Friday, 19 January 2018

तुझे आहे तुजपाशी

    आज मॉर्निंग वॉकला गेले तेव्हा दोन मुके मित्र एकमेकांशी बोलताना दिसते. बोलताना म्हणजे हातवारे करुन एकमेकांशी संवाद साधताना. खरंतर हे दोघेही मला बरेचदा एकमेकांशी छान संवाद साधत मॉर्निंग वॉक करताना दिसतात.  बोलता येत नसलं तरी छान संवाद साधता येतो हे अशा लोकांकडे बघून जाणवतं. गेले चार दिवस "तोंड आल्यामुळे" मला बोलता येत नाहीये. त्यामुळे माझी सहाजिकच चिडचिड होतेय. पण ज्यांना आयुष्यात कधी बोलताच आलं नाही किंवा येणार नाही, अशा लोकांच दु:ख किती मोठ असेल? पण या गोष्टीचा कुठलाही बाऊ न करता एकमेकांशी छान संवाद साधत मॉर्निंग वॉक करणारे ते मित्र बघून मला जाणवलं छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण किती पॅनिक होतो. खरंच याची गरज असते का? माझ्या माहितीत अशी काही जोडपी आहेत ज्यांना बोलता येत नाही (दोघही मुकी आहेत). पण जेव्हा त्यांना कळलं की त्यांचा मुलगा बोलू शकतो तेव्हा मात्र त्यांना प्रचंड आनंद झाला. आपल्या बाळाच्या तोंडून जेव्हा आपण 'पहिला' शब्द ऐकतो तेव्हा आपणही किती खूष होतो; तर आयुष्यभर मुकेपण सोसणाऱ्या माणसांना किती आनंद होत असेल, याची आपण कल्पनाही करु शकत नाही.

      "ऑल द बेस्ट" नाटकातील एक प्रसंग मला चांगलाच आठवतोय. या नाटकात आधंळा,बहिरा आणि मुका असे तीन मित्र असतात आणि हे तिघेही एकाच मुलीवर प्रेम करत असतात. यातला मुका मुलगा जेव्हा आपलं प्रेम व्यक्त करायचं ठरवतो, तेव्हा त्याच्यासमोर सगळ्यात मोठी अडचड असते ती संवादाची. तो आपल्या परीने तिला सांगायचा प्रयत्न करत असतो. पण तिला नीटसं काहीच समजत नसतं. अखेर हताश होवून तो कागद पेन हातात घेतो. पण ती त्याला थांबवते आणि संवाद साधायचा प्रयत्न करायला सांगते. हा प्रसंग अगदीच 'हार्ट टचिंग' या कॅटॅगरीला;  डोळ्यात पाणी आणणारा!

      आमच्या कॉलेजमध्ये दीक्षित नावाचे एक इंग्रजीचे प्रोफेसर होते. ते जन्मत: आंधळे नव्हते पण चुकीचे ड्रॉप्स डोळ्यात घातले गेल्यामुळे लहानपणीच त्यांना अंधत्व आलं होतं. पण परिस्थितीशी दोन हात करुन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीही केली. सामान्यातले असामान्य म्हणतात ते असेच असावेत बहुदा.

    आपल्याजवळ असणाऱ्या अनेक गोष्टींची साधी कल्पनाही आपल्याला नसते.  काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मैत्रीणीचं मिसकॅरेज झालं होत त्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती. आधीच खूप वर्षांनी ती प्रेग्नंट राहिली होती. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक पाचव्या महिन्यात तिचं मिसकॅरेज झाल्यामुळे ती खूप दु:खी होती. तिच्याशी फोनवर बोलत असताना माझी मुलगी मला सतत हाका मारुन, काही ना काही विचारुन डिस्टर्ब करत होती. मी तिच्यावर वैतागले तर पलीकडून मैत्रीण म्हणाली, "नको ग चिडूस तिच्यावर. तिच्या रुपाने खूप मोठं सुख मिळालंय तुला आयुष्यात. आणि कुठल्याही स्त्री साठी इतर कुठल्याही हाकेपेक्षा 'आई' म्हणून मारलेली हाक किती महत्वाची असते, हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच सांगू शकत नाही. तुला नाही कळणार हे दु:ख कारण तू दिवसातून सतत ती हाक ऐकत असतेस. तिचं बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले. खरच खूप वाईट वाटलं होतं तेव्हा.

     आपण नेहमीच आपल्याजवळ जे नाही त्याचा विचार करुन कुढत रहातो. जरा मोकळेपणाने आपल्याला खूप काही मिळालं आहे असा विचार केला तर कदाचित आयुष्यात बराच फरक पडू शकेल. अनेक प्रॉब्लेम्स जे आपल्याला खूप मोठे वाटतात; ते अगदीच सर्वसामान्य वाटू लागतील.  problems are too easy we make them difficult.

©मानसी जोशी


No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...