Sunday, 5 March 2017

कथा - फ्रेंड रिक्वेस्ट

फ्रेंड रिक्वेस्ट

"काय सतत लॅपटॉपमध्ये डोक खुपसून बसायच, सगळीजण छान पार्ट्यांमध्ये मस्त एंजॉय करत आहेत. आम्ही मात्र घरात बसून. काय तर म्हणे हे आपल नववर्ष नव्हे. उगाच स्वतःला आदर्शवादी सिद्ध करायच........" किचन आवरता आवरता रियाची अखंड बडबड चालू होती. तिचा नवरा मयंक तिच बोलण ऐकून न ऐकल्यासारख करत शांतपणे लॅपटॉपवर आपल काम करत बसला होता. मयंक सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता. तर रिया एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये टिचर होती. त्यांची ८ वर्षांची मुलगी आभा ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे आजी आजोबांबरोबर मयंकच्या आजोळी गेली होती. रिया आणि मयंक दोघांचेही विचार भिन्न, आवडीनिवडी वेगळ्या. अस असूनही गेली दहा वर्षे त्यांचा संसार सुखाने चालू होता. अधूनमधून थोड्याफार कुरुबुरी होत होत्या पण संसार म्हटल की त्या आल्याच.
      किचनचा लाईट बंद करुन रिया बेडरुममध्ये आली मयंक अजूनही लॅपटॉपमध्येच डोक खुपसून बसला होता. रिया काही न बोलता गप्पपणे तशीच बसून राहिली.  तिच्या मनात आलं; छान मावळतीचे रंग बघत समुद्रकिनारी बसून रहाव हळूच त्याने हात हातात घ्यावा आणि मग त्याच्या खांद्यावर हलकेच डोक ठेवून समुद्राच्या लाटा बघत कधी स्वप्न  तर कधी आठवणींमध्ये हरवून जाव. सोबतीला फक्त गार वारा आणि सायलेंट रोमॅन्टिक म्युझिक; बस हरवून जावं त्या क्षणांमध्ये. मग हळूहळू पसरणारा अंधार, आकाशात होणारे चंद्र आणि तारकांचे आगमन; हे सार त्याचा साथीने अनुभवाव, एवढ साधं सरळ स्वप्नही गेल्या दहा वर्षांत पूर्ण होवू नये? लग्नापूर्वी असा टिपिकल संसार करणाऱ्या आई आणि काकूकडे बघून ती नेहमी म्हणायची, "माझा संसार कधीच असा बोअर नसेल. असा बोअर संसार करण्यात कसली आलेय मजा? लाइफमध्ये काहीतरी चार्म हवा, थ्रिल हवं......" स्वतःचे तेव्हाचे विचार आठवून रियाला हसू आल. तिने पुन्हा एकदा मयंककडे बघितल, तो त्याच्या कामात इतका मग्न होत की रिया बेडरुममध्ये आलेलीही त्याला कळल नसेल. रिया खूपच अपसेट झाली. तिच्या मनात आल, घरात एकांत मिळालेला असुनही मयंक आपल्याकडे लक्षही देत नाही.  आपल्या भावनांची त्याला जरासुद्धा कदर नाही. संपला का सगळा रोमान्स आता? आटल  का याच प्रेम? सतत लॅपटॉप घेऊन ऑफिसच काम करत बसायच. प्रोजेक्टस, डेड लाईन, प्रमोशन, बोनस, इन्क्रीमेंट याशिवाय दुसर विश्व नाही याच. मनाची घालमेल सहन न झाल्याने शेवटी वैतागून तिनेही मोबाईल हातात घेतला आणि फेसबूक बघू लागली.  पण ३१ डीसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पोस्ट्स आणि फोटोज् बघून तिचा मूड गेला. ती वैतागून फेसबूक बंद करणार इतक्यात तिला फ्रेंड्स सजेशन मध्ये एक प्रोफाइल दिसली स्वरुप कानिटकर.... ५२ म्युचुअल फ्रेंड्स....  तिच्या छातीत धस्स झाल. स्वरुप........ गेल्या कित्येक वर्षांत क्वचितच कधीतरी  त्याची आठवण आली असेल. क्षणभर ती तशीच स्तब्ध बसून राहिली. अखेर हिम्मत करून थरथरत्या हाताने तिने ती प्रोफाइल ओपन केली.  प्रोफाइल चेक करता करता तिने फोटोज ओपन केले. तिथे स्वरुपच्या लग्नाचे फोटोज बघून तिला आश्चर्यच वाटल.  त्याची काहिशी जाड, गोरी पण चेहऱ्यावरुन थोडीशी म्हातारी अशी वाटणारी बायको बघून तिच्या मनात आल, "हिच्यात अस काय बघितल असेल याने". त्याच्या लग्नाची बातमी तशी तिला त्याच लग्न ठरल तेव्हाच म्हणजे जवळपास 6 वर्षांपूर्वीच कळली होती पण त्याची बायको कोण? कुठली? हे तिला माहिती नव्हते.  अर्थात त्याबद्दल चौकशीही तिने कधी केली नव्हती.  पण आज फेसबूकमूळे सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.  एवढ्यात तिला नोटिफिकेशन येते- "यू हॅव न्यू फ्रेंड रिक्वेस्ट" ती सहज चेक करते तर ती रिक्वेस्ट स्वरुपनेच पाठवलेली असते. तिच्या छातीत पुन्हा धडधडायला लागत. ती चटकन लॉग आऊट करते.  काही क्षण ती तशीच शांत बसून रहाते. छातीतली धडधड कमी झाल्यावर ती हळूच एक नजर मयंककडे टाकते. तो अजूनही त्याच्या लॅपटॉपमध्ये डोक खुपसून बसलेला असतो. ती काहीही न बोलता मोबाईल बाजूला ठेवून बेडवर आडव होवून डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करते; पण स्वरुप कानिटकरची प्रोफाइल आणि त्याची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट सतत तिच्या डोळ्यासमोर येत असते. एक क्षण तिला वाटत कि परत फेसबूक लॉग इन करून त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करावी, पण तिची हिम्मत होत नाही.  ती तशीच शांत पडून झोपायचा प्रयत्न करते. मनात उठलेल भूतकाळातील आठवणींच आणि विचारांच वादळ तिला काही स्वस्थ झोपू देत नाही. उगाच फेसबूक ओपन केल अस क्षणभर तिला वाटून जात. मग दुसऱ्या क्षणाला तिच्या मनात येत का पाठवली असेल फ्रेंड रिक्वेस्ट 'त्याने'? इतकी वर्ष मध्ये निघून गेल्यावर आता त्याला का वाटल असेल मला कॉंटॅक्ट करावासा ?
