Tuesday, 25 April 2017

कथा - टेकडी

#टेकडी
      मुसळधार पाऊस बरसत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या  निर्जन  निवांत टेकडीवर  निकिता एकटीच बसून होती. आत्ता या क्षणाला निकिताच्या डोळ्यातून बरसणारा पाऊस बाहेरच्या पावसाशी जणू स्पर्धाच करत होता. तिला आठवत होतं; अगदी याच ठिकाणी अशाच मुसळधार पडणाऱ्या पावसात ती आणि आदित्य या टेकडीवर आले होते. याच ठिकाणी तिला उमलत्या वयातील  प्रेमाचा खरा अर्थ कळला होता. त्या पहिल्या प्रेमाच्या हळूवार स्पर्शाने आकाशातल्या विजेसारखी तिच्या शरीरातही वीज सळसळली होती. तिच्या मनात आलं सगळं अगदी तसच आहे पण बदलल आहे ते फक्त तिचं आयुष्य.
*********--
      आदित्य म्हणजे तिचा आदि आणि पेंढारकर घराण्यातल शेंडेफळ. पेंढारकर घराण म्हणजे मोठ प्रतिष्ठीत घराणं. आदित्यचे आजोबा विष्णुशास्त्री पेंढारकर म्हणजे विद्वान पंडितच जणू. भगवद्गीता, वेद आणि एकूणच  धार्मिक ग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांची स्वतःची वेदशाळा, गोशाळा आणि एक देउळ होते. सद्ध्या त्यांचा हा सारा पसारा आदित्यचे वडील आणि मोठा भाऊ सांभाळत होते .पुढे जाऊन आदित्यने हे सारं सांभाळावं अशी त्याच्या आजोबांची इच्छा होती पण जबरदस्ती मात्र नव्हती.  आदित्य मात्र एकदम वेगळा. प्रचंड हुशार पण तितकाच शांत. मनातल पटकन कोणाशीही न बोलणारा.  त्याला या  साऱ्यामध्ये अजिबात रस नव्हता. नुकताच तो CA झाला होता आणि एका फर्ममध्ये नोकरी करत होता. त्याच्या आजोबांचा मात्र त्याचा प्रचंड जीव होता. त्यामुळे घरातले अनेक नियम त्याच्यासाठी शिथिल करण्यात आले होते.  चला निदान त्याच्या या करिअरची आपल्या कामात काहीतरी मदत होइल म्हणून त्याच्या घरचेही खुश होते.
       निकिता तशी साधी सरळ मुलगी. नुकतीच तिच्या वडिलांची बदली या नवीन शहरात झाली होती. ग्रॅज्युएट झालेल्या निकिताने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी L.LB साठी ॲडमिशन घेतली. आदित्यच्या CA फर्म च्या बरोबर समोर तिचं कॉलेज होतं. दोघांचा जायचा यायचा रस्ताही एकच होता. सुरुवातीला आदित्य बाईक घेऊनच ऑफिसला जायचा पण जेव्हापासून निकिताशी नजरानजर झाली तेव्हापासून बरेचदा तो निव्वळ तिला बघण्यासाठी म्हणून बसने जायचा. निकिताची नजरही  नकळतपणे त्यालाच शोधत असायची अशा नजरानजरीच्या खेळातच सहा महिने सरले. अखेर आदित्यने हिम्मत करुन तिच्याशी बोलायचे ठरवले. पण कधी, काय, कसं असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले. पण त्या दिवशी तशी संधी त्याला मिळाली. डिसेंबरचे दिवस होते. निकिताच्या कॉलेजमध्ये 'डेज' चालू होते. त्या दिवशी  'सारी डे' होता. साडी नेसून नटून तयार होवून निकिता बस स्टॉपवर आली होती. तिची आणि आदित्यची नजरानजर झाली.  तिच हे सोज्वळ सौंदर्य बघून आदित्य तिच्याकडे बघतच बसला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरुन हटतच नव्हती. तेवढ्यात बस आली. साडी सावरत निकिताला बसमध्ये चढता येइना. आदित्यने मात्र पटकन बसमध्ये चढून तिच्यासाठी जागा ठेवली आणि मग इतके दिवस न झालेला संवाद सुरु झाला. हळूहळू बसमधल्या भेटीगाठी वाढत गेल्या छान मैत्री झाली. अहो जाओ करता करता ती दोघं एकमेकांची आदी आणि निक्की कधी झाले ते त्यांच त्यांना पण कळल नाही. असेच अजून काही दिवस सरले. दोघांनाही एकमेकांच्या मनात असणारं प्रेम जाणवत होतं पण बोलत मात्र कोणीच नव्हतं. पण न बोलताही नजरेच्या भाषेतून दोघं खूप काही बोलत होती. पण त्यांच्या या भावना मात्र मुसळधार पावसाच्या साक्षीनेच व्यक्त होणार होत्या. मे महिन्याचे दिवस संपत आले होते. कॉलेजच्या सुट्ट्या चालू होत्या. त्यामुळे दोघांचे फक्त फोनवरच बोलणं होत होतं. पण त्या दिवशी आदित्यने निकिताला समुद्रावर भेटायला बोलावले होते. बस आणि बसस्टॉप सोडून आज ती दोघं प्रथमच बाहेर भेटणार होते. दुपारनंतर आकाशात पावसाळी ढग जमा झाले होते.ते बघून निकिता उदास झाली होती. अशा वातावरणात घरातून बाहेर पाठवणं थोडं कठीणच होतं. पण पावसाने जणू तिचं ऐकलं आणि तो त्यांच्या भेटिपर्यंत  बरसायचा थांबला.
   निकिता समुद्रावर पोचली तेव्हा आदित्य तिची वाटच बघत होता. तिला बघून त्याचा चेहरा खुलला. आज जवळपास महिनाभरानंतर तो तिला बघत होता. दोघांच्यामध्ये जुजबी बोलणं झालं आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु झाल्यावर निकिता गडबडीने आडोसा शोधायला धावणार तोच आदित्यने तिचा हात धरुन तिला थांबवलं आणि म्हणाला, "पहिल्या पावसात भिजायच असतं. मला आवडतं भिजायला तुला आवडेल ?"  निकिताच्या छातीत अनामिक धडधड सुरु झाली काय बोलावं तिला काहीच कळत नव्हतं. ती तशीच शांत उभी राहिली. मुसळधार पाऊस सुरु झाला होता. अजूनही तिचा हात आदित्यच्या हातात होता. ना तिने तो सोडवून घ्यायचा प्रयत्न केला ना त्याने तो सोडला. "अशा मुसळधार पावसात बाईक घेउन शहराबाहेरच्या निर्जन टेकडीवर जायला; तिथे उभं राहून पाऊस बघायला तसही आवडतं मला; पण तू जर बरोबर असशील तर अजून आवडेल; येशील माझ्याबरोबर?" आदित्यने विचारलं.            निकिताने उत्तरादेखल फक्त मान हलवली.
   "बघ हा ती टेकडी तशी एरवीही निर्जन असते आज तर अशा पावसात कोणी फिरकणार पण नाही तिथे. येशील अशा ठिकाणी माझ्याबरोबर एकटीने? एवढा विश्वास आहे माझ्यावर?" आदित्यने पुन्हा विचारलं.
    या वेळी मात्र निकिता हसून म्हणाली, "हो येइन. खूप विश्वास आहे माझा तुझ्यावर; स्वतःपेक्षाही जास्त!"
तिच्या या उत्तराने आदित्य खूष झाला. दोघजणं बाईकवरुन टेकडीवर गेली. तिथून पाऊस बघताना; पावसात भिजताना निकिता अगदी हरखून गेली होती. तेवढ्यात आदित्य तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेउन तिला म्हणाला, "I love you Nikita. Will you marry me?"
