Wednesday, 29 March 2017

कथा - नातं

नातं
 समुद्राच्या लाटा खडकावर आदळत होत्या. सूर्याचा गोळा लाल केशरी झाला होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता. अशा रम्य संध्याकाळी एका खडकावर 'ती' दोघंजणं  शांतपणे बसून होती. वाऱ्यामूळे उडणारे तिचे केस हलक्या हाताने सावरत अथांग समुद्राकडे एकटक बघत 'ती' शांत बसली होती. तर तो तिच्या बोलण्याची वाट बघत मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता. क्षणभर त्याच्या मनात आलं, 'हिच मनही असच या अथांग सागरासारख आहे त्याचाही काहीच थांगपत्ता लागत नाही."बोल ना काहीतरी." तो शांतता भंग करत म्हणाला.
   "काय बोलू मी मला काहीच सुचत नाहीये. असच शांत बसून रहावसं वाटतय; या अथांग सागराकडे बघत" , ती शांतपणे म्हणाली.
     "का आज तर सगळ तुझ्या आवडीचं आहे. हा अथांग समुद्र, ही संध्याकाळ आणि सुर्यास्त सगळच .... तो म्हणाला.
"का तुला नाही आवडत हे सगळ?", सवयीने तिने प्रतिप्रश्न केला.
      "मला तू आवडतेस मग हे सगळ नाही का आवडणार ?" त्याने विचारल.
  त्याच्या या बोलण्यावर मात्र ती गप्प बसली.
       "बोल ना काहीतरी. नको अशी गप्प राहूस त्रास होतो मला याचा", तो काहीसा वैतागून म्हणाला.
       तिच्या डोळ्यात पाणी दाटल. "प्लीज आज तरी चिडू नकोस माझ्यावर. ही आपली शेवटची भेट आहे", ती रडवेली होवून म्हणाली.
      "म्हणूनच म्हणतोय निदान आज तरी बोल", ...तो.
      "सगळ्या गोष्टी शब्दात नाही सांगता येत. काही समजून घायच्या असतात." ती शक्य तितक्या शांतपणे म्हणाली
"पण मला नाही समजून घेता येत. कंटाळा आलाय मला आता. मला शब्दातच सांग. तसही शब्दांचे खेळ करणं तुला चांगलच जमत, नाही का ?" तो काहीस चिडूनच बोलत होता .
      ती पुन्हा शांत बसली. खरं तर तिला खूप काही बोलायचं होतं पण त्याला कस समजावायचं तेच तिला कळत नव्हतं. काही वेळ तसाच शांततेत गेला. तिच्या मनात शब्दांची जुळवाजुळव चालू होती.वेळ कापरासारखा उडून चालला होता. संध्याकाळ संपत  येत होती. त्याच्या मनाची चलबिचल वाढत होती. शांततेचा भंग करीत अखेर त्याने विचारल, "काही बोलणार आहेस का ?" ती मात्र तरिही गप्पच होती.
         "तुझा हात हातात घेउ?" त्याने  विचारले. तिने मान हलवून होकार दिला. तो हलकेच तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, "I Love you".
         ती अजूनही शांतच असते पण तिच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. स्वतःला सावरत ती त्याला म्हणते, "आमच  US ला जायचं कन्फर्म झालय.. . दोन वर्षांसाठी.... I hope मी परत येइन तेव्हा तू लग्न करून तुझ्या आयुष्यात सेटल झालेला असशील."
     "अखेर ठरलं तर! गुड! ऑल द बेस्ट! पिहूच्या स्कूलच काय ?म्हणजे तिकडची ॲडमिशन प्रोसेस वगैरे ... तो.