           स्वरुप कानिटकर म्हणजे रियाचा कॉलेजमधला मित्र...... आणि तिच्यासाठी तिचा फर्स्ट क्रश. रियाला तो दोन वर्षांनी सिनिअर. रिया तेव्हा BSC च्या लास्ट इअरला होती आणि स्वरुप MSC च्या लास्ट इअरला.  दोघेही NSS च्या एका कार्यक्रमाच्यावेळी भेटले. तिथेच त्यांची ओळख झाली आणि रिया चक्क त्याच्या प्रेमात पडली. तिथे आलेल्यांपैकी अजून काहीजण एकत्र आले आणि पाच सहा जणांचा छान ग्रूप जमला. रिया  ग्रूपमध्ये फक्त स्वरूपसाठी सामिल झाली होती. स्वरूप हॅन्डसम तर होताच शिवाय त्याचा मिश्किल स्वभाव रियाला फार आवडला. पण सतत ग्रूपमध्ये वावरणारा स्वरुप रियाच्या वाट्याला तसा कमीच येत असे. रिया तशी साधी सरळ. उगाचच कोणाच्यातरी  गळ्यात पडणाऱ्या मुलींसारखी ती कधीच नव्हती. ती तशी सुंदर होती; पण उगाचच फॅन्सी कपडे घालून आणि चेहऱ्यावर मेकअप थापून वावरणे तिला कधीच जमले नाही. अर्थात तिला ते आवडतही नव्हत. ती अगदी साधी सरळ होती.  बरोबर या विरुद्ध स्वरुप. खानदानी श्रीमंती असल्यामुळे मुळातच हाय- फाय लाईफस्टाईलची आवड. तो नेहमी ब्रॅंडेड वस्तूच वापरायचा. मॉडर्न लाईफस्टाईलच त्याला प्रचंड आकर्षण. पण तरिही सगळ्यात महत्त्वाच म्हणजे कोणालाही मदत करायला तो नेहमी एका पायावर तयार असायचा. तो हॅन्डसम असूनही त्याला गर्व नव्हता. श्रीमंत असूनही पैशाचा माज नव्हता. त्यामुळेच फक्त रियाच नाही तर कॉलेजमधल्या कितीतरी मुली त्याच्या प्रेमात पडल्या होत्या.
          नेहमी ग्रूपमध्येच भेटत असल्यामुळे स्वरुप रियाच्या वाट्याला खूपच कमी येत असे. पण तशी संधी त्या दिवशी चालून आली.जवळच्याच एका गावात NSS चा एक प्रोग्रॅम होता. प्रोग्रॅम संपायला थोडा उशीरच झाला. ग्रूपमधील काही जणांच्या घरी जायला त्या गावातून बस होती. तर काही जणांनी त्यांची स्वतःची टू व्हिलर आणली होती. पण रियाच्या घराकडे जाणारी शेवटची बस निघून गेली होती आणि तिच्याकडे गाडीही नव्हती. स्वरुपने तिला घरी सोडायची जबाबदारी घेतली त्यामुळे सगळेजण निर्धास्तपणे आपाआपल्या घरी निघून गेले. रियाही सुखावली. उशीर झाल्यामुळे दोघही वाटेतच एकत्र जेवले. त्यांच्याबरोबर दुसर कोणीच नसल्यामुळे खूप वेळ एकमेकांबरोबर घालवता आला.
         त्या दिवसानंतर दोघांच्या भेटी वरचेवर होवू लागल्या. कॉलेज डेज, NSS चे प्रोग्रॅम्स, ग्रूप पिकनिक काहीही असुदे नेहमी स्वरुपच तिला घरी सोडायचा. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली आणि रिया त्याच्यात अधिकच गुंतत गेली. बघता बघता वर्ष संपत आल. अखेर एक दिवस रियाने स्वरूपसमोर आपल प्रेम व्यक्त केल. पण स्वरुपने मात्र ते नाकारल. नुसत नाकारलच नाही तर,तू माझ्या टाईपची मुलगीच नाहीस" अस सांगून तिच मनही दुखावल. ती भेट त्यांची शेवटची भेट ठरली. त्यानंतर रियाने ग्रूपमध्ये जाणही बंद केल. काही जणांनी रियाला त्याच कारणही विचारल पण रिया आणि स्वरुप दोघांनीही ते सांगायच टाळल. पुढे परिक्षा झाल्यावर मास्टर डिग्रीसाठी रियाने दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि दोघे कायमचे दुरावले. त्यानंतर  आज इतक्या वर्षांनी आलेली स्वरुपची फ्रेंड रिक्वेस्ट बघून रियाच्या मनात कालवाकालव झाली. खास करुन त्याच्या लग्नाचे फोटो बघून तिच्या मनात आल,माझ्यात अस काय कमी होत म्हणून याने मला नाकारल?
     विचारांच्या तंद्रीत तिला कधी झोप लागली ते तिच तिलाच कळल नाही. तिला जाग आली ती डोअरबेलच्या आवाजाने.  तिचे सासू सासरे आणि तिच पिल्लू आभा गावाहून परत आले होते. आभा चटकन येउन आई म्हणून तिच्या गळ्यात पडली. अख्खा दिवस आभाची बडबड आणि गावाकडच्या गप्पा ऐकण्यात गेला.  दुसऱ्या दिवसापासून रिया आणि आभा दोघींचीही शाळा सुरू होणार होती रात्री अंथरुणावर पडल्यावर तिच्या मनात पुन्हा स्वरुपचा विचार आला. क्षणभर तिला वाटल फेसबूकवर लॉगइन कराव पण तिने हा विचार प्रयत्नपूर्वक दूर लोटला.  उद्या रेशम भेटल्यावर तिच्याशी बोलून मग ठरवू काय करायचे ते असा विचार करुन ती झोपी गेली.