     हे ऐकून निकिता काही क्षण तशीच शांत उभी राहिली. सळसळणाऱ्या विजेसारखी तिच्या अंगातूनही विज सळसळत गेली. तिच्या नजरेने त्याला होकार दिला  पण हा होकार त्याला तिच्या शब्दांमधून  ऐकायचा होता. "सांग  ना तू करतेस प्रेम माझ्यावर?" आदित्यने पुन्हा विचारल. "Yes I love you very much Aditya". आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे", असं म्हणून निकिता त्याच्या मिठीत शिरली.
     त्यानंतर मात्र सगळी चक्र वेगाने फिरली. सुदैवाने दोघांचीही पत्रिका अगदी छान जुळली. आदित्यच्या घरी सुंदर संस्कारी निकिता चटकन पसंत पडली. निकिताच्या घरी तर सगळे खूपच आनंदात होते. साक्षात विष्णुशास्त्री पेंढारकरांच्या घराशी नातं जोडलं जाणार म्हटल्यावर निकिताचे आई बाबा एकदम आनंदीत झाले होते. पण या सगळ्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे लग्न ठरलच आहे तर जवळचाच मुहूर्त बघून ते उरकून टाकावं असा आग्रह आदित्यच्या घरच्यांनी धरला. आदित्यच्या आजोबांची म्हणजेच विष्णुशास्त्रींची तब्येत आजकाल फारशी ठिक नसते त्यामुळे लवकरात लवकर विवाह उरकून घेणच योग्य या मतावर ती मंडळी ठाम होती. पण निकिताला मात्र  L. LB कंप्लीट करुनच लग्न कराव असं वाटत होतं. तस पाहिलं तर आदित्यच्या घरच्यांना तिने लग्नानंतर शिक्षण चालू ठेवणं चालणार होतं पण एकूणच त्या घरातलं सोवळं ओवळं, धार्मिक  वातावरण या सगळ्यात आपलं कॉलेज आणि अभ्यास हे सारं कसं जमणार हा प्रश्न निकितासमोर होता. अखेर आदित्यने समजूत काढल्यावर हो नाही करत  निकिता लग्नासाठी तयार झाली. डिसेंबर महिन्यात लग्नाचा मुहूर्त निघाला. आदित्य आणि निकिता स्वप्नांच्या दुनियेतच वावरत होते. पण कोणाला माहिती होतं नियतीच्या मनात काय आहे? त्या दिवशी लग्नाच्या खरेदीसाठी म्हणून आदित्यच्या कुटुंबासोबत गेलेली निकिता परत आलीच नाही. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. पोलिस कंप्लेंट करण्यात आली. चौकशीचा ससेमिरा दोन्ही कुटुंबांच्या मागे लागला. घरी पोलिसांचा होणारा वावर त्यांची उलटसुलट प्रश्नोत्तरे या साऱ्यामूळे वयोपरत्वे आधीच आजारी असणाऱ्या विष्णुशास्त्रींनी अथरुण धरले. आदिची अवस्था तर बघवत नव्हती.  काय झालं निकिताचं? कुठे गेली असेल ? काही बरं वाईट तर झालं नसेल या विचारांनी दोन्ही घरचे कुटुंबीय खूपच घाबरले होते. अगदी तिच्या वर्णनाशी मिळतीजुळती डेडबॉडी बघण्याचीही वेळ त्यांच्यावर आली होती. बघता बघता महिना होत आला पण निकिताचा मात्र काहीच पत्ता लागत नव्हता.
****
त्या दिवशी ॲडव्होकेट रमाचा मोबाईल मध्यरात्रीच वाजत होता. झोपेतून उठून तिने जरा वैतागूनच मोबाईल बघितला तर फोन इन्स्पेक्टर आकाशचा  होता. इन्स्पेक्टर आकाश म्हणजे रमाचा भाचा तिच्या मोठ्या बहिणीचा मुलगा. आकाशचा फोन बघून तिला जरा आश्चर्यच वाटलं. तिने पटकन फोन रिसिव्ड केला. आणि काही मिनिटातच फोन ठेवून ती पोलिस स्टेशनला जायला निघाली.
  ॲडाव्होकेट रमा पोलिस स्टेशनवर पोचली तेव्हा ऐन मध्यरात्रीही पोलिस स्टेशनमध्ये प्रचंड गडबड चालली होती. अर्थात त्याला कारणही तसच होतं; सिनिअर इनस्पेक्टर विजय पाटील यांचा रेड लाईट एरियामध्ये त्यांच्याच रिव्हॉल्वरने गोळ्या घालून खून करण्यात आला होता. खून करणाऱ्या मुलीला अटक करण्यात आली होती. तातडीने सगळी सुत्र हलून केस इनस्पेक्टर  आकाशकडे सोपविण्यात आली होती. पोलिस स्टेशनबाहेर प्रेस, मीडियाची गर्दी झाली होती. या गर्दीतून कशीबशी वाट काढत रमा आकाशच्या टेबलापर्यंत गेली. ॲडव्होकेट रमाला  पोलिस स्टेशनला आलेलं पाहून बाहेर वेगवेगळ्या तर्क वितर्काना उत आला होता. बाहेरची गर्दी आटोक्यात आणता आणता पोलिसांची दमछाक होत होती.
    "बोला मिस्टर आकाश काय प्रॉब्लेम आहे ?"  आकाशच्या टेबलापाशी जाऊन रमाने खड्या आवाजात विचारले.
    तिला आलेलं बघून आकाश विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. "अरे,मावशी  तू आलीस पण;  सॉरी ॲडव्होकेट रमा आल्यात पण तुम्ही." आकाश म्हणाला.
  "मुद्द्याचं बोल काय झालय? अर्धवट झोपेतून उठून यायला लावलस म्हणजे नक्कीच सिरियस असणार."- रमा
"बस सांगतो सगळं सविस्तर", असं म्हणून आकाशने बोलायला सुरुवात केली.
     "रात्री साधारणपणे १२/ १२. ३०  च्या सुमारास मला कॉल आला इंस्पेक्टर विजय पाटील यांचा रेड लाईट एरियामध्ये तिथल्याच एका वेश्येने खून केला तो ही त्यांच्याच रिव्हॉल्वरने. आम्ही लगेच तातडीने तिथे पोचलो. ती मुलगी खूप विचित्र वागत होती. हातात रिवॉल्वर होतं डोळे आग ओकत होते. लेडी इंस्पेक्टरने मागितल्यावर मात्र तिने रिव्हॉल्वर लगेच त्यांच्या हातात दिलं आम्ही तिला अटक केल्यापासून ती एक शब्दही बोलत नाहीये. शांतपणे तशीच बसून आहे. चौकशीअंती कळलं  इंस्पेक्टर पाटील तिथे रेड टाकण्यासाठी गेले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर फक्त एक हवालदार होता आणि तो ही झाल्या प्रकाराने भेदरलेला वाटत होता. त्याने सांगितलेली कुठलीही गोष्ट मनाला पटत नाहीये."
      "बरं मग मी काय करणार यामध्ये हे सगळं तू तुमच्या सरकारी वकिलांशी बोल ना. मला कशासाठी बोलवल आहेस ?" रमाने विचारलं.
  "सांगतो; तू त्या मुलीची केस घ्यावीस असं मला वाटतं", आकाश मूळ मुद्द्यावर आला.
      "What ? Are you mad ? १८  वर्षे प्रॅक्टिस करतेय मी पण कुठल्याही गुन्हेगाराची केस कधी घेतली नाही आजपर्यंत. आणि तू मला म्हणतोयस तिची केस घेऊ?" रमा चिडून म्हणाली.
