Tuesday, 16 January 2018

कथा - रेशीमगाठ

रेशीमगाठ

आदित्य कोल्हटकर, एक सक्सेसफुल बिझनेसमन! अतिशय गरीब परिस्थितीतून आपल्या मेहनतीच्या जोरावर आयुष्यात यशस्वी झालेला. अगदीच नाही पण काहीसा अबोल. मनातल सारं मनातच ठेवणारा. लाथ मारेन तिथे पाणी काढेन इतका आत्मविश्वास असणारा आदित्य अनेकांना त्यांचा आयडॉल वाटत होता तर अनेकजण त्याच्यावर  जळत  होते. कितीही नाही  म्हटल तरी आदित्यला यशाची थोडी नशा चढलेली होतीच. कंपनीतही मी म्हणेन ती पूर्व असा ॲटीट्यूड ठेवून वावरणारा आदित्य अनेकांच्या हिट लिस्टवर होता. 'नाही' हा शब्द त्याच्या खिजगणतीतही नव्हता. आदित्यने घेतलेला निर्णय हा नेहमी अंतिम निर्णय असे त्याला विरोध करायची हिम्मत कोणामध्येच नव्हती. 
     आदित्य बिझनेसमन म्हणून कितीही स्ट्रिक्ट असला तरीही तो एक चांगला एंप्लॉयर होता यात वादच नव्हता. कंपनीमध्ये अगदी सामन्य वर्कर ते हाय प्रोफाइल एंप्लॉयीपर्यंत प्रत्येकजण अगदी आनंदाने नोकरी करत होता. कंपनीमधल वातावरण नेहमी हेल्दी  रहावं यासाठी आदित्य नेहमी प्रयत्नशील असे. कंपनीमध्ये कोणालाही आर्थिक  मदतीची गरज असेल तर आदित्य स्वतः जातीने लक्ष घालून त्याला मदत करीत असे.   आदित्यचा प्रत्येक निर्णय जसा कंपनीच्या हिताचा असे तसा तो वर्कर्स आणि एंपलॉयीज यांचाही विचार करुन घेतलेला असे. AK ग्रूपमध्ये काम करणं हे अनेकांच स्वप्न होत. पण तरीही चंद्रावरचा डाग म्हणजे आदित्यचा 'अहं - मी जे करतो तेच योग्य' असा ॲटीट्यूड.
मनाली पटवर्धन म्हणजे ब्युटी विथ ब्रेनच एक परिपूर्ण उदाहरण. तिच्या हुशारीवर कोणी तीळमात्रही शंका घेऊ शकत नव्हत. MBA फायनान्स झालेली मनाली प्रचंड हुशार तर होतीच त्याच जोडीने ती अत्यंत प्रामाणिक आणि संवेदनशील मुलगी होती.
 मनालीने AK ग्रूप जॉईन केल्यापासून कंपनीमध्ये असे अनेकजण होते ज्यांना  तिचा हेवा वाटत असे. क्वालिफिकेशन आणि अनुभव यापेक्षा मेहनत आणि हुशारीला प्राधान्य देणाऱ्या आदित्यने अत्यल्प अनुभव असणाऱ्या मनालीला कंपनीमध्ये खूप वरची पोझिशन दिली होती. त्यामुळे सहाजिकच अनेकांना तिचा हेवा वाटत असे.
    त्या दिवशी  मिटिंगमध्ये एका प्रोजेक्टसंदर्भात आदित्यने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांवर चर्चा चालू होती. आदित्यने घेतलेले काही निर्णय अनेकांना पटत नव्हते. पण  आदित्यच्या निर्णयाला विरोध करायचा म्हणजे स्वतःचा अपमान करुन घेणे. त्यात पुन्हा नोकरी जाण्याचा धोका ही होताच. अगदी नोकरी गेली नाही तरी आदित्यच्या 'हिट लिस्टमध्ये' ॲड व्हायची रिस्क कोणालाच घ्यायची नव्हती.