       दुसऱ्या दिवशीपासून नेहमीच रुटिन सुरु झाल. रियाने आभाला मुदामच तिच्या शाळेत न घालता दुसऱ्या शाळेत घातल होत. सकाळी मयंक आणि आभा निघून गेल्यावर थोड्या वेळाने रियाही तिच्या शाळेत गेली. कधी एकदा शाळेत जाते आणि रेशमशी बोलते अशी तिची अवस्था झाली होती. रेशम म्हणजे रियाची B.ED पासूनची मैत्रीण.योगायोगाने एकाच शाळेत नोकरीसुद्धा मिळाली. लंच ब्रेकनंतर  रियाला जरा मोकळा वेळ मिळाला. ती  स्टाफरुममध्ये गेली तेव्हा रेशमही तिथेच होती. स्वतःच्याच विश्वात हरवलेली रेशम बघून रियाला क्षणभर तिचा हेवा वाटला. "काय मग रेशम कशी झाली न्यू इअर सेलिब्रेशनची पिक्निक?" रियाने विचारले.
 "खूप मस्त! तू बोल. तुझ सेलिब्रेशन कस झाल? रेशमने हसून विचारल.
"आम्ही घरीच. आमच्यासाठी सगळे दिवस सारखेच",रिया काहीशी वैतागून म्हणाली.
   "का ग काय झाल? एवढी का चिडली आहेस?" रेशम.
रिया: जाऊदे ग. नेहमीचच आहे. पण मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी B.ED ला असताना तुला सांगितल होत बघ स्वरुपबद्दल.
रेशम: हो तुझा तो फर्स्ट क्रश ना?
रिया: कमॉन रेशम
रेशम: इट्स ओके रिया वैतागू नकोस. बर बोल काय झाल त्याच?
रेश्मा: त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आलेय मला. पण कळतच नाहीये ॲक्सेप्ट करु का नको.
रेशम:त्यात विचार काय करायचा? त्याने रिक्वेस्ट पाठवली आहे ना मग ॲक्सेप्ट कर ना.
रिया: तस नाही ग पण...... जाऊदे काही नाही.
रेशम: काय झाल रिया स्पष्ट बोल ना.
रिया: बोलू नंतर. तू तुझ बोल. कस झाल थर्टी फर्स्टच सेलिब्रेशन?
रेशम:  मला पण तुला तेच सांगायच आहे.  अग अचानक माझ्या नवऱ्याला - शेखरला दिल्लीला जाव लागल. तस नेहमीचच आहे त्याच हे प्लॅन ठरवायचे आणि कॅन्सल करायचे. माझा तर पूर्ण मूड गेलाच पण आमच पिल्लू साहिल.. .. तो ही खूप वैतागला बाबांवर.
रिया: अग पण तुमची पूर्ण फॅमिली जाणार होती ना ? तुझ्या नणंदेची फॅमिली पण येणार होती ना तुमच्याबरोबर.
रेशम: हो ना तेच तर सांगतेय.  माझा तर मूडच गेला होता. ठरल्याप्रमाणे सगळच घडणार होत पण फक्त त्यात शेखर नसणार होता. माझी खूप चिडचिड झाली ग रिया. गेले कित्येक महिन्यात आम्ही एकमेकांना व्ययस्थित वेळच दिला नव्हता. वाटल होत या निमित्ताने तरी पुन्हा एकमेकांच्या जवळ येउ पण...
रिया: चला म्हणजे आपण दोघी एकाच वाटेवरचे प्रवासी आहोत तर.
रेशम: नाही रिया मला अजूनही काहीतरी सांगायच आहे.
रिया: काय झाल रेशम? काही प्रॉब्लेम आहे का?
रेशम: तू मला समजून घेशील का नाही ते मला माहिती नाही. पण तरीही तुला मी सांगणार आहे. तुला आठवतच असेल मी  तुला रोहितबद्दल सांगितल होत?
रिया: हो तुझा एक्स बॉयफ्रेंड आणि आता तो तुझा चांगला मित्र आहे.फेसबूकवरच पुन्हा भेटलात ना तुम्ही?
रेशम: हो. आधी त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. मग मी ती ॲक्सेप्ट केली. मग व्हॉटस ॲप नंबर शेअर केले. व्हॉट्स ॲप वर चॅटिंग सुरु झाल. मग एकदा आम्ही कॉफीसाठी भेटलो आणि नंतर खूप चांगले मित्र झालो पण आता आमच नात त्याच्याही पुढे गेलय रिया.
रिया: म्हणजे? तुला नक्की काय म्हणायच आहे?
रेशम: थर्टी फर्स्टच्या प्रोग्रॅमला शेखर नाही म्हटल्यावर माझा मूड गेला होता पण साहिलला मात्र जायच होत. त्याच आणि माझ्या नणंदेच्या मुलांच चांगल जमत.मग मी साहिलला त्यांच्याबरोबर पाठवायच ठरवल. साहिलला त्यांच्या घरी सोडून मी घरी आले. घर खूपच उदास वाटू लागल. आता दोन दिवस एकटीने घरात बसून काढायचे या कल्पनेन रडू आल. तेवढ्यात रोहितचा फोन आला. माझ्या आवाजावरुनच त्याने ओळखल. काहीतरी बिनसलय. त्याने तस विचारल आणि मी सुद्धा सगळ खर सांगितल. मग तो हसत म्हणाला, "अग त्यात काय एवढ माझ पण प्लॅनिंग फसल. छान बायकोसाठी रोमॅन्टिक ट्रिप प्लॅन केली होती, पण तिलाही जमत नाही आहे.  तुझी हरकत नसेल तर आपण दोघ जाऊ शकतो.रोमान्स नाही पण मस्त गप्पा मारु. एकमेकांचा एकटेपणा तेवढाच दूर होइल. बघ विचार कर."