  "ऐकून तर घे पूर्ण. मान्य आहे मला ती खूनी आहे तसे प्रत्यक्षदर्शी पुरावेही आहेत. पण मन मानायला तयार होत नाहीये. काहीतरी गडबड नक्की आहे. तिचं शांत बसून रहाणं, तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि मुख्य म्हणजे तिची नजर असं वाटतं खूप काही साचलय तिच्या मनात”. आकाश.
   "पोरगी सुंदर आहे का रे ? अगदी नजर, मन वगैरे भाषा    करतोयस. रमाने हसत विचारलं.
    "ओह कमॉन मावशी. मी सिरिअसली सांगतोय. अगं एकदा तिला भेटून तिच्याशी बोलायचा प्रयत्न तर कर. मला खात्री आहे तू तिला बोलतं करु शकशील. नसेल घ्यायची तिची केस तर नको घेऊस. पण निदान ते तिच्याशी बोलून मग काय करायचं ते ठरव ना. तसही तुमच्या कायद्यानुसार, 'हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नाही' बरोबर ना?" आकाश.
    "अरे वा ! मेरी बिल्ली और मुझेही म्याव. ठिक आहे चल भेटते तिला. बरं झालं हा आकाश तू इंस्पेक्टर झालास. वकील झाला असतास तर माझी प्रॅक्टिस बंद पडली असती", रमा हसत म्हणाली.
****
त्या दिवशी कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी होती मिडिया, प्रेस, सामाजिक संस्था साऱ्यांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं ते म्हणजे ॲडव्होकेट रमा यांनी एका रेड लाईट एरियातील गुन्हेगार  मुलीची केस कशी काय घेतली. बरं गुन्हासुद्धा साधासुधा नाही तर चक्क खूनाचा आरोप होता तिच्यावर; तो ही एका नामांकित पोलिस इंस्पेक्टरचा खून तो ही त्याच्याच सर्विस रिव्हॉल्वरने केल्याचा.... ॲडव्होकेट रमा जेव्हा सुनावणीसाठी कोर्टात पोचल्या तेव्हा सगळ्यानीच त्यांना घेराव घातला. पण त्यांच्या असिस्टंटने संध्याकाळच्या पत्रकार  परिषदेच्या आयोजनाबद्दल सांगून सगळ्यांना शांत केले.
      ॲड्व्होकेट रमाच्या प्रेस कॉन्फरन्सला प्रचंड गर्दी झाली होती. ॲडव्होकेट रमाने सगळ्याना धन्यवाद देउन बोलायला सुरुवात केली-
  "मला माहिती आहे तुम्हांला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की एका गुन्हेगाराची केस मी का घेतली. मी सगळं सविस्तर सांगते; पण त्या आधी सगळ्यांना विनंती आहे की माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय कोणीही मध्ये काहीही विचारणार नाही तसं झाल्यास ही प्रेस कॉन्फरंस मी तिथेच थांबवेन. माझं बोलणं पूर्ण झाल्यावर तुमचे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देइन हा माझा शब्द आहे. ॲडव्होकेट रमाची हुशारी, बोलण्याची पद्धत, एकूणच तिचं व्यकिमत्व इतकं प्रभावी होतं की तिच्याविषयी समोरच्याच्या मनात चटकन आदर निर्माण होत असे. जमलेल्या पत्रकारांनी तिचं म्हणणं अगदी सहज मान्य केलं आणि मग रमाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. -
    "हो हे खरं आहे की माझी अशील मिस निकिता हिने खून केला आहे पण ज्या परिस्थितीमध्ये हा खून झाला ते बघता तिने जे केलं ते योग्यच असं म्हणावं लागेल. मी जेव्हा तिला भेटले तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती पण जे झालय त्याचा तिला जराही पश्चात्ताप होत नव्हता. निकिता एक साधी सरळ सुंदर मुलगी. पण या सौंदर्यानेच तिचा घात केला. लग्नाच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेली निकिता पुन्हा घरी गेलीच नाही. कसं ते तिला आठवत नाही पण तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती एका अंधाऱ्या खोलीत होती. सुरवातीला खूपच गोंधळली तिला काहीच समजत नव्हतं. पण जेव्हा पूर्ण शुद्ध आली तेव्हा तेव्हा तिच्या लक्षात आलं आपण एकस रेड लाईट एरियामध्ये आहोत. ती खूप रडली तिथून बाहेर पडण्यासाठी तिने खूप विनवण्या केल्या पण कोण तिला तिथून  बाहेर जायला देणार होतं. त्यानंतर सुरु झाला तिला वेश्या बनवण्याचा खेळ. तिला समजावून,  मारहाण करुन, उपासमार करुन कुठूनही तिला वेश्या होण्यासाठी तयार करायचं होतं त्या लोकांना. निकिताने मात्र या सगळ्या प्रसंगाला हिमतीने तोंड दिले ती डगमगली नाही. सगळ सहन केला. अखेर ती बधत नाही म्हटल्यावर जबरदस्तीने तिच्या खोलीत गिऱ्हाईके पाठवण्यात आली पण तिने मात्र स्वतःच्या हुशारीने त्यांनाही पळवून लावलं. मग मात्र तिचे अधिकच हाल सुरु झाले. अखेर तिथल्या  चहावाल्या मुलाच्या मदतीने ती कशीबशी तिथून बाहेर पडली आणि तिने तडक पोलिस स्टेशन गाठलं. तिथे गेल्यावर तिथल्या इंस्पेक्टरना सगळी हकीगत सांगितली आणि घरी सोडायची विनंती केली. हे सगळं ऐकून इंस्पेक्टरनी क्षणाचाही विलंब न करता एक हवालदार सोबत घेतला आणि तिला घरी सोडायला निघाले. पण  प्रत्यक्षात मात्र त्यांची गाडी तिच्या घराच्या नाही तर रेड लाईट एरियाच्या दिशेने धावत होती. 'त्या' एरियाच्या आसपास आल्यावर निकिताच्या लक्षात आलं की पुन्हा आपण त्याच भागात आलोय जिथून आपण आपली सुटका करुन घेतली होती. तिला प्रचंड मोठा धक्का बसला. या धक्क्यातून ती सावरायच्या आत ती पुन्हा त्या अंधाऱ्या कोठडीत जाऊन पडली होती. प्रचंड संताप, दु:ख , हतबलता या सगळ्या भावना एकाच वेळी तिच्या मनात दाटून आल्या. ती स्वतःला सावरतेय न सावरतेय तोवर तिच्या कानावर शब्द पडले, 'काय नवीन मुलगी आणलीत ती पण  एकदम हॉट आणि मला खबर पण नाही?'
'नाही साहेब पोरगी तयारच होइना काय करणार?' अजून एक आवाज
' मी करतो ना तयार कशी तयार होत नाही बघूयात... तू फक्त माझा ब्रॅन्ड घेउन ये कारण थोडी प्यायल्याशिवाय मजा नाही.... ... यानंतर छद्मी हास्याचे आवाज आले.
    यानंतर मात्र निकिताने स्वतःला सावरलं आणि आलेल्या परिस्थितीला कसंही करुन तोंड द्यायचं आणि आपल्या शिलाचं रक्षण आपणच करायचं हा निश्चय करुन ती प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला तयार झाली.
