होतं.  रंगाचा बेरंग होतो अस म्हणतात ते हेच असाव बहुदा.
     काळ्या रंगाला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात येत. काळं म्हणजे वाईट असा एक (गैर?)समज समाजामध्ये आहे. एखाद्या गोष्टीत काही संशयास्पद असेल तर काही 'काळबेरं' तर नाही ना? अस म्हटल जात. लग्नासाठी बरेचदा 'गोऱ्या' मुलीचीच अपेक्षा असते. 'ब्लॅक मॅजिक' किंवा 'काळी जादू’ हा शब्दप्रयोग म्हणजे  काळ्या रंगाला अगदीच खलनायकी रंग दिल्यासारख आहे.
       हा रंग कसाही असला तरी मला आवडतो. प्रत्येक रंगात मिसळून आपलं अस्तित्व जपणारा असा हा रंग आहे. म्हणूनच की काय गोऱ्या रंगाच्या सौदर्यवतीपुढे अनेकदा  'डस्की ब्युटी' भाव खाऊन जाते. घनघोर अंधारात जाणवणाऱ्या नीरव शांततेत अनेकदा आयुष्याचा नवीन अर्थ कळतो. 
     बाकी काळ्या रंगाला कोणी कितीही नावं ठेवली तरी काही गोष्टींचा रंग मात्र काळाच असावा म्हणून अनेकांचा अट्टाहास असतो. उदाहरणार्थ केस ......
     मला मात्र काळ्या रंगांच्या कपड्यांच   पहिल्यापासूनच प्रचंड आकर्षण आहे. 'ब्लॅक  ॲन्ड रेड' हे माझ फेव्हरेट कॉम्बिनेशन आहे.  अशुभ मानल्या जाणाऱ्या काळ्या रंगाला संक्रातीमध्ये मात्र मानाचे स्थान मिळते. यामागे वैज्ञानिक किंवा धार्मिक कारण काहीही असल तरी याच सणाला  मुक्तपणे काळ्या रंगाचे कपडे घालता येतात.
©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...