"सगळं ठरलय. तिची ॲडमिशन प्रोसिजर जवळपास झालेय." ती
     काही क्षण तसेच शांततेत जातात. शांततेचा भंग करत ती त्याला म्हणते, "मी खूप मिस करेन तुला”
      "का? कोण आहे मी तुझा ?सांग ना. या  प्रश्नाचं उत्तर देउ शकशील? जे द्यायच  तू आजवर टाळत आलेयस ; मी कोण आहे तुझा ? गेल्या दोन महिन्यात आपल्यात जे नातं निर्माण झालय त्याच नाव काय ? तू प्रेम नाही करत माझ्यावर?"...... तो
       "मला नाही माहित हे सारं काय आहे का आहे पण मला आवडतं तुझ्या सहवासात रहायला, तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला." ती
       "हो तेच विचारतोय मी, का ? काय नातं आहे तुझं माझं ?आणि तुला नाही माहिती तर कोणाला माहिती असणार? माझ्याकडून हे नातं क्लिअर आहे. तू मला आवडतेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. मान्य आहे तू मॅरीड आहेस. तुला तुझा संसार आहे. मला तुमच्या दोघांमध्ये यायचही नाहीये. मला फक्त एवढच जाणून घ्यायच आहे; Do you love me or not ?"
       काय बोलावं तिला काहीच सुचत नाही. खर तर तिने आज खूप काही बोलायचं ठरवलेलं असतं. पण शब्दच जुळत नाहीत. एव्हाना संध्याकाळ टळून रात्र सुरु झालेली  असते. काही क्षण तसेच शांततेत गेल्यावर तो विचारतो, "निघुयात ?"
      "थांबना थोडावेळ प्लीज ", ती
        "अग मग बोलना काहीतरी. निदान आजतरी बोल. जे मनात असेल ते बोल. अस सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्धवट सोडून जाऊ नकोस, प्लीज.".. तो.
        "कुठून सुरुवात करु काहीच कळत नाहीये रे. पण आज मला बोलायच आहे. खरच मनापासून सांगतेय. तू कितपत समजून घेशील माहिती नाही. पण गेले काही दिवस मी जाणीवपूर्वक तुझ्यापासून दूर राहिले होते; या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी.आज मला सगळी समाधानकारक उत्तरे मिळाली आहेत. फक्त ती तुला कशी समजावू हा प्रश्न आहे. माझ्या परिने मी उत्तरं शोधली आहेत. प्लीज समजून घे. मी जे काही सांगतेय ते शांतपणे ऐकून घे. खूप प्रॉब्लेम्स होते आयुष्यात अशा वेळी तू भेटलास आणि आपल्यात मैत्री झाली. आपल्या दोघातली प्रत्येक घटना न ठरवता घडत होती. कुठेतरी मी तुझ्याकडे ओढली  जात होते. आयुष्यात हरवून गेलेले काही क्षण तुझ्यासोबत जगत होतें.पण हे सगळं जरी कितीही खर असलं तरी  मला माझा संसार आहे. खूप प्रेम करणारा नवरा आहे. आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे, विश्वास आहे. पण कस  आहे ना लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायकोमधील मैत्रीच नातं कुठेतरी हरवतं. मुद्दाम नाही पण जे नातं महत्वाचं असतं  तेच जास्त जपलं जातं म्हणून असेल कदाचित  पण मैत्रीचं नातं हरवत जातं. त्यात संसाराच्या रामरगाड्यात जबाबदाऱ्या वाढायला लागतात आणि  निवांतपणा, रोमान्स या साऱ्या गोष्टी कमी होत जातात. एकमेकांशी बोलणं होतं तेव्हा बहुतांश वेळा प्रॉब्लेम्सवरच जास्त चर्चा होते किंवा जनरल संसारीक चर्चा. मग मनातला हळूवारपणा कुठेतरी हरवत जातो. आयुष्य एकदम एकसुरी होवू लागतं. मी पण असच एकसूरी आयुष्य जगत होते. अशातच तू आयुष्यात आलास. तुझ्याबरोबर