      थोड्यावेळाने इंस्पेक्टर जेव्हा खोलीमध्ये आले तेव्हा निकिताने त्यांच्याशी चक्क गोड बोलायला सुरुवात केली. आधीच प्यायलेल्या त्याच्यासाठी हा एक सुखद धक्का होता. निकिताने हुशारीने त्याला अजून दारु पाजली. आणि वासनेने बरबटलेली नजर घेउन  जेव्हा तो नशेतच तिच्याजवळ गेला तेव्हा तिला त्या नजरेचा अक्षरशः किळस वाटला आणि त्याचा  प्रचंड संताप आला. तिच्याकडे लाळघोट्या नजरेने बघत इंस्पेक्टरने आपलं सर्विस रिव्हॉल्वर बाजूच्या टेबलावर ठेवलं आणि शर्टाची बटणं काढायला सुरुवात केली. निकिता सावध झाली तिने क्षणाचाही विलंब न करता ती रिव्हॉल्वर उचलली आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या गोळ्यांचा आवाज ऐकून सगळे त्या खोलीकडे धावले पण निकिताने समोर रिव्हॉल्वर रोखून ठेवले. त्या क्षणी तिच्यात रणरागिणी संचारली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले इंस्पेक्टर आणि हातात रिव्हॉल्वर धरुन उभी असलेली निकिता हे  बघून सगळेच भांबावले. कोणीतरी पोलिस स्टेशनला फोन केला आणि मग पुढचं काय ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. आणि हे इंस्पेक्टर म्हणजे इंस्पेक्टर विजय पाटील. जनतेचा रक्षकच जेव्हा असं वागला तेव्हा काय करायला हवं होतं निकिताने? मला कुठलेही प्रश्न विचारण्यापूर्वी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, काय चुकलं निकिताचं?
       ॲडव्होकेट रमाचं बोलणं ऐकून सगळे सुन्न झाले होते. काही जुजबी प्रश्नोत्तरे झाल्यावर पत्रकार परिषद संपली. या पत्रकार परिषदेचा रमाला अपेक्षित परिणाम दिसला. सगळ्या न्यूज चॅनेल्स आणि पेपर्सनी निकिताची बाजू उचलून धरली. मिडियाला फक्त ब्रेकिंग न्यूजमध्ये इंटरेस्ट असतो. त्यात कोणाच्या दु:खाचं भांडवल करायला मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी 'सोनेपे सुहागाच' आणि हे रमाला चांगलच माहिती होतं म्हणूनच तिने मिडियाच्या या मानसिकतेचा उपयोग आपल्या केससाठी करायचं ठरवूनच पत्रकार परिषद आयोजित केली होती. या सगळ्याचा अपेक्षित तो परिणाम झाला आणि ही केस लवकरात लवकर संपवण्याचे आदेश कोर्टाला देण्यात आले. इंस्पेक्टर आकाशनेही भरपूर प्रयत्न करुन इंस्पेक्टर विजय पाटील यांच्याविरुद्धचे  काही महत्वाचे पुरावे गोळा केले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अवघ्या सात महिन्यात ही केस संपली आणि स्वतःच्या शिलाचं रक्षण करणे आणि  सेल्फ डिफेंस या कारणांमुळे निकिताला निर्दोष सिद्ध करण्यात रमा यशस्वी झाली. निकिता  या प्रकरणातून निर्दोष  सुटली पण पुढे तिच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे हे तिचं तिलाच माहिती नव्हतं.
     आयुष्यातले भयाण आठ महिने विसरणं निकिताला सहज शक्य नव्हतं. झाल्या प्रकाराचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पण यापेक्षाही सगळ्यात  मोठा धक्का तिला कुठला बसला असेल तो आदीच्या लग्नाचा. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी आदित्यचं लग्न झालं पण त्याच्या वधूच्या जागी निकिता नव्हती. ती दुसरीच कोणीतरी होती.  निकिताबद्दलचा प्रकार आदीच्या घरी कळल्यावर त्यांनी लगेच लग्न मोडलं, "अशी रेड लाईट एरियात महिनाभर राहिलेली खूनी मुलगी पेंढारकर घराण्याची सून होणं शक्य नाही" अशा स्पष्ट शब्दात त्यांनी नकार कळवला होता. मनाविरुद्ध का होइना पण आदीने लग्न केलं याचा तिला प्रचंड धक्का बसला होता.
      सुरुवातीला प्रेस, मीडिया यांच्या मुलाखतींमूळे  गोंधळून गेली होती. त्यात सगळ्यांसमोर आलेलं तिचं आणि आदित्यचं नातं. पेंढारकर घराण्याच्या हितशत्रूनी निकिताला त्यांच्याविरुद्ध वापरायचा केलेला प्रयत्न, या साऱ्यामूळे ती हतबल झाली होती. तिच्या मनात आलं, 'काय साध्य केलं आपण निर्दोष मुक्त होऊन? हे एकाकी आयुष्य? का समाजाच्या दुषित, संशयास्पद नजरा? घराबाहेर जाणं तिला नकोसं वाटत होतं. घरात खिडकीजवळ शांत बसून एकटक  खिडकीबाहेर बघण्यातच तिचा दिवस  जात असे. तिची  अवस्था बघून तिच्या आई वडिलांचा जीव तुटत असे. निदान वेगळ्या वातावरणात  हळूहळू का होइना पण साऱ्या दु:खातून बाहेर येइल असा विचार करुन अखेर त्यांनी आपल्या गावी परत  जायचा निर्णय घेतला. पण निकिताच्या बाबांची बदली इतक्या लवकर होणं शक्य नव्हतं म्हणून मग त्यांनी इथेच राहून निकिता आणि तिची आई गावाला जातील असं ठरलं.
      मे महिना संपत आला होता. घरात सामानाची बांधाबांध चालू होती. निकिता शांतपणे खिडकीत बसून  बाहेर बघत बसली होती. दुपार टळून हळूहळू संध्याकाळ सुरु होत होती.  बाहेर ढग दाटून आले होते. कोणत्याही क्षणी पाऊस येइल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक निकिताच्या मनात काय आलं कुणास ठाऊक ती चटकन उठली आणि आवरून तयार होऊन आईला म्हणाली, "आई मी जरा जाऊन येते."
   " अगं आत्ता  कुठे निघालीस? बाहेर बघ किती अंधारुन आलय. कोणत्याही क्षणी पाऊस सुरु होइल. आई काळजीने म्हणाली.
  "अगं जिच्या आयुष्यातच अंधार झालाय तिला या अंधाराची कसली भीती? आणि पावसाचं म्हणशील तर तो माझ्या डोळ्यातून नेहमीच बरसत असतो. जाऊदे मला" , असं म्हणून निकिता घराबाहेर पडली आणि सरळ टेकडीवर गेली.
      ती टेकडीवर गेली तेव्हा मुसळधार पाऊस सुरु झाला होता. तिला आठवलं, "याच पावसात गेल्या वर्षी आदीने तिला प्रपोज केलं होतं .... त्याच्या हळुवार स्पर्षाने मन मोहरलं होतं त्याच्या मिठीत जेव्हा स्वतःला झोकून दिलं तेव्हा आयुष्यातले  सगळ्यात सुंदर क्षण जगले होते...... आणि आज फक्त एकाच वर्षात सगळं संपल? जर असच घडायचं होतं तर मला आणि आदीला एकत्रच का आणलस देवा? तिचं मन आक्रोश करत होतं. ती हतबल होवून कितीतरी वेळ तशीच पावसात बसून रडत होती.
   "निकिता, निकिता ......" तिला कोणाची तरी हाक ऐकू आली आणि ती भानावर आली. तिने मागे वळून पाहिल तर इंस्पेक्टर आकाश तिला हाका मारत तिच्या दिशेने येत होता. तिला आश्चर्य वाटलं.
    "अगं वेडी आहेस का तू? अशा पावसात या निर्जन टेकडीवर  एकटी आलीस? तुला भीती नाही वाटली ?" आकाशने विचारले.