      मी त्याच्याबरोबर जायच ठरवल. नणंदेला फोन करुन मैत्रीणीबरोबर जातेय अस सांगितल. घरातून बाहेर पडले. पार्लरला गेले. थोड शॉपिंग केल. घरी येउन दोन दिवसांच सामान पॅक करुन घेतल आणि संध्याकाळी घरातून निघाले. घराजवळच्या कॉर्नरजवळून त्याने मला पिकअप केल. काही वेळापूर्वी उदास असणारी मी संध्याकाळी मात्र खूप उत्साहात होते.
      त्यानंतरच 'कॅन्डललाईट डिनर' , त्याच ते केअरिंग असण, माझी स्तूती करण, कधी जून्या आठवणीत रमण....... सगळ सगळ अगदी मी छान एन्जॉय करत होते. खर सांगायच तर कितीतरी दिवसांनी मी आयुष्य जगत होते. मला तेव्हा कसलाच विचार करायचा नव्हता. मला ते क्षण जगायचे होते. त्यानंतर आम्ही रिसॉर्टवर गेलो. एकदम मस्त रिसॉर्ट होता ते. मस्त बेडरूम त्याला ॲटॅच्ड ओपन टेरेस. त्या टेरेसमधून एका बाजूला स्वच्छ,  नितळ तळं  दिसत होत तर दुसऱ्या बाजूला दरी. चांदण्या रात्री सगळ इतक सुंदर दिसत होत कि मी हरखून गेले. कितीतरी वेळ मी शांतपणे उभ राहून निसर्गाच सौंदर्य अनूभवत होते. तेवढ्यात रोहित तिथे आला आणि म्हणाला, "जर आपल ब्रेकअप झाल नसत तर आज तू इथे माझ्याबरोबर माझी बायको म्हणून आली असतीस ना? आजही मी खूप प्रेम करतो तुझ्यावर अगदी पूर्वीइतकच! तू करतेस का तेवढच प्रेम माझ्यावर? सांगना?
   त्याच्या या बोलण्यावर काय बोलाव ते माझ मलाच कळत नव्हत. हवेतला गारवा,  ती चांदणी रात्र एकूणच सगळ रोमॅन्टिक वातावरण! मी हरखून गेले होते ग  या साऱ्यामूळे. तो पुढे होवून माझ्याजवळ आला,  माझे हात हातात घेउन डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाला,  "I Love you". हरखून गेले मी त्या क्षणात. कितितरी दिवसांनी मनात अनामिक हवीहवीशी वाटणारी धडधड जाणवत होती. काय चूक काय बरोबर काहीच कळत नव्हत. फक्त एवढच कळत होत, हाच तो क्षण! ज्या क्षणासाठी, ज्या अनुभवासाठी मी इतके दिवस तडफडत होते. मी झोकून दिल स्वतःला त्याच्या मिठित आणि त्यानंतर मी माझ सर्वस्व दिल त्याला.
"रेशम ....... रिया जवळपास तिच्यावर ओरडलीच. काय बोलतेयस तू? तुझ तुला तरी कळतय का?
   रियाच्या आवाजाने रेशम भानावर आली. पण तितक्याच शांतपणे म्हणाली,"ओरडायला काय झाल रिया मी खर तेच सांगतेय”
     रेशम तुला माहितेय का तू काय केलस ते आणि त्याच तुला काहीच वाटत नाहीये? इतक्या शांतपणे कस सांगू शकतेस तू हे सगळ?" रिया आश्चर्याने म्हणाली.
   "कारण मला त्यात काहीच चूक वाटत नाही रिया. अग ज्या सुखासाठी मी इतकी वर्षे तडफडत होते ते सुख स्वतः हात जोडून माझ्या समोर आल होत. तुला काय सांगू माझ्या मनाची किती तडफड होत होती ते. अग गेल्या पाच महिन्यात शेखरच्यात आणि माझ्यात शारीरिक जवळीक तर सोडच पण साध प्रेमाच संभाषणही झालेल नाही. ३१ डिसेंबरच्या पिक्निकची मी खूप आतूरतेने वाट बघत होते. शेखर दिल्लीचा स्टे कॅन्सल करू शकत होता पण नाही केल त्याने तस. कारण फक्त पैसा, करिअर. मी रोबोट नाही ग रिया! मलाही भावना आहेत. अशातच रोहित पुन्हा माझ्या आयुष्यात आला आणि मी पुन्हा जगू लागले. त्याच्या फ्लर्टमध्ये सुखाचे क्षण शोधू लागले. कितीही झाल तरी तो माझ पहिल प्रेम होता." बोलता बोलता रेशमचे डोळे भरुन आले.
    "ते सगळ ठिक आहे रेशम पण तू त्याच्याशी चक्क फिजिकल रिलेशन डेव्हलप केलस? अग तुम्ही दोघही मॅरिड आहात.तुला माहिती आहे का आपल्या समाजात अशा नात्याला अनैतिक संबध म्हणतात. अशा संबधांना ना समाज संमती देतो ना कायदा.  तू ज्या नात्याला 'प्रेम' अस गोंडस नाव देत आहेस ना त्या नात्याला समाजात व्यभिचार म्हणतात. आणि कशावरून तो तुझ्यावर प्रेम करतोय? कदाचित त्याला तुझ्याशी फक्त फिजिकल रिलेशन्स ठेवण्यातच इंटरेस्ट असेल. काही लक्षात येतय का तुझ्या?" रिया रेशमला फाडफाड बोलत होती.
    रिया जेव्हढा त्रागा करत होती रेशम तितकीच शांत होती. पश्चात्तापाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मुळात आपल काही चुकतय हेच तिला मान्य नव्हत. काही क्षण शांततेत गेल्यावर रेशमने रियाला विचारल, "रिया व्यभिचार,  अनैतिक संबध हे सार शारीरिकच असत का?