      आदित्य अगदी आत्मविश्वासाने प्रेसेंटेशन करत होता. प्रेसेंटेशन संपल्यावर जवळपास मिटिंग संपल्यातच जमा होती. पण मिटिंग संपण्यापूर्वी मनाली उठून आदित्यला म्हणाली , " आय ॲम सॉरी सर बट आय थिंक यू शुड थिंक अबाऊट युअर डिसिजन".
"व्हॉट यू वॉन्ट टू से मिस मनाली?" आदित्य.
   मनाली आणि आदित्यच बोलण ऐकून मिटिंगमध्ये असलेल्या अनेकांनी भुवया उंचावल्या. इतकी वर्ष या कंपनीमध्ये काढूनही आदित्यशी या भाषेत बोलायची हिम्मत आपण कधीही केली नाही आणि ही काही महिन्यांपूर्वी जॉईन झालेली आणि फारसा अनुभव नसलेली मुलगी अशा भाषेत आदित्यशी बोलतेय याच सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आता बहुदा मनाली आदित्यच्या 'हिट लिस्टवर' जाणार किंवा कंपनीतून बाहेर जाणार; अस तिथे असलेल्या प्रत्येकालाच वाटत होतं.
    "तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं मला वाटतय. तुम्ही जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे कदाचित  कंपनीला तोटा होवू शकत; अस माझा अभ्यास सांगतोय. खरतर माझ्यापेक्षा खूप अनुभवी मेंबर्स इथे उपस्थित आहेत तरीही त्यांच्यापैकी  कोणीच काही बोलत नाहीये याच मला प्रचंड  आश्चर्य वाटतय." मनाली आत्मविश्वासाने म्हणाली.
    मनालीच्या या बोलण्यानंतर मिटिंगमध्ये चुळबुळ सुरु झाली. आता आदित्यचा स्टॅंड काय असेल यावरच सगळ्यांच लक्ष केंद्रित झाल होत.
"ओके, तुम्हाला  माझ प्रेसेंटेशन बेसलेस किंवा इलॉजिकल किंवा चुकीच्या गृहितकांवर आधारीत असणार असं वाटतय का ?
"सॉरी सर मला तस नव्हतं म्हणायच पण काही मुद्दे चुकीचे वाटत आहेत", मनाली.
"ठिक आहे. नो प्रॉब्लेम,  कॅन यू प्रूव्ह  इट?" आदित्य.
"येस आय कॅन." मनाली.
"देन गो अहेड ॲंड प्रूव्ह द सेम." आदित्य
    मनाली पटकन पुढे आली आणि तिने आदित्यच प्रेसेंटेशन ओपन करुन त्यातल्या त्रूटी सांगायला सुरवात केली. मिटिंगमध्ये 'पिनड्रॉप सायलेन्स' होता. आदित्य लक्षपूर्वक मनालीच बोलणं ऐकत होता. गेल्या काही वर्षात त्याला प्रथमच कोणाकडून तरी विरोध झाला होता. खरतर आदित्यला मनालीला चुकीच ठरवायची खूप इच्छा होती आणि म्हणूनच तो तिचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होता.
     मनालीच प्रेसेंटेशन संपल्यानंतर  मात्र काही जणांनी आदित्यला 'मनालीच म्हणणं बरोबर आहे' हे सुचवायचा प्रयत्न केला. तर काहींनी आदित्यची बाजू घेतली. बऱ्याच वेळ चाललेल्या डिस्कशनमध्ये आदित्य मात्र शांतपणे बसून विचार करत होता. कुठेतरी त्याला मनालीचे काही मुद्दे पटत होते.अखेर आदित्यने दुसऱ्या दिवशी पुन्हा मिटींग घ्यायचा डिसीजन घेतला.
      मिटींग संपल्यानंतर ऑफिसमध्ये फक्त मिटिंगचीच चर्चा रंगली होती. काहींना मनाली 'ग्रेट' वाटत होती तर काहींच्या दृष्टीने ती 'आगाऊ' मुलगी होती.