   " रेड लाईट एरियात महिनाभर कैदेत राहिलेल्या, हालअपेष्टा सोसलेल्या खूनी मुलीला कसली आलेय भीती? उलट आज खूप दिवसांनी मोकळं झाल्यासारख वाटतय इथे येउन. पण तुम्ही इथे कसे? " – निकिता.
"तुम्ही हे शहर सोडून निघाल्याचं कळलं म्हणून मुद्दाम तुला भेटायला  तुझ्या घरी गेलो होतो.  खूप महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. पण घरी गेल्यावर कळलं तू बाहेर गेली आहेस. तोपर्यंत पाऊस सुरु झाला होता मग मी अंदाज केला तू इथेच आली असशील." – आकाश.
     "पण मी इथेच असेन हे कसं कळलं तुम्हाला?" – निकिता
"तुझ्या डायरीमूळे", असं म्हणून आकाशने हातातल्या प्लस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली डायरी तिच्यासमोर धरली.
"ही डायरी तुमच्याकडे कशी आली?" - निकिता.
 "तू हरवल्यानंतर तुझ्या घरच्यांनी पोलिस कंप्लेंट केली होती. त्यावेळी केसचा  भाग म्हणून ही डायरी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. पुढे तुला अटक झाल्यानंतर ही डायरी माझ्याकडे आली. माफ कर पण ही डायरी मी पूर्ण वाचली. तपासाचा एक भाग म्हणूनही आणि तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणूनही." – आकाश.
"माफी कसली मागता तुम्ही. तुम्ही खूप केलय माझ्यासाठी. तुमच्या उपकाराची परतफेड कशी करु तेच कळत नाहीये मला." – निकिता
"परतफेड करायची आहे ना मग एक काम कर माझ्यासाठी. या डायरीमध्ये मी एक फॉर्म ठेवलाय तो भरुन दे मला." -आकाश
 "कसला फॉर्म ?" – निकिताने विचारलं
"L. LB च्या सेकंड इअरच्या ॲडमिशनचा फॉर्म. तू हुशार आहेस. आल्या प्रसंगाला  खूप मोठ्या हिम्मतीने तोंड दिलस. तू जे केलस ते प्रत्येकाला जमतच असं नाही रादर क्वचितच कोणाला जमत असेल. पण तरिही या एका प्रसंगाने इतकी खचून गेलीस की आपली स्वप्न, आपलं आयुष्यच विसरुन गेलीस? आदित्य पेंढारकर तुझ्या आयुष्यात  खूप महत्त्वाचा होता मान्य पण त्याने स्वतःच वेगळं आयुष्य सुरु केलं आहे. ज्याने तुझी साथ सोडली त्याच्यासाठी तू का दु:खी होत आहेस. त्याच्यापुढे तुला तुझ्या आई बाबांच दु:ख, त्यांच प्रेम, इतकच काय तर तुझी स्वतःची स्वप्नं या साऱ्याची काहीच किम्मत उरली नाही का? बघ विचार कर आणि तुझं तुच काय ते ठरव. झालं गेलं विसरुन जा असं मी म्हणणार नाही कारण मला माहिती आहे ते सोपं नाही. पण निदान आयुष्यात पुढे जायचा तरी प्रयत्न कर." – आकाश.
      आकशचं बोलणं ऐकून निकिताला रडू कोसळल. तिला असं रडताना बघून काय करावं ते आकाशला सुचेना. आपण उगाच समजवायला गेलो तिला असं त्याला वाटू लागलं. "माझ्यामुळे तू दुखावली गेली असशील तर मला माफ कर पण विश्वास ठेव माझ्यावर माझा उद्देश  फक्त तुला तुझ्या दु:खातून बाहेर काढणं हाच होता." , आकाश तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला.
  "नाही तसं नाही तुमचं काहीच चुकलं नाही. उलट तुमच्यामुळे आज मी भानावर आलेय. माझ्या दु:खातून बाहेर पडायला वेळ लागेल मला, पण निदान यातून बाहेर पडायला हवं याची जाणीव झालेय मला आज." – निकिता
   "लवकरच तू तुझ्या दु:खातूनही बाहेर पडशील. मी मदत करेन तुला यातून बाहेर पडायला." – आकाश.
   "तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही." -निकिता
 "आभार मानायचेच आहेत तर एक कर. हे अहो जाओ न म्हणता अरे आकाश म्हण. फ्रेंड्स?" असं म्हणून आकाशने तिच्यासमोर मैत्रीसाठी हात पुढे केला.
    निकिताही आता जरा सावरली होती. मंद हसून तिनेही त्याच्याशी हात मिळवला. तिला आठवलं आज कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं होतं.
हे नवीन नातं निकिताला आयुष्यातल्या कुठल्या वळणावर घेऊन जाणार होतं; हे मात्र कोणालाच माहिती नव्हतं.
 आकाश आणि निकिता टेकडीवरुन  निघाली. आकाशने निकिताला घरी सोडलं.  घरी गेल्यावर निकिताने आपला निर्णय आई बाबांना सांगितला. दोघांनीही इनस्पेक्टर आकाशचे आभार मानले. कितीतरी दिवसांनी त्यांना त्यांची आत्मविश्वासी मुलगी परत मिळाली होती.
    निकिताची  सेकंड इअरची ॲडमिशन प्रोसिजर रमा आणि आकाशच्या मदतीने पार पडली. निकिताने मुद्दामहून मॉर्निंग बॅचसाठी ॲडमिशन घेतली आणि  कॉलेज संपल्यानंतर ती  ॲडव्हॉकेट रमाच्या ऑफिसमध्ये जॉब करु लागली. निकिताचा पूर्ण दिवस आता बिझी जाऊ लागला. कॉलेज, अभ्यास  आणि ऑफिसचं काम यात स्वतःला गुंतवून घेतल्यामुळे निकिता हळूहळू आपल्या दु:खातून सावरत होती. आकाशबरोबरच्या  अधूनमधून होणाऱ्या भेटिंमूळे तिच्या चेहऱ्यावरचं  हरवलेल हसू परत येत होतं. खूप सुंदर मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं दोघांमध्ये. कुठलीही गोष्ट आकाशला सांगितल्याशिवाय निकिताला चैन पडत नसे. आणि आकाशची  तर शॉपिंग पासून सेलिब्रेशनपर्यंत प्रत्येक गोष्ट निकितासोबतच होत असे. या दोघांमध्ये मैत्री पलीकडे जाऊन काहीतरी नवीन नातं निर्माण झाल्याची जाणीव ॲड्व्होकेट रमाला झाली होती. पण आकाश आणि निकिता मात्र या बाबतीत अनभिज्ञ होती. सुरुवातीला रमाने विचार केला, त्यांचं त्यांना कळतय का ते बघावं. काही वेळा तिने आडून आडून सुचवण्याचाही प्रयत्नही केला. पण दोघांनीही समजून न समजल्यासारखं केलं.
  बघता बघता निकिताचं L.LB कंप्लिट झालं. परिक्षा संपल्यानंतर निकिता ॲडव्होकेट रमाच्या  ऑफिसला पूर्णवेळ जाऊ लागली. यथावकाश रिझल्ट लागला. निकिता फर्स्ट क्लास मिळवून पास झाली होती. असच अजून एक वर्ष सरलं. निकिता हळूहळू इंडिपेंडंट केसेस हॅन्डल करायला लागली होती. तिची हुशारी आणि कामाप्रतीची निष्ठा पाहून ॲडव्होकेट रमा तिच्यावर खूश होती.