असताना पुन्हा आयुष्य जगल्यासारखं वाटू लागल. तुझा सहवास आवडत गेला. त्यात तू सुद्धा माझ्यात गुंतत होतास अर्थात  हे तूच मला सांगितलस. मला नाही माहित हे खरं का खोटं ते. तू फ्लर्ट करतोयस का मनापासून सांगतोयस काहीच कळत नव्हतं. जे काही घडत होतं  ते अचानक अनपेक्षितपणे घडत होतं. हळूहळू भावनिकदृष्ट्या मी तुझ्यात गुंतत गेले. कळत नव्हतं  मला हे सगळं चूकीचे  आहे का बरोबर? पण स्वतःला थांबवता येत नव्हतं. तू माझ्या मनातल जाणून घ्यायला डेस्परेट होत होतास. पण मी काय सांगणार होते तुला जिथे माझच मला काही कळत नव्हतं. मला माझ्या नवऱ्याला फसवायच नव्हतं. त्याचा अधिकार  दुसऱ्या कोणालाही द्यायचा नव्हता. कारण माझं खरच खूप प्रेम आहे त्याच्यावर. पण त्याच वेळी तुलाही गमवायच नव्हतं. खर तर काय नातं आहे आपल्यामध्ये या प्रश्नाचा शोध मी सुद्धा घेत होते. खूप विचार केला मी यावर. मग मी जाणीवपूर्वक निदान  काही दिवस तुझ्यापासून लांब रहायच ठरवलं आणि मग मला  या प्रश्नाच उत्तर मिळाल.  मला जे उत्तर मिळालय ते मी तुला देते. मी प्रेम नाही करत तुझ्यावर.  कदाचित तू ही करत नसशील माझ्यावर. 'प्रेम' हा शब्दच मुळात खूप सुंदर आहे. पण तो जेवढा सुंदर आहे ना तेवढाच खूप गहन आहे. प्रेम तर  प्रत्येक नात्यात असतच फक्त त्याच स्वरुप नात्यागणिक बदलत जातं. आयुष्याच्या या वळणावर भान हरपून  बेभान होवून प्रेम करणं नाही शक्य. काही बंधने, काही नियम हे पाळावेच लागतात.  प्रत्येक नात्याला महत्व देउन, प्रत्येक नात्याचा मान ठेवून नाती जपणं महत्वाच असतं. रहाता राहिला प्रश्न आपल्या नात्याचा 'मैत्रीच' म्हणते मी आता त्याला. कारण दुसर काही नाव नाही सुचल मला. खर तर प्रत्येक नात्याला काही नाव द्यायची गरजही नसते.  पण जर तुझा अट्टाहासच आहे नाव द्यायचा तर आपण मैत्रीच म्हणूया. मला माहितेय आपलं नातं मैत्रीच्या पलीकडल आहे पण मग त्याला नाव काय देउ? माझ्या आयुष्यातली माझ्या नवऱ्याची जागा कधीच कोणी घेउ शकत नाही.पण अस असल तरी तुझही माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे. एक वेगळच भावनिक नातं तयार  झालय आपल्यामध्ये. आता 'तुच का ?' या प्रश्नाच उत्तर नाहीये माझ्याकडे.  खर  तर सगळ खूप गुंतागुंतीच आहे. माझ्या परिने मी हा गुंता सोडवायचा प्रयत्न केला आहे. पण जे नातं आहे ते खरच खूप सुंदर आहे. त्याला नाव द्यायचा अट्टाहास नको करुस प्लीज. आपल्या नात्यात जी अपूर्णतेची गोडी आहे ती ओढ बनून तशीच राहूदे. तुला हे सारं कितपत पटेल मला नाही माहिती. पण मी खरच हे सगळं मनापासून बोलतेय. पुढे काय करायच? आपल नातं टिकवायच का नाही  याचा निर्णय तू घ्यायचा आहेस .ती एका दमात सगळ  बोलून टाकते. मनात साचलेल सगळ त्याच्यासमोर  बोलून मोकळ झाल्यावर तिलाही खूप बरं वाटत.
        थोडा वेळ तसाच शांततेत गेल्यावर ती उठून जायला निघते. तो ही तिला थांबवत नाही.ती  निघून गेल्यावरही कितीतरी वेळ तो तसाच शांत बसून असतो. समुद्र, गार वारा सारं काही अगदी तसच असतं. फक्त  सुर्यास्त संपून एक नवा चंद्रोदय झालेला असतो.
©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...