     त्या दिवशी आदित्य मात्र रात्री उशीरापर्यंत केबिनमध्ये बसून विचार करत होता. त्याने  प्रेसेंटेशेनचा पुन्हा नव्याने अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आल की खरच मनालीने त्याच्या कंपनीला खूप मोठ नुकसान होण्यापासून वाचवलं आहे. मनालीच्या हुशारीवर, तिच्या कामाप्रती असणाऱ्या निष्ठेवर आदित्य खुश झाला. प्रेसेंटेशनमध्ये आवश्यक ते बदल करुनच आदित्य घरी गेला. दुसऱ्या दिवशी मिटिंगमध्ये आदित्यने मनालीच कौतुक केल आणि नव्याने तयार केलेलं प्रेसेंटेशन सगळ्यांसमोर ठेवलं. मनालीमुळे आता बाकीच्यांनाही धीर आला होता. प्रत्येकजण 'डिसिजन मेकिंग' मध्ये भाग घेत होता. कंपनीमध्ये झालेला हा पॉझिटिव्ह चेंज बघून मनाली मनोमन सुखावली आणि हा बदल असाच कायम रहावा म्हणून नकळत तिने देवाकडे प्रार्थना केली.
       यानंतर आदित्य आणि मनालीमध्ये  एक निखळ मैत्रीचे नाते निर्माण होऊ लागल. मनाली काही महिन्यांपूर्वीच ऑफिसमध्ये रुजू झाली होती. त्यामुळे नवीन एंप्लॉयशी आदित्यची वाढत चाललेली सलगी अनेकांच्या डोळ्यात खुपत होती. आदित्यशी काही बोलायची कोणाची हिम्मत नव्हती. सहाजिकच  काही जणांनी आदित्य विरोधात मनालीचे कान भरायला सुरुवात केली. आदित्यचा ॲटीट्यूड, त्याचा इगो, एवढच नव्हे तर त्याची बायको त्याला चार वर्षापूर्वीच सोडून गेली आहे; हे सुद्धा मनालीच्या कानावर आलं होतं. पण मनाली शांत होती. मुळातच हुशार आणि संस्कारी असणाऱ्या मनालीला एक गोष्ट नक्की माहिती होती; ती म्हणजे कुठलाही माणूस मुळात वाईट नसतो परिस्थिती त्याला तस बनवत असते. तिने आदित्यविषयी जाणून घेऊन त्याला बदलायच ठरवलं. अशा या संस्कारी मनाली च्या सान्निध्यात आदित्यही हळूहळू निवळत होता.
 त्यादिवशी संध्याकाळी  क्लाएंटच्या ऑफिसमधून कंटाळवाणी मिटींग आटपून आदित्य आणि मनाली बाहेर पडले. बाहेर पडताच मोकळ्या वातावरणात आल्यावर दोघांना खूप बरं वाटल. मस्त पावसाळी हवा होती. आदित्यने तिथल्या जवळच्या कॉफी शॉपसमोर गाडी थांबवली. दोघांना खरच गरज होती एका शांत कॉफीची.
      मनाली कॉफीशॉपच्या काचेतून बाहेरच्या रोडवरची गर्दी बघत शांतपणे बसली होती. आदित्यने सहज तिच्याकडे बघितल. तिचा शांत, सुंदर, आत्मविश्वासी चेहरा बघून त्याचा थकवा कुठल्याकुठे पळाला. मनाली ऑफिसला जॉईन झाल्या दिवसापासून तिच्याबद्दल त्याला एक प्रकारच सुप्त आकर्षण आणि एक वेगळीच आत्मीयता जाणवत होती. तिच्या हुशारीच कौतुक तर होतच पण त्याही पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून मनाली त्याला मनापासून आवडत होती.  वेटरने कॉफीचे दोन वाफाळते मग टेबलवर आणून ठेवले. काही क्षणांची शांतता त्या मग ठेवण्याच्या आवाजाने भंग  पावली. आदित्य आणि मनाली अजूनही शांतच होते. अखेर आदित्य कॉफी घेता घेता मनालीला म्हणाला, "मनाली तू खरच खूप टॅलेंटेड आहेस. तू म्हणजे 'ब्यूटी विथ ब्रेन'च एक परिपूर्ण उदाहरण आहेस."