      सरणाऱ्या काळाबरोबर  निकिता आणि आकाशची मैत्रीही बहरत होती. रमाने  त्या दिवशी आडून न बोलता दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे विचारलं इतकच नव्हे तर  पुढे विचार करण्याबद्दलही सुचवलं. निकिता आणि आकाशने कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरवलं. त्या दिवशी कितीतरी दिवसांनी  ती आणि आकाश निवांतपणे कॉफी शॉपमध्ये भेटत होते. थोडं जुजबी बोलणं झाल्यावर आकाश म्हणाला, "निकिता आता आपण आपल्या रिलेशनशिपबद्दल सिरियसली विचार करायला हवा”
म्हणजे? नक्की काय म्हणायचं आहे आकाश तुला ? – निकिता.
"आपल्यामध्ये खरच फक्त मैत्री आहे का त्याच्या पुढे जाऊन अजूनही काही आहे हेच कळत नाहीये मला. तुला काय वाटतं निकिता?" आकाश.
"खरं सांगू आकाश मी या साऱ्याच्या पलीकडे गेलेय. माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यातून मी अजूनही पूर्णपणे सावरु शकलेले नाहीये. अजूनही कधीकधी  त्या रेड लाईट एरियामध्ये काढलेले भयाण दिवस आठवून रात्री दचकून  जाग येते. आदित्यचं लग्न झाल्याचं कळलं तेव्हा तर मी कोलमडून गेले होते. कितीही झालं तरी आदित्य माझं पहिलं प्रेम आहे. त्याला असं सहजासहजी विसरणं शक्य नाही. त्यात माझा भूतकाळ असा असताना तुझ्या घरातून या नात्याला कितपत  परवानगी मिळेल मला नाही माहिती."- निकिता.
"प्रश्न तुझ्या भूतकाळाचा नाही निकिता आपल्या नात्याचा आहे. जर आपलं नातं क्लिअर असेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाहीत. पण मलाच काही कळत नाहीये. मी खरच खूप गोंधळून गेलोय ग." आकाश.
"आकाश, मला नाही सांगता येणार पण माझ्यादृष्टिने आपलं मैत्रीचं नातं जास्त महत्वाचं आहे."- निकिता.
  "मैत्री तर नेहमीच राहील निकिता. कारण हे नातं सगळ्यात आधी आहे. पण आपल हे नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे का नाही ते शोधायचं आहे आपल्याला."
  "आकाश आपण पहिल्या पावसात टेकडीवर जाऊया? कदाचित तिथे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जिथून आपली मैत्री सुरु झाली तिथेच आपण आपल्या नात्याचाही शोध घेऊया, तोपर्यंत आपण जरा थांबूया, चालेल?"- निकिता.
 आकाशला निकिताचं म्हणणं पटलं. पहिल्या पावसात काहीही झालं तरी टेकडीवर जायचं असं ठरवून दोघं एकमेकांच्या घरी निघून गेली.
     मे महिना संपून जूनचा पहिला आठवडा सरला तरी पावसाची काहीच चिन्ह दिसत नव्हती. निकिता आणि आकाश पहिल्या पावसाची आतुरतेने वाट बघत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली. त्या दिवशी सकाळपासूनच ढगांचा खेळ सुरु झाला होता. दुपारपर्यंत पाऊस नक्की येणार असा अंदाज होता. साधारण सकाळचे ११ वाजले होते. निकिता ऑफिसमध्ये बसून महत्वाच्या केसचा अभ्यास करत होती. सहज तिची नहर खिडकीबाहेर गेली. तिने बघितलं बाहेर चांगलच अंधारुन आलं होतं. 'म्हणजे आज पाऊस येणार तर' , नकळत तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. आकाशला फोन करावा का? या विचारात असतानाच तिचा फोन वाजला. तिने बघितलं फोन आकाशचा होता. तिने तो चटकन रिसिव्ह्ड केला पण ती काही बोलणार इतक्यात पलिकडून आवाज आला, "मॅडम मी इंस्पेक्टर राघव बोलतोय आकाश सरांचा खूप मोठा अपघात झालाय.त्यांना सिटी हॉस्पिटलला ॲडमिट केलय. कंडिशन खूपच क्रिटीकल आहे. रमा मॅडमचा फोन लागत नव्हता म्हणून तुम्हाला फोन केला. रमा मॅडमना फोन देता का प्लीज?" फोनवरचं बोलणं ऐकून निकिता सुन्न झाली. काय बोलावं तिला काहीच सुचत नव्हतं. "हॅलो , हॅलो निकिता मॅडम ऐकताय ना?" पलिकडचा आवाज ऐकून  निकिता भानावर आली. " अं ....हो..... रमा मॅडम एका केसच्या कामासाठी शहराबाहेर गेल्यात ... मी पोचते थोड्याच वेळात. असं म्हणून निकिताने फोन कट केला आणि ती हॉस्पिटलमध्ये जायला निघाली.
    निकिता हॉस्पिटलमध्ये पोचली तेव्हा सगळं संपलं होतं. आकाश हे जग सोडून निघून गेला होता. बाहेर  जमा झालेले काळे ढग विरुन निकिताच्या डोळ्यात जमा झाले. आकाशचा निष्प्राण देह बघून तिच्या डोळ्यात जमा झालेले ढग बरसायचच विसरुन गेले.
****
मुसळधार पाऊस बरसत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या  निर्जन  निवांत टेकडीवर  निकिता एकटीच बसून होती. आत्ता या क्षणाला निकिताच्या डोळ्यातून बरसणारा पाऊस बाहेरच्या पावसाशी जणू स्पर्धाच करत होता. तिला आठवत होतं; अगदी याच ठिकाणी अशाच मुसळधार पडणाऱ्या पावसात ती आणि आदित्य या टेकडीवर आले होते. याच ठिकाणी तिला उमलत्या वयातील  प्रेमाचा खरा अर्थ कळला होता.  इथे याच ठिकाणी तिला आकाश भेटला होता. एका सुंदर मैत्रीच्या नात्याची सुरवात इथूनच झाली होती. इथे येउनच  ती  आणि आकाश त्यांचं खरं नातं जाणून घेणार होते. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. "अजून किती भोग भोगायचे? किती दु:ख सोसायची. प्रत्येकवेळी एका सुंदर नात्याची सुरवात होते पण ते नातं मात्र आयुष्यभरासाठी पुरत नाही, का? मी काय करु जगून? काय अर्थ आहे या जगण्याला? बास कंटाळा आलाय सगळ्याचा आता." निकिताच्या मनात उठलेलं वादळ शांत होत नसतं. इथेच आयुष्य संपवावं आता असा विचार करुन निकिता तिथून उठून जायला निघणार तोच तिचा फोन वाजतो, " हॅलो, निकिता मॅडम, मी इंस्पेक्टर राघव बोलतोय.... मॅडम एका स्त्री ने आपल्याच पतीचा खून केलाय..... आम्ही तिला अरेस्ट केलय ..... पण अरेस्ट केल्यापासून ती फक्त गप्प आहे. असं वाटतय काहीतरी गडबड आहे..... तिच्याकडे बघून ती खूनी वाटत नाही उलट तिची निष्पाप नजर खूप काही सांगतेय...... मी रमा मॅडमना फोन केला होता पण त्या शहराबाहेर  आहेत, त्यांनी तुम्हाला बोलवून घ्यायला सांगितल आहे”. " ओके , येते मी तासाभरात", असं म्हणून निकिताने फोन ठेवला. ती स्वतःशीच हसली. आज या टेकडीने पुन्हा तिला जगण्याचा एक नवा मार्ग दाखवला होता. तिने आजूबाजूला बघितलं तर तिथे तुरळक गर्दी दिसली. ही निर्जन टेकडी आता निर्जन राहिली नव्हती.ती ही आता बदलून गेली होती; निकिताच्या आयुष्यासारखी !
समाप्त.
