Tuesday, 2 January 2018

हैदराबाद मेमरीज....

 यावेळी विकेन्ड, मन्थ एंड आणि इअर एंड सगळं एकत्रच आलं होतं. हा विकेन्ड माझ्यासाठी जरा खासच होता. गेले तीन वर्ष रेंगाळलेली; या ना त्या कारणाने सतत कॅन्सल होणारी हैदराबाद ट्रिप यावेळी मात्र मस्त जमून आली. शुक्रवारी रात्री पुण्याहून निघून शनिवारी सकाळी हैदराबादला पोचलो आणि वेगवेगळे  अनुभव यायला सुरुवात झाली. हॉटेलमध्ये चेक इन टायमिंग बारा वाजता असल्यामुळे काही तास वेटिंग रुममध्ये बसून रहावं लागणार हे अपेक्षितच होतं. पण तिथे बसल्यावर  रेस्टॉरंटमधल्या नॉनव्हेजच्या वासामूळे मला प्रचंड मळमळायला लागलं. थोड्या वेळाने वेटिंग रुमच्या समोरच्या 'ट्रॅव्हल डेस्क' वर sightseeing ची  चौकशी करुन त्यांचीच कॅब फिक्स केली आणि जादूची काडी फिरल्यासारखी 10 मिनिटात आम्हाला रुम मिळाली ती ही वेळेच्या चक्क तासभर आधी. हे आधीच करायला हवं होत अस उगाचच वाटून गेलं.
     रुममध्ये गेल्यावर लक्षात आलं; बुकिंग पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या  कुठल्याच ॲमिनिटीज आमच्या रुममध्ये नव्हत्या. हॉटेल बुकिंग मी केलेलं होतं.  त्यामुळे मी रिसेप्शनवर जाऊन मॅनेजरशी बोलायचं ठरवल. मी त्यांच्याशी बोलायला जाणार म्हटल्यावर आमच्या 'अहोंना' थोडी काळजी वाटली; अहं माझी नव्हे .. हॉटेल मॅनेजरची! ऑनलाईन बुकिंग करतेवेळी घेतलेले  सगळे स्क्रिनशॉट्स माझ्याजवळ होते. तिथे गेल्यावर मॅनेजमेन्टशी झालेल्या  वादसदृष चर्चेअंती 'ट्रॅव्हल वेबसाईटला' मेल करुन मॅनेजरने जवळपास सगळ्याच ॲमिनिटीज द्यायचं कबूल केलं. हा सगळा प्रकार बघून  हॉटेलच्या मॅनेजमेंट टिममधल्या एकाने मला प्रश्न विचारला, "मॅम आप पुनासे हो क्या?" त्यांच्या या प्रश्नावर त्या वैतागलेल्या अवस्थेतही मला हसू आलं. मान हलवून हो म्हणून मी तिथून रुममध्ये परत आले.
     पहिल्या दिवशी सालरजंग म्युझिअम, चारमिनार, NTR गार्डन, बिर्ला मंदीर करुन संध्याकाळी 'स्नो वर्ल्ड' आणि शॉपिंग केलं. स्नो वर्ल्ड Entry fee च्या मानाने एवढं काही छान आहे असं नाही वाटलं मला. एका तासाच सेशन असतं पण  जास्तीत जास्त 45 मिनिटे आपण तिथे थांबू शकतो. माझी तर अवस्था खूपच बिकट झाली होती. थंडी इतकी वाजत होती की आता आपल्याला ताप येतोय की काय असं एक क्षण वाटून गेलं. बाहेर आल्यावर गरमागरम कॉफी घेतल्यावर जरा बरं वाटलं. त्यानंतर रात्री हुसेनसागर लेक आणि लुंबिनी पार्क बघितल. हुसेनसागर लेक वरुन फेरीबोटीने लुंबिनी पार्कला जातात. तिथे गौतम बुद्धांचा मोठा पुतळा वगळता बघण्यासारखं विशेष असं काही नाही. लेकमधील पाण्यालाही  अतिशय घाण वास येतो.
      दुसऱ्या दिवशी 'रामोजी फिल्मसिटी' बघितली. रामोजी फिल्मसिटी मात्र  बघण्यासारखी आहे. हैदराबाद टूरचा  एक पूर्ण दिवस इथे देणं आवश्यक आहे. एकदा 'इंट्री फी' दिली की काही ठराविक राईड्स आणि खाण्यावरचा खर्च वगळता  आतमध्ये गेल्यावर कसलेही चार्जेस द्यावे लागत नाहीत.  जवळपास दोन हजार एकरच्या परिसरात पसरलेल्या आवारात फिरण्यासाठी त्यांच्या बसेस सतत चालू असतात. या बसेसचे पिकअप / ड्रॉपअप पॉइंट्स ठरलेले असतात. पूर्ण परिसर फिरताना जवळपास 5 ते 6 बसेस आपल्याला बदलाव्या लागतात.  आमची सुरुवात मात्र बसच्या अपघाताने झाली. सुदैवाने कोणाला काही लागल नाही. अवघ्या पाचव्या मिनिटात  दुसरी बस आली. सगळा दिवस फिरुन आपण दमतो तरीही रामोजीचा एखाद दुसरा पॉइन्ट बघायचा राहून जातोच.
     तिसऱ्या दिवशी गोलकोंडा फोर्ट आणि जनरल हैदराबाद फिरलो. गोवळकोंडा फोर्ट मात्र अस्वच्छ आहे. सगळीकडे प्लॅस्टिक बाटल्या आणि रॅपर्सचा कचरा, पडके बुरुज, भिंतींवर लिहिलेली नावं, शेवाळीत बुडलेला अस्वच्छ तलाव या साऱ्यामूळे हा फोर्ट अगदीच भकास वाटतो.
       हैदराबादच्या sightseeing मध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी काहीना काही entry fee आहेच. प्रत्येक ठिकाणी  लेडीज आणि जेन्ड्स ला आत जायला वेगळी रांग आहे. सिक्युरिटी चेकिंग अगदी काटेकोरपणे केलं जातं. रस्त्यावरही पोलिसांचा सतत फिरता पहारा असतो.  हैदराबादच्या प्रवासात आलेला अनुभव म्हणजे इथल्या लोकांचा पाहुणचार. कुठल्याही हॉटेलमध्ये अगदी आग्रहाने आणि उत्साहाने पदार्थांबद्दल सांगतात. तोंडावर सतत बारा वाजलेल्या अवस्थेत मख्खपणे फिरणारे वेटर्स इथल्या कुठल्याही हॉटेलमध्ये दिसले नाहीत. बाकी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटतेय ती म्हणजे पुण्याच्या ट्रॅफिकला नावं ठेवणाऱ्यानी फक्त एकदा हैदराबादच बेशिस्त ट्रॅफिक नजरेखालून जरुर घालावं.

©मानसी जोशी

बर्ड्स पार्क @ रामोजी फिल्म सिटी

बाहुबली सेट @ रामोजी फिल्मसिटी
बिर्ला टेंपल 



No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...