 "प्रपोज  करायचा विचार आहे का?" मनाली ने हसतच विचारलं.
 "हो विचार तर होता पण तुझ्या बोटातली एंगेजमेंट रिंग मला माझा विचार प्रत्यक्षात आणू देत नाहीये", आदित्य हसत म्हणाला.
"ओह! स्मार्ट हा! असणारच म्हणा; आफ्टरऑल यू आर आदित्य कोल्हटकर." मनाली हसत म्हणाली.
"बरं मला कळू दे तरी कोण आहे तो भाग्यवान?" आदित्यने विचारलं.
 "अभिषेक बापट, स्ट्रगलिंग ॲक्टर आहे.  कॉफी संपवतच मनाली म्हणाली.
"बापरे म्हणजे काही दिवसातच सेलिब्रेटी होणार तू!"
     आदित्यच्या या वाक्यावर दोघही मनमोकळेपणे हसले. आदित्यला आठवलं कितीतरी दिवसांनी तो एवढा मनमोकळा हसत होता. राधिकाला भेटायचा तेव्हाही अशाच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. राधिकाची आठवण आली आणि जखमेवरची खपली निघाली. तिच्या आठवणींनी त्याच मन भरून आल.
    त्यानंतर आदित्य मनालीला तिच्या घरी सोडून गडबडीतच घरी गेला. दुसऱ्या दिवशी त्याला खूप महत्वाची मिटींग अटेंड करायची होती. अर्थात मनालीही त्याच्याबरोबर जाणार होती. दुसऱ्या दिवशीही मिटींग आटपायला खूप उशीर झाला. पण मिटींग समाधानकारक झाल्याने दोघही खूप खूश होते. आदित्यची गाडी मनाली च्या बिल्डिंगबाहेर थांबली. तिने त्याला कॉफीसाठी घरी येण्याचा आग्रह केला. तो ही दिवसभराच्या दगदगीने थकला होता. त्यालाही एका कॉफीची गरज होतीच. दोघही घरी जाऊन कॉफी घेत निवांतपणे गप्पा मारत बसले होते. तितक्यात अभिषेक तिथे आला. मनालीने त्याची आणि आदित्यची ओळख करून दिली.
"मनाली जरा आत ये",  अस म्हणून अभिषेक आतल्या खोलीत गेला.
"एक्स्युज मी" अस आदित्यला म्हणून मनालीही त्याच्या मागोमाग गेली.   
     आदित्यला अभिषेकच वागणं खटकलं. पण तो काहीच बोलला नाही. थोड्याच वेळात आतल्या खोलीतून जोरजोरात भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले.
"किती दिवसांपासून चालू आहे हे...बॉस बरोबर अफेअर केल की झालं ...अग नसेन मी त्याच्याइतका यशस्वी पण होईन एक दिवस.. " अभिषेकचा ओरडत होता. अधून मधून मनाली चा गयावया केल्याचा आवाजही येत होता. अखेर हिम्मत करून आदित्य आतमध्ये गेला तेव्हा त्याने बघितले अभिषेकने मनालीवर हात उगारला होता. आदित्य ताबडतोब तिथून निघून घरी आला. घरी आल्यावर मनाली च्या घरचा प्रसंग त्याला आठवत होता. त्याने पेग वर पेग रिचवायाला सुरुवात केली.
   दुसऱ्या दिवशी मनाली सकाळीच आदित्यच्या घरी गेली. घर कसलं एक आलिशान बंगला होता तो; पण घरपण नसलेला. मनाली आत गेली तेव्हा आदित्य काहीसा नशेतच होता. मनालीने हिम्मत करुन आदल्या दिवशीच्या प्रसंगाबद्दल  त्याची माफी मागीतली.