©मानसी जोशी






   

 

Wednesday, 29 March 2017

कथा - नातं

नातं
 समुद्राच्या लाटा खडकावर आदळत होत्या. सूर्याचा गोळा लाल केशरी झाला होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता. अशा रम्य संध्याकाळी एका खडकावर 'ती' दोघंजणं  शांतपणे बसून होती. वाऱ्यामूळे उडणारे तिचे केस हलक्या हाताने सावरत अथांग समुद्राकडे एकटक बघत 'ती' शांत बसली होती. तर तो तिच्या बोलण्याची वाट बघत मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता. क्षणभर त्याच्या मनात आलं, 'हिच मनही असच या अथांग सागरासारख आहे त्याचाही काहीच थांगपत्ता लागत नाही."बोल ना काहीतरी." तो शांतता भंग करत म्हणाला.
   "काय बोलू मी मला काहीच सुचत नाहीये. असच शांत बसून रहावसं वाटतय; या अथांग सागराकडे बघत" , ती शांतपणे म्हणाली.
     "का आज तर सगळ तुझ्या आवडीचं आहे. हा अथांग समुद्र, ही संध्याकाळ आणि सुर्यास्त सगळच .... तो म्हणाला.
"का तुला नाही आवडत हे सगळ?", सवयीने तिने प्रतिप्रश्न केला.
      "मला तू आवडतेस मग हे सगळ नाही का आवडणार ?" त्याने विचारल.
  त्याच्या या बोलण्यावर मात्र ती गप्प बसली.
       "बोल ना काहीतरी. नको अशी गप्प राहूस त्रास होतो मला याचा", तो काहीसा वैतागून म्हणाला.
       तिच्या डोळ्यात पाणी दाटल. "प्लीज आज तरी चिडू नकोस माझ्यावर. ही आपली शेवटची भेट आहे", ती रडवेली होवून म्हणाली.
      "म्हणूनच म्हणतोय निदान आज तरी बोल", ...तो.
      "सगळ्या गोष्टी शब्दात नाही सांगता येत. काही समजून घायच्या असतात." ती शक्य तितक्या शांतपणे म्हणाली
"पण मला नाही समजून घेता येत. कंटाळा आलाय मला आता. मला शब्दातच सांग. तसही शब्दांचे खेळ करणं तुला चांगलच जमत, नाही का ?" तो काहीस चिडूनच बोलत होता .
      ती पुन्हा शांत बसली. खरं तर तिला खूप काही बोलायचं होतं पण त्याला कस समजावायचं तेच तिला कळत नव्हतं. काही वेळ तसाच शांततेत गेला. तिच्या मनात शब्दांची जुळवाजुळव चालू होती.वेळ कापरासारखा उडून चालला होता. संध्याकाळ संपत  येत होती. त्याच्या मनाची चलबिचल वाढत होती. शांततेचा भंग करीत अखेर त्याने विचारल, "काही बोलणार आहेस का ?" ती मात्र तरिही गप्पच होती.
         "तुझा हात हातात घेउ?" त्याने  विचारले. तिने मान हलवून होकार दिला. तो हलकेच तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, "I Love you".
         ती अजूनही शांतच असते पण तिच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. स्वतःला सावरत ती त्याला म्हणते, "आमच  US ला जायचं कन्फर्म झालय.. . दोन वर्षांसाठी.... I hope मी परत येइन तेव्हा तू लग्न करून तुझ्या आयुष्यात सेटल झालेला असशील."
     "अखेर ठरलं तर! गुड! ऑल द बेस्ट! पिहूच्या स्कूलच काय ?म्हणजे तिकडची ॲडमिशन प्रोसेस वगैरे ... तो.
"सगळं ठरलय. तिची ॲडमिशन प्रोसिजर जवळपास झालेय." ती
     काही क्षण तसेच शांततेत जातात. शांततेचा भंग करत ती त्याला म्हणते, "मी खूप मिस करेन तुला”
      "का? कोण आहे मी तुझा ?सांग ना. या  प्रश्नाचं उत्तर देउ शकशील? जे द्यायच  तू आजवर टाळत आलेयस ; मी कोण आहे तुझा ? गेल्या दोन महिन्यात आपल्यात जे नातं निर्माण झालय त्याच नाव काय ? तू प्रेम नाही करत माझ्यावर?"...... तो
       "मला नाही माहित हे सारं काय आहे का आहे पण मला आवडतं तुझ्या सहवासात रहायला, तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला." ती
       "हो तेच विचारतोय मी, का ? काय नातं आहे तुझं माझं ?आणि तुला नाही माहिती तर कोणाला माहिती असणार? माझ्याकडून हे नातं क्लिअर आहे. तू मला आवडतेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. मान्य आहे तू मॅरीड आहेस. तुला तुझा संसार आहे. मला तुमच्या दोघांमध्ये यायचही नाहीये. मला फक्त एवढच जाणून घ्यायच आहे; Do you love me or not ?"
       काय बोलावं तिला काहीच सुचत नाही. खर तर तिने आज खूप काही बोलायचं ठरवलेलं असतं. पण शब्दच जुळत नाहीत. एव्हाना संध्याकाळ टळून रात्र सुरु झालेली  असते. काही क्षण तसेच शांततेत गेल्यावर तो विचारतो, "निघुयात ?"
      "थांबना थोडावेळ प्लीज ", ती
        "अग मग बोलना काहीतरी. निदान आजतरी बोल. जे मनात असेल ते बोल. अस सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्धवट सोडून जाऊ नकोस, प्लीज.".. तो.
        "कुठून सुरुवात करु काहीच कळत नाहीये रे. पण आज मला बोलायच आहे. खरच मनापासून सांगतेय. तू कितपत समजून घेशील माहिती नाही. पण गेले काही दिवस मी जाणीवपूर्वक तुझ्यापासून दूर राहिले होते; या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी.आज मला सगळी समाधानकारक उत्तरे मिळाली आहेत. फक्त ती तुला कशी समजावू हा प्रश्न आहे. माझ्या परिने मी उत्तरं शोधली आहेत. प्लीज समजून घे. मी जे काही सांगतेय ते शांतपणे ऐकून घे. खूप प्रॉब्लेम्स होते आयुष्यात अशा वेळी तू भेटलास आणि आपल्यात मैत्री झाली. आपल्या दोघातली प्रत्येक घटना न ठरवता घडत होती. कुठेतरी मी तुझ्याकडे ओढली  जात होते. आयुष्यात हरवून गेलेले काही क्षण तुझ्यासोबत जगत होतें.