  " तुला काय म्हणायच आहे नक्कि?" , रेशम
   रिया इतके दिवस मी रोहितला भेटत होते, रात्री उशीरापर्यंत त्याच्याशी चॅटिंग करत बसायचे,  तासनतास फोनवर बोलायचे तेव्हा तर कधी नाही वापरलेस असे मोठे मोठे शब्द. आणि आज मी तुला सांगीतल कि आमच्या फिजिकल रिलेशन आले तर हे सार अनैतिक झाल?म्हणजे मनाने मी त्याच्यात गुंतले ते चूक नाही आणि जर शारिरीक जवळीक निर्माण झाली तर तो व्यभिचार? अग आम्ही आमचे संसार वाऱ्यावर नाही सोडून देणार आहोत. फक्त आमच्या आयुष्यातील एक पोकळी भरुन काढायचा प्रयत्न करतोय. रोजच्या धकाधकीच्या जिवनात चार प्रेमाचे, सुखाचे क्षण शोधत होते मी. असे क्षण ज्यामुळे मला जगल्यासारख वाटेल आयुष्य रेटल्यासारख नाही. आणि ते  क्षण मला रोहितने दिले."        
     रेशमच बोलण ऐकून रिया एकदम गप्प झाली. तिला रेशमच बोलण पटत होत पण तिच मन काही ते मान्य करायला तयार होत नव्हत. ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. अचानक मनात स्वरुपचा विचार आला आणि तिच्या गोंधळात अजून भर पडली. एक क्षण तिच्या मनात विचार आला, "आता स्वरुपचा विचार करण म्हणजे पण व्यभिचारच ठरेल का? या विचाराने तिला रडायला यायला लागल.  ती रेशमजवळ काही बोलणार इतक्यात पिरिएड संपल्याची रिंग वाजली आणि नेमक त्याच वेळी रियाला प्रिन्सिपल सरांनी 'इंटरस्कूल सायन्स एग्झिबिशनच्या संदर्भातल्या मिटिंगसाठी बोलावल. नाईलाजाने रिया मिटिंगला निघून गेली. रेशमही आपल्या पुढच्या कामाला निघून गेली.
    इंटरस्कूल सायन्स एक्झिबिशनची खूप मोठी जबाबदारी रियावर होती.  त्या गडबडीत पुढचे दोन दिवस कसे गेलेते रियाला कळल नाही. पण प्रत्येक कामाच्या वेळी तिला आवर्जून स्वरुपची आठवण येत होती. कॉलेजला असताना असे कितीतरी प्रोग्रॅम्स ॲरेंज करताना तिने आणि स्वरुपने एकत्रित कामे केली होती. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या होत्या. कधीही कुठलाही प्रॉब्लेम येउदे प्रत्येक प्रॉब्लेमच सोल्यूशन स्वरुपकडे असे.  स्वरुपची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट आणि त्यात इंटरस्कूल सायन्स एक्झिबिशनची जबाबदारी यामुळे रियाच्या मनातील आठवणींचा एक कप्पा तिच्याही नकळत उघडला गेला होता.  हे सार जरी तिच्या नकळत घडत असल तरी स्वरुपच्या आठवणीत हरवून पुन्हा वास्तवाच भान आल्यावर मात्र तिच तिलाच गिल्टी वाटत असे. याच कारण म्हणजे रेशमने तिच्या डोक्यात भरवलेली 'व्यभिचार' नामक शब्दाची दुसरी व्याख्या. 'व्यभिचार फक्त शारीरिक असतो का?' राहून राहून हा प्रश्न तिच्या मनात घोळत असे."जर मनात दुसऱ्या कोणाचा विचार येत असेल तर तो पण व्यभिचारच आहे का? म्हणजे आपल वारंवार स्वरुपच्या आठवणीत हरवून जाण पण एक प्रकारचा व्यभिचारच आहे का?" अशा विचारांनी रिया सुन्न होत असे. कामाच प्रेशर, स्वरुपची आठवण आणि रेशमच वागण बोलण या साऱ्यामूळे रिया प्रचंड मानसीक तणावाखाली होती.
  त्या दिवशी रियाला काम आवरुन घरी परतायला रात्र झाली. जेमेतेम चार घास पोटात ढकलून रिया झोपी गेली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून शाळेत जायच होत. सायन्स एग्झिबिशन अवघ्या पाच दिवसांवर आल होत. त्यामुळे सहाजिकच कामाचा ताण आणि एग्झिबिशन दोन्हीच प्रचंड टेंशन होत. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेता घेता रियाने सहज मोबाईल बघितला तर नोटिफिकेशन होत, "यू हॅव न्यू मेसेज रिक्वेस्ट". कुतूहल म्हणून रियाने मेसेंजर ओपन केला तर स्वरुपचा मेसेज होता," Hi Riya please accept my friend request" रियाच्या छातीत धडधड सुरु झाली. पण  वेळी मात्र तिला ती अनामिक धडधड सुखावत होती. समोर स्वरुपचा हसऱ्या चेहऱ्याचा फोटो बघून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटल. तिच्या मनात आल, " आजही हा पूर्वीइतकाच गोड दिसतोय असच याच्याकडे बघत रहाव...”
    " रिया चल निघतो मी”, मयंकच्या आवाजाने ती भानावर येते. चेहऱ्यावर उसन हसू आणून तीने कसबस मयंकला 'बाय' केल. मयंक निघून गेल्यावर मात्र तिला खूप गिल्टी वाटायला लागत. त्यात रेशमने तिच्या डोक्यात भरवलेला व्यभिचाराच्या नविन व्याख्येचा किडा तिच डोक पोखरत असतो. आपण काहीतरी भयंकर केलय अस वाटून ती अधिकच अपसेट होते. रिया दिवसभर सगळी काम यांत्रिकपणे करत असते. स्वरुपच्या आठवणी ती थांबवू शकत नसते आणि त्या आठवणींसोबत वावरण म्हणजे व्यभिचार... तिच डोक सुन्न होवून जात. पूर्ण दिवस कामात जातो रात्री घरी यायला उशीर होतो. चला उद्या निदान लवकर जायच नाही असा विचार करुन ती सुखावते. थकलेला देह आणि हरवलेल मन दोन्ही क्षणात झोपेच्या आहारी जातात.
     दुसऱ्या दिवशी रियाचा वाढदिवस असतो. सकाळी तिला जाग येते तेव्हा मयंक तयार होवून ऑफिसला निघालेला असतो. "आज लवकर?" रिया मयंकला विचारते.