 तिला थांबवत आदित्य म्हणाला, "तू कशाला माफी  मागतेयस? माफी तर मी मागीतली पाहिजे."
"तुम्ही का माफी मागताय माझी? तुमच काहीच चुकलेल नाहीये", मनाली.
 "तुझी नव्हे राधिकाची माफी मागायची आहे मला. तिला सॉरी म्हणायच आहे, राधिकाला; माझ्या पत्नीला!  चार वर्षांपूर्वी मी तिच्याशी असाच वागलो होतो, जसं काल अभिषेक तुझ्याशी वागत होता. शब्द वेगळे असतील पण ॲटीट्यूड मात्र तोच होता आणि म्हणूनच ती मला सोडून गेली," आदित्य नशेत असला तरी मनापासून बोलत होता.
  "मी समजले नाही", मनाली गोंधळून म्हणाली.
   "मनाली मी एकेकाळी एवढा सक्सेसफुल नव्हतो. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. आई बाबा मी  आठवीत असतानाच गेले. मग काकांनी माझी जबाबदारी घेतली. आमच घर सोडून मी काकांकडे रहायला गेलो. तिथे सतत त्यांच्या मुलाशी विकासची माझी तुलना केली जायची. काकू प्रत्येकवेळी सगळ्यांसमोर तो माझ्यापेक्षा किती सरस आहे हेच दाखवायचा प्रयत्न करायची. अखेर बारावी झाल्यावर मी ते घर सोडून माझ्या जुन्या घरी रहायला गेलो. पार्ट टाईम जॉब करुन कॉलेजच शिक्षण पूर्ण केल. त्यानंतर दुसरा जॉब न शोधता होता तोच जॉब सुरु ठेवूनच स्वतःचा छोटासा बिझनेस सुरु केला. त्या ऑफिसच्या सरांनी खूप मदत केली. त्याच ऑफिसच्या समोर राधिका रहायची. आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ते कळलंच नाही.  बिझनेस  धिम्या गतीने चालू होता. राधिकाही इंजिनिअर झाली आणि नोकरी करू लागली. तिला तिच्या ऑफिस मधल्या तिच्या एका सिनिअरचे स्थळ आल. ते स्थळ विकासच म्हणजेच माझ्या काकांच्या मुलाचेच होते. पण राधिकाने स्पष्ट नकार दिला आणि तिच्या घरीही तिने, 'ती माझ्याशीच लग्न करणार' असं  स्पष्ट सांगितल. आयुष्यात पहिल्यांदाच माझा इगो  सुखावला होता. घरच्यांचा विरोध पत्करून तिने माझ्याशी लग्न केले. आमचा संसार सुरु झाला. राधिकाची नोकरी चालूच होती. माझा बिझनेसमध्ये चांगलाच जम बसू लागला होता. मी जोमाने वाढणाऱ्या  बिझनेसमध्ये बिझी  होत होतो आणि अशातच एक दिवस एक वेगळाच आनंद घेऊन आला. राधिका प्रेग्नंट होती. आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.  राधिकाने नोकरी सोडली आणि काही महिन्यातच आमच्या घरी एक छोटीशी परी जन्माला आली. असेच चार महिने मजेत गेले. एक दोनदा मी विकासला आमच्या घराजवळून जाताना बघितले पण मी सोडून दिले. पण त्या दिवशी मिटींग कॅन्सल  झाल्यामुळे मी लवकर घरी आलो तर राधिका आणि विकास कॉफी घेत गप्पा मारत होते. मग मात्र माझा ताबा सुटला. मी तिला वाट्टेल ते बोललो. तिची बाजूला ऐकून न घेता तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. स्वाभिमानी राधिकाला हे सहन झाले नाही. ती आमच्या लहानग्या मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली." आदित्य भावनाविवश होऊन बोलत होता.
 “मग तुम्ही तिला परत घरी घेऊन यायचा प्रयत्न नाही केलात?" मनालीने विचारले.
आदित्यने नकारार्थी मान हलवली.