पण हे सगळं जरी कितीही खर असलं तरी  मला माझा संसार आहे. खूप प्रेम करणारा नवरा आहे. आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे, विश्वास आहे. पण कस  आहे ना लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायकोमधील मैत्रीच नातं कुठेतरी हरवतं. मुद्दाम नाही पण जे नातं महत्वाचं असतं  तेच जास्त जपलं जातं म्हणून असेल कदाचित  पण मैत्रीचं नातं हरवत जातं. त्यात संसाराच्या रामरगाड्यात जबाबदाऱ्या वाढायला लागतात आणि  निवांतपणा, रोमान्स या साऱ्या गोष्टी कमी होत जातात. एकमेकांशी बोलणं होतं तेव्हा बहुतांश वेळा प्रॉब्लेम्सवरच जास्त चर्चा होते किंवा जनरल संसारीक चर्चा. मग मनातला हळूवारपणा कुठेतरी हरवत जातो. आयुष्य एकदम एकसुरी होवू लागतं. मी पण असच एकसूरी आयुष्य जगत होते. अशातच तू आयुष्यात आलास. तुझ्याबरोबर असताना पुन्हा आयुष्य जगल्यासारखं वाटू लागल. तुझा सहवास आवडत गेला. त्यात तू सुद्धा माझ्यात गुंतत होतास अर्थात  हे तूच मला सांगितलस. मला नाही माहित हे खरं का खोटं ते. तू फ्लर्ट करतोयस का मनापासून सांगतोयस काहीच कळत नव्हतं. जे काही घडत होतं  ते अचानक अनपेक्षितपणे घडत होतं. हळूहळू भावनिकदृष्ट्या मी तुझ्यात गुंतत गेले. कळत नव्हतं  मला हे सगळं चूकीचे  आहे का बरोबर? पण स्वतःला थांबवता येत नव्हतं. तू माझ्या मनातल जाणून घ्यायला डेस्परेट होत होतास. पण मी काय सांगणार होते तुला जिथे माझच मला काही कळत नव्हतं. मला माझ्या नवऱ्याला फसवायच नव्हतं. त्याचा अधिकार  दुसऱ्या कोणालाही द्यायचा नव्हता. कारण माझं खरच खूप प्रेम आहे त्याच्यावर. पण त्याच वेळी तुलाही गमवायच नव्हतं. खर तर काय नातं आहे आपल्यामध्ये या प्रश्नाचा शोध मी सुद्धा घेत होते. खूप विचार केला मी यावर. मग मी जाणीवपूर्वक निदान  काही दिवस तुझ्यापासून लांब रहायच ठरवलं आणि मग मला  या प्रश्नाच उत्तर मिळाल.  मला जे उत्तर मिळालय ते मी तुला देते. मी प्रेम नाही करत तुझ्यावर.  कदाचित तू ही करत नसशील माझ्यावर. 'प्रेम' हा शब्दच मुळात खूप सुंदर आहे. पण तो जेवढा सुंदर आहे ना तेवढाच खूप गहन आहे. प्रेम तर  प्रत्येक नात्यात असतच फक्त त्याच स्वरुप नात्यागणिक बदलत जातं. आयुष्याच्या या वळणावर भान हरपून  बेभान होवून प्रेम करणं नाही शक्य. काही बंधने, काही नियम हे पाळावेच लागतात.  प्रत्येक नात्याला महत्व देउन, प्रत्येक नात्याचा मान ठेवून नाती जपणं महत्वाच असतं. रहाता राहिला प्रश्न आपल्या नात्याचा 'मैत्रीच' म्हणते मी आता त्याला. कारण दुसर काही नाव नाही सुचल मला. खर तर प्रत्येक नात्याला काही नाव द्यायची गरजही नसते.  पण जर तुझा अट्टाहासच आहे नाव द्यायचा तर आपण मैत्रीच म्हणूया. मला माहितेय आपलं नातं मैत्रीच्या पलीकडल आहे पण मग त्याला नाव काय देउ? माझ्या आयुष्यातली माझ्या नवऱ्याची जागा कधीच कोणी घेउ शकत नाही.पण अस असल तरी तुझही माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे. एक वेगळच भावनिक नातं तयार  झालय आपल्यामध्ये. आता 'तुच का ?' या प्रश्नाच उत्तर नाहीये माझ्याकडे.  खर  तर सगळ खूप गुंतागुंतीच आहे. माझ्या परिने मी हा गुंता सोडवायचा प्रयत्न केला आहे. पण जे नातं आहे ते खरच खूप सुंदर आहे. त्याला नाव द्यायचा अट्टाहास नको करुस प्लीज. आपल्या नात्यात जी अपूर्णतेची गोडी आहे ती ओढ बनून तशीच राहूदे. तुला हे सारं कितपत पटेल मला नाही माहिती. पण मी खरच हे सगळं मनापासून बोलतेय. पुढे काय करायच? आपल नातं टिकवायच का नाही  याचा निर्णय तू घ्यायचा आहेस .ती एका दमात सगळ  बोलून टाकते. मनात साचलेल सगळ त्याच्यासमोर  बोलून मोकळ झाल्यावर तिलाही खूप बरं वाटत.
        थोडा वेळ तसाच शांततेत गेल्यावर ती उठून जायला निघते. तो ही तिला थांबवत नाही.ती  निघून गेल्यावरही कितीतरी वेळ तो तसाच शांत बसून असतो. समुद्र, गार वारा सारं काही अगदी तसच असतं. फक्त  सुर्यास्त संपून एक नवा चंद्रोदय झालेला असतो.
©मानसी जोशी

Sunday, 5 March 2017

कथा - फ्रेंड रिक्वेस्ट

फ्रेंड रिक्वेस्ट

"काय सतत लॅपटॉपमध्ये डोक खुपसून बसायच, सगळीजण छान पार्ट्यांमध्ये मस्त एंजॉय करत आहेत. आम्ही मात्र घरात बसून. काय तर म्हणे हे आपल नववर्ष नव्हे. उगाच स्वतःला आदर्शवादी सिद्ध करायच........" किचन आवरता आवरता रियाची अखंड बडबड चालू होती. तिचा नवरा मयंक तिच बोलण ऐकून न ऐकल्यासारख करत शांतपणे लॅपटॉपवर आपल काम करत बसला होता. मयंक सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता. तर रिया एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये टिचर होती. त्यांची ८ वर्षांची मुलगी आभा ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे आजी आजोबांबरोबर मयंकच्या आजोळी गेली होती. रिया आणि मयंक दोघांचेही विचार भिन्न, आवडीनिवडी वेगळ्या. अस असूनही गेली दहा वर्षे त्यांचा संसार सुखाने चालू होता. अधूनमधून थोड्याफार कुरुबुरी होत होत्या पण संसार म्हटल की त्या आल्याच.
      किचनचा लाईट बंद करुन रिया बेडरुममध्ये आली मयंक अजूनही लॅपटॉपमध्येच डोक खुपसून बसला होता. रिया काही न बोलता गप्पपणे तशीच बसून राहिली.  तिच्या मनात आलं; छान मावळतीचे रंग बघत समुद्रकिनारी बसून रहाव हळूच त्याने हात हातात घ्यावा आणि मग त्याच्या खांद्यावर हलकेच डोक ठेवून समुद्राच्या लाटा बघत कधी स्वप्न  तर कधी आठवणींमध्ये हरवून जाव. सोबतीला फक्त गार वारा आणि सायलेंट रोमॅन्टिक म्युझिक; बस हरवून जावं त्या क्षणांमध्ये. मग हळूहळू पसरणारा अंधार, आकाशात होणारे चंद्र आणि तारकांचे आगमन; हे सार त्याचा साथीने अनुभवाव, एवढ साधं सरळ स्वप्नही गेल्या दहा वर्षांत पूर्ण होवू नये? लग्नापूर्वी असा टिपिकल संसार करणाऱ्या आई आणि काकूकडे बघून ती नेहमी म्हणायची, "माझा संसार कधीच असा बोअर नसेल. असा बोअर संसार करण्यात कसली आलेय मजा? लाइफमध्ये काहीतरी चार्म हवा, थ्रिल हवं......" स्वतःचे तेव्हाचे विचार आठवून रियाला हसू आल. तिने पुन्हा एकदा मयंककडे बघितल, तो त्याच्या कामात इतका मग्न होत की रिया बेडरुममध्ये आलेलीही त्याला कळल नसेल. रिया खूपच अपसेट झाली. तिच्या मनात आल, घरात एकांत मिळालेला असुनही मयंक आपल्याकडे लक्षही देत नाही.  आपल्या भावनांची त्याला जरासुद्धा कदर नाही. संपला का सगळा रोमान्स आता? आटल  का याच प्रेम? सतत लॅपटॉप घेऊन ऑफिसच काम करत बसायच. प्रोजेक्टस, डेड लाईन, प्रमोशन, बोनस, इन्क्रीमेंट याशिवाय दुसर विश्व नाही याच. मनाची घालमