Tuesday, 21 February 2017

कथा - कॉफी

कॉफी
संध्याकाळी कॅफेबाहेर उभा राहून तो तिची वाट बघत असतो. दर मंगळवारी सव्वासहापर्यंत येणारी ती आज साडेसहा वाजले तरी आलेली नसते. एवढ्यात त्याला ती धापा टाकत येताना दिसते. त्याच्या कपाळावरची आठी सरकून त्याच्या ओठांवर येते आणि स्मितहास्यात बदलते.
        ती समोर येउन गोड हसून 'सॉरी' म्हणते. तो उगाचच काहिसा वैतागून म्हणतो, "किती उशीर?" ती तेवढ्याच शांतपणे सांगते, "मीटिंग होती."
        दोघ कॅफेमध्ये जातात. तो ऑर्डर देतो, "दोन स्ट्रॉंग कॉफी."
       ती म्हणते, "चिडू नकोस पण मला लगेच निघाव लागेल. सासूबाईंना दवाखान्यात न्यायच आहे."
      तो वैतागून विचारतो, "आजचाच दिवस सापडला का?"
         "आजार दिवसवार ठरवून येतात का?" ती सवयीने तिच उत्तर प्रतिप्रश्न करुन देते.
       आता मात्र त्याची चिडचिड वाढते आणि तो काहिसा चिडून तिला विचारतो, " फक्त १०/१५ मिनिटेच भेटायच होत तर मग कशाला आलीस?"
        ती अजूनही शांतच असते आणि अगदी सहजपणे त्याला सांगते, "कारण दर मंगळवारी इथे भेटतो आपण. मी तुझ्याशी आणि माझ्याशी केलेली एक कमिटमेन्ट आहे ती. इथे आल्यावर ना मी कोणाची बायको असते, ना कोणाची आई, ना कोणाची सून आणि ना कोणाची एंप्लॉयी. काही क्षण का होइना मी इथे येउन फक्त 'मी' म्हणून जगते. तुझी निखळ निरपेक्ष मैत्री आणि त्यासोबतची स्ट्रॉंग कॉफी मला इतर भूमिका समर्थपणे पेलण्याची ताकद देतात.माझ्या मनाची मरगळ झटकून मी नवी आव्हाने झेलायला तयार होते."
     तेवढ्यात वेटर वाफाळणाऱ्या कॉफीचे दोन मग टेबलावर आणून ठेवतो. कॉफीच्या वाफेबरोबर त्याचा रागही उडून जातो. कॉफीच्या घोटाबरोबर त्याला जाणवत, तिने स्ट्रॉंग राहूनही तिच्यातला गोडवाही जपलाय अगदी या कॉफीसारखा!  नकळत तो तिला 'Thanks' म्हणतो.
       ती विचारते, "कशासाठी?" तो हसून म्हणतो, "For coffee -for everything". त्याला जे म्हणायच असत ते तिला कळत. त्यांच नात असच असत-  कडू कॉफीत विरघळलेल्या गोड साखरेसारख. या नात्यामूळेच त्यांच्या आयुष्यातला गोडवाही  टिकून असतो.
©मानसी जोशी.








No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...