"अग हो US मधून हेड ऑफिसची लोकं आली आहेत,  मिटिंग आहे... जाव लागेल. तू शांत झोपली होतीस म्हणून नाही मुद्दाम उठवल तुला. तसही टिफिन नकोच होता आज.  बाहेरच जेवण होइल." मयंक.
     निघता निघता मयंक परत आला आणि रियाला म्हणाला, "Happy Birthday Riya. लक्षात आहे माझ्या पण गिफ्ट आणायला नाही जमल. आणि सॉरी घरी यायला कदाचित रात्र होइल....ओके? प्लीज समजून घे ....... बाय...... टेक केअर ..
       त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रिया बघतच राहिली आणि स्वतःशीच म्हणाली, "चला याच्या लक्षात होत हे काही थोड आहे". तेवढ्यात मोबाईलवर मेसेंजरची टोन वाजते. ती मोबाईल हातात घेते. फेसबूक, मेसेंजर, व्हॉट्स ॲप यावर मेसेजेस आणि शुभेच्छा यांचा पाऊस पडत असतो. अनेक मेसेज रिक्वेस्ट्स असतात. त्यामध्ये स्वरुपच नाव बघून ती चटकन त्याचा मेसेज ओपन करते. समोर  पिवळ्या गुलाबाच्या फुलांचा बूके आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बघून ती मनोमन सुखावते.  तिच्या मनात येत..... "आजही आठवतय याला मला पिवळ्या रंगाची गुलाबाची फुले फार आवडतात ते." काही क्षण ती स्वरुपच्या आठवणीत हरवून जाते. पण घडाळ्याचे पूढे सरकणारे काटे बघून तिला नाईलाजाने स्वरुपच्या विचारातून बाहेर पडाव लागत. पटापट आवरून रिया शाळेत पोचते. शाळेत पुन्हा रोजचे पिरिएअड्स एक्झिबिशनची तयारी. कामांचा डोंगर उपसता उपसता रिया थकून जाते. लंच ब्रेकच्या वेळी तिची आणि रेशमची गाठ पडते. त्या दिवसानंतर दोघींच फारच जुजबी बोलण झालेल असत. एक प्रकारचा दुरावा निर्माण झालेला असतो दोघींमध्ये.  रेशम स्वतः पुढे येउन रियाला वाढदिवसाच्या शूभेच्छा देते आणि एक छानस गिफ्ट तिच्या हातात देते. काही क्षण दोघी मोकळेपणाने बोलतात. तेवढ्यात रेशमचा मोबाईल वाजतो. रेशमच्या बोलण्यावरुन, "हा फोन रोहितचा आहे हे रियाच्या लक्षात येत. रिया काहीशी अपसेट होते. फोनवर बोलून झाल्यावर रेशम रियाला सहज विचारते , "मग आज काय प्लॅनिंग कुठे करणार बर्थडे सेलिब्रेशन? यावर मात्र रियाच्या डोळ्यात आसव जमा होतात. पण ती तशीच डोळ्यात थांबवून रेशमला मयंकच्या मिटिंगबद्दल सांगते. काही क्षण तसेच शांततेत गेल्यावर रेशम म्हणते, "मी आले असते तुझ्याबरोबर संध्याकाळी. गेलो असतो आपण कूठेतरी. गेला बाजार पाणीपूरी तरी खाल्ली असती पण आज संध्याकाळी मला......
 "रोहितबरोबर जायचय” बरोबर आहे ना? रेशमच बोलण मध्येच तोडत रिया विचारते.  रेशम होकारार्थी मान हलवते.
   रेशम थांबव हे सगळ अग या साऱ्याचे परिणाम किती भयंकर होणार आहेत हे तुला माहिती आहे का?अजूनही वेळ गेली नाहीये प्लीज सावर स्वतःला", रिया रेशमला समजवण्याचा प्रयत्न करते.
   "नाही रिया मी नाही थांबवू शकत स्वतःला. त्याच्याशिवाय तडफड होते ग जीवाची.त्याच्याशी बोलले नाही तर चिडचिड होते. त्याला भेटले नाही तर मन बेचैन होत. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय रिया, मनाने खूप गुंतलेय मी त्याच्यात", रेशम भावनिक होवून बोलत असते. त्यानंतर लंच ब्रेक संपल्याची बेल वाजते आणि दोघी आपआपल्या कामाला निघून जातात.
   रियाच्या मनात पुन्हा विचारांच विचारांच वादळ उठत. समोर असणारी काम ती यांत्रिकपणे करत असते. तेवढ्यात तिला प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये बोलावल असल्याचा निरोप येतो. रिया केबिनमध्ये जाते. एक्झिबिशनच्या तयारीतील काही गोष्टी खटकल्यामूळे प्रिन्सिपल नाराज होतात आणि रियाला त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. केबिनमधून बाहेर आल्यावर तिला रडूच कोसळत. तिच्या मनात येत, "एवढ मरमर काम करून पण शेवटी हे असच ऐकायच. घरी कोणाला किम्मत नाही आणि इथेही तिच परिस्थिती”. कसबस ती स्वतःला सावरते. त्यानंतर पूर्ण दिवस तिचा उदास जातो. संध्याकाळी काम संपवून ना घरी जायची इच्छा असते ना शाळेत थांबायची.  तिच्या मनात स्वरुपचा विचार येतो आणि मन पुन्हा हळव होत.
    संध्याकाळी रिया घरी पोचते तेव्हा घरी कोणीच नसत. सासूबाई आभाला घेउन पार्कमध्ये गेलेल्या असतात आणि सासरे ज्येष्ठ नागरीक कट्ट्यावर. मयंकला तर उशीरच होणार असतो.  ती नाईलाजाने दार उघडून घरात जाते. पर्स सोफ्यावर फेकून स्वतःलाही  सोफ्यावर झोकून देते. दिवसभरात घडलेल्या घटना, स्वरुपचे विचार, रेशमच वागण आणि व्यभिचाराची नवीन व्याख्या या साऱ्यामुळे ती खचून गेलेली असते. तिला खूप रडावस वाटत असत. या क्षणी आपल्याजवळ कोणीतरी आपल असाव. त्याच्या मिठीत स्वतःला झोकून द्याव आणि मनसोक्त रडाव अस तिला मनोमन वाटत असत. पण मयंक तर ऑफिसमध्ये आणि स्वरूप...... स्वरुपचा विचार येताक्षणी रिया दचकते. हा काय विचार करतेय मी....... नाही हे चूक आहे......... तिच्या घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी म्हणून ती किचनमध्ये जाते पण सगळा ताण असह्य होवून ती तिथेच खाली कोसळते.
      रिया जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती त्यांच्या बेडरूममध्ये असते. मयंक तिच्याजवळ बसून असतो. ती बेडवरुन उठायचा प्रयत्न करते पण मयंक तिला खुणेनेच नको म्हणतो. तिच्या जवळ सरकून तो प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवतो. आणि तिला विचारतो, "कस वाटतय रिया आता?" रिया हसून मान हलवते. मयंक तिचा हात हातात घेउन तिला विचारतो, "तुझा वाढदिवस म्हणून संध्याकाळी शक्य नव्हत तरी मी लवकर घरी आलो. घरी येउन बघितल तर तू किचनमध्ये चक्कर येउन पडलेली. घरी कोणीच नव्हत. मी पटकन उचलून तुला इथे बेडरुममध्ये आणून ठेवल. डॉक्टरांना फोन केला. तुझ BP  खूपच कमी झाल होत. डॉक्टरनी सांगितल ओव्हर स्ट्रेसमूळे अस झालय. एवढा कसला स्ट्रेस आहे रिया? नक्की काय प्रॉब्लेम आहे? गेले काही दिवस बघतोय मी तू खूप डिस्टर्ब आहेस. जे काय असेल ते मोकळेपणाने सांग. हे बघ मी लग्नापूर्वीच तुला सांगितल होत, 'तुझा नवरा व्हायच्या आधी मला तुझा मित्र व्हायला आवडेल. आज त्याच नात्याने मी तुझ्याशी बोलतोय. जे काही मनात असेल ते मला सांगून टाक अशी कूढत राहू नकोस. प्लीज बोल काहीतरी. अशी गप्प नको राहूस."
     मयंकच बोलण ऐकून रियाला रडू येत. ती त्याच्या मिठीत शिरुन रडू लागते. कितीतरी वेळ ती तशीच रडत असते.. एखाद्या लहान बाळासारखी. आणि मयंक तिला मायेने थोपटत असतो. भावनेचा आवेग  ओसरल्यावर ती स्वरुपच्या फ्रेंड रिक्वेस्टपासून घडलेल्या सगळ्या गोष्टी मयंकला सांगते अगदी रेशमबद्दलही..... आणि मयंकला सॉरी म्हणून पुन्हा रडू लागते. तिच रडून झाल्यावर मयंक तिला विचारतो, "आपण एकएक प्रॉब्लेम सोडवूया का? म्हणजे तुझ्या मनात जो विविध प्रॉब्लेम्सचा गुंता झालाय तो आपल्याला व्यवस्थित सोडवता येइल. चालेल? उत्तरादेखल रिया फक्त मान हलवते.
 "रिया सगळ्यात आधी मनातल गिल्ट काढून टाक तू काहीही चूकीच केलल नाहीस. स्वरुप कानिटकरची तुला आलेली फ्रेंड रिक्वेस्ट आणि रेशमच वागण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याची सरमिसळ करण आधी बंद कर. अग एवढ काय झाल त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर? एके काळी तुम्ही खूप चांगले मित्र होतातच ना.  ठिक आहे तुझ्या मनात त्या मैत्रीच्या पुढे जाऊन त्याच्याबद्दल काही भावना होत्या. पण त्याच्या मनात तर तस काहीच नव्हत. तो तुला फक्त त्याची एक चांगली  मैत्रीणच समजत होता. आज इतक्या वर्षांनंतर त्याला ते मैत्रीच नात परत निर्माण करावस वाटल असेल. तर त्यात चूक काय आहे. आज तूला तुझा संसार आहे तसच त्यालाही त्याचा संसार आहेच की. अग प्रत्येक नात्याच एक वेगळ महत्व असत आपल्या आयुष्यात. तुझ तेव्हा प्रेम होत त्याच्यावर त्याच नव्हत. त्यामुळे तुमच्या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. ज्या गोष्टीमूळे त्या वाटा वेगळ्या झाल्या त्या गोष्टीला आज काहीच अर्थ उरला नाहीये . त्यामुळेच कदाचित त्याने तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल." मयंक शांतपणे रियाला समजवायचा प्रयोग करतो.
  "माझ लग्न झालेल असताना त्याचा विचार करण,एक्झिबिशनच्या कामाच्या वेळी प्रत्येक वेळी त्याला मिस करण ह्यात काहीच चूक नाही का? हा व्यभिचार नाही का मयंक?" रिया रडवेली होवून विचारते.
 "अग वेडे काहिही झाल तरी आठवणी विसरता येत नाहीत.तुम्ही अशा अनेक कार्यक्रम नियोजनाच्या कामात एकत्रीतपणे काम केल आहे ना म्हणून आली त्याची आठवण त्यात व्यभिचार कसला?" मयंक सहज हसुन तिला विचारतो
  "तुला काहीच चूक वाटत नाही का माझी?" रिया
 "रिया आत्ता काय होतय माहितेय? तू तुझ्या विरुद्ध माझ्याशी भांडते आहेस" मयंक तिला हसवण्याचा प्रयत्न करत म्हणतो. तरिही रियाच्या मनातला गोंधळ अजूनही तसाच असतो तिची अवस्था बघून मयंकला वाईट वाटत. तिला कस समजवाव हेच त्याला कळत नसत. काही क्षण तसेच शांततेत गेल्यावर मयंक रियाला म्हणतो, "रिया तू इतकी निरागस आहेस ना कि व्यभिचार वगैरे करण्याचा विचार तू स्वप्नातसुद्धा करु शकणार नाहीस”
    "व्यभिचार फक्त शारीरिक असतो का मयंक?" अखेर रिया मूळ मुद्द्यावर येते. तिच्या मनातल्या गोंधळाच मूळ कारण मयंकच्या लक्षात येत. थोडा वेळ विचार करुन मयंक तिला विचारतो, "रिया तुला जेव्हा कोणाचा राग येतो अगदी प्रचंड राग येतो तेव्हा त्या व्यक्तीला मारावस वाटत?"  यावर रिया होकारार्थी मान हलवते." मग तू मारतेस का त्या व्यक्तीला?" मयंक तिला विचारतो.