 "का तुमचा इगो,  विकासबद्दलचा तिरस्कार; तिच्या प्रेमापेक्षा अधिक महत्वाचा होता का?" मनाली.
  आदित्य निरुत्तर होता. "आज जर राधिका तुमच्या समोर आली तर तुम्ही काय कराल मिस्टर आदित्य?" मनाली
"तिची माफी मागून तिला घरी घेऊन येईन. खूप होरपळलोय या एकटेपणाच्या आगीत. तिच्या आठवणीत क्षणाक्षणाला तडफडतोय मी, आता तिची खूप गरज आहे मला." आदित्य.
"तुला गरज असताना राधिका तुझ्याजवळ नाही अस होईल का कधी?"
बोलता बोलता आलेल्या राधिकाच्या आवाजाने आदित्यने  दचकून मागे वळून पाहिले तर तिथे खरच राधिका आणि एका छोट्या मुलीला घेऊन अभिषेक उभा होता.
राधिकाला पाहून त्याला खूप आनंद झाला. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काय बोलावे दोघांनाही काहीच सुचत नव्हते.
    "राधिका... तू .... इथे?  आदित्य आनंदमिश्रित आश्चर्याने म्हणाला.
   "हो मी  परत आलेय आदि. जेवढा तू होरपळास तेवढीच मी सुद्धा होरपळलेय आणि या सगळ्यांची झळ नकळतपणे का होईना पण आपल्या परीलाही बसली आहे. अरे विकास फक्त मला परत ऑफिस जॉईन कर अस समजावत होता. त्याच्या किंवा माझ्या मनात दुसरं काहीच नव्हतं. तो माझा कलिग, माझा सिनिअर होता. बस यापलीकडे कधी आमच्यात साध मैत्रीचही नात निर्माण झालं नव्हतं." राधिका.
    "चुकलं माझ राधा. खरच चुकलं स्वतःच्या फाजील अहंकारामुळे मी तुला समजून घ्यायला कमी पडलो.  आज मनालीमुळे माझे डोळे उघडले. पण तू आत्ता इथे कशी आलीस ?" आदित्य.
 "कारण मला चांगला अभिनय करता आला. आणि हे आता सिद्ध झालं आहे आणि मला बेस्ट ॲक्टिंगच ॲवॉर्डही मिळाल", अभिषेक हसत म्हणाला.
     आदित्यने गोंधळून त्याच्याकडे बघितलं. त्याच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत अभिषेक म्हणाला, “कालच सगळ नाटक होत मि. आदित्य; मनालीच्या सांगण्यावरून केलेलं."
मनाली मिष्कील हसत म्हणाली, "राधिका माझ्या बिल्डिंगमध्येच रहाते. माझी आणि तिची ओळख झाली तेव्हा  सुरुवातीला मलाही काहीच माहिती नव्हते. पण मी AK ग्रूप मध्ये जॉब करते म्हटल्यावर तिच वागणं बदललं. ती मला टाळू लागली. मला संशय आला. पण मॅडम काही सांगतील तर ना. शेवटी मी सगळं शोधून काढलंच आणि तुम्हाला एकत्र आणायच ठरवलं. आज तुम्हा दोघांना एकत्र आलेलं बघून मला मनापासून आनंद होतोय. तुमची जुळलेली रेशीमगाठ अशीच आयुष्यभर अशीच राहूदे."
"थॅंक्स मनाली! तू माझ्या कंपनी बरोबर माझ आयुष्यही सावरलस. मी यासाठी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. आज अजून एक रेशीमगाठ जुळलेय आमच्या दोघांची तुम्हा दोघांशी. मी वचन देतो मी तुला मनाली, या दोन्ही रेशीमगाठी मी आयुष्यभर जपेन", आदित्य म्हणाला. 
 दुसऱ्या दिवशी AK ग्रूप मध्ये सगळ्यांना ई मेल  गेले. Due to some personal reason our chairman Mr. Aditya Kolhatkar Will unable to  attend the office for one month. Miss Manali Patwardhan will handle the office in his absence. official copy of Power of attorney is attached herewith......
©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...