 "नाही",  रिया शांतपणे सांगते.
"मग तुझ्या मनात त्या व्यक्तीला मारायचा विचार आला म्हणून तू गुन्हेगार ठरतेस का? तर नाही. जोपर्यंत तू मारण्याची कृती करत नाहीस तोपर्यंत तू गुन्हा करत नाहीस आणि गुन्हाच घडला नाही तर तू गुन्हेगार कशी ठरशील? येतय का काही लक्षात?" मयंक हसून विचारतो.
    रिया मान हलवून होकार तर देते पण अजूनही तिचा गोंधळ पूर्णपणे संपलेला नाही आणि याच कारण रेशम आहे हे मयंकला जाणवत. म्हणून मुद्दामच तो रेशमचा विषय काढतो. रेशमबद्दल रिया जेव्हा बोलायला लागते तेव्हा मयंकला जाणवत, रिया रेशमच्या वागण्यामूळे जेवढी डिस्टर्ब आहे तेवढीच तिच्या काळजीमुळे.
   रियाच बोलण संपल्यानंतर मयंक तिला म्हणतो, "रिया तुला एक सांगू? जे घडलय त्यात जेवढी चूक रेशमची आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चूक शेखरची आहे. अग प्रत्येकाला अटेंशन हव असत. अगदी एखाद्या लहान बाळापासून ते म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच. रेशमचही तसच झाल होतं. तिला शेखरच अटेंशन हव होत पण ते तिला मिळत नव्हत.  नवरा बायकोच्या नात्यामध्ये असे प्रसंग अनेक वेळा येतात. अशा वेळी जर एकमेकांशी बोलून प्रश्न सोडवले तर ते सहज सुटतात. पण रेशमच्या बाबतीत कदाचित तिने शेखरशी संवाद साधलाच नाही किंवा साधला असेल पण शेखरने तेवढ महत्व दिल नसेल. नेमक त्याच वेळी रोहित तिच्या आयुष्यात आला आणि तिला हव असलेल अटेंशन रोहितने तिला दिल. त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटू लागला. त्याच्याशी तासनतास बोलण, चॅटिंग, भेटीगाठी हे सगळ सुरु झाल. पण हे सगळ इथपर्यंत ठिक होत. एक स्त्री आणि एक पुरूष यांना जर एकमेकांचा सहवास आवडत असेल तर त्यात चूक काहीच नाही फक्त त्या नात्यामध्ये निखळ मैत्री असली पाहिजे. पण रेशम मात्र पुढे जाऊन यामध्ये वहावत गेली आणि तिने रोहितशी फिजिकल रिलेशन डेव्हलप केली. कस आहे ना कूठे थांबायच हे कळल पाहिजे. दुर्दैवाने हे तिला अजूनही कळत नाहीये. याचे परिणाम काय होतील यापेक्षा तिला यात काही चूक वाटत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे. मुळात रेशम जर चूक मान्यच करत नाहीये तर ती सुधारणार कशी?
रिया: मग आता काय करायच आपण? पुढे जाऊन जर शेखरला कळल तर काय परिणाम होतील या साऱ्याचे?
मयंक: परिणाम वगैरे या खूप पुढच्या गोष्टी झाल्या रिया.    परिणाम हे चूक ठरवण्यासाठीच  परिमाण नाही असू शकत. जे चूक आहे ते चूक आहे. परिणाम काहीही होतील किंवा नाही होणार.... तिला आत्ता सहानुभूतीची गरज आहे ती तिला दे . सहानुभूती दाखवता दाखवता हळूहळू ती कुठेतरी चूकतेय हे तिच्या लक्षात आणून दे. याचे परिणाम काय होतील या गोष्टी आत्ताच तिला नको सांगत बसूस. याने विरोधाला विरोध म्हणून ती पुन्हा चूकेल.
   रियाला मयंकच म्हणण पटल. तिने समाधानाने मान हलवली.  आज कितीतरी दिवसांनी तिला शांत वाटत होत. मयंकडे अभिमानाने बघत रिया म्हणाली "मयंक तुझे विचार किती प्रगल्भ आहेत, विचार करण्याची पद्धत किती वेगळी आहे. आज मी एका वेगळ्याच समजूतदार मयंकला बघतेय."
   " अस काही नाही ग रिया. एवढा तर समजूतदारपणा दाखवलाच पाहिजे ना. नाहीतर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग? शिक्षणाने नुसतच शिक्षित होण्यापेक्षा जर प्रत्येकजण सुशिक्षित झाला तर आजच्या जमान्यात नात्यांमध्ये  जे प्रॉब्लेम्स येत आहेत निदान ते तरी कमी होतील. तशी माझीही चूक झालीच ग. ऑफिसच्या या नव्या प्रॉजेक्टमूळे माझ तुझ्याकडे जरा दुर्लक्षच झाल आणि म्हणूनच तुझी ही अशी अवस्था झाली. पण आता पुढच्याच आठवड्यात हे प्रॉजेक्ट संपेल मग या मंथएंडला दोन दिवस आपण कुठेतरी फिरायला जाऊया फक्त तू आणि मी. आभाला आई बाबा बघतील. मी बोलतो त्यांच्याशी.." मयंकच हे बोलण ऐकून रिया आनंदाने त्याला मिठी मारते.तिच्या मनातले सगळे गोंधळ संपलेले असतात.  स्वरुप कानिटकरची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचा निर्णय ती घेते. तस करुन ती एका जुन्या मैत्रीची नव्याने सुरुवात करणार असते.
समाप्त.
©मानसी जोशी










 



 







 



4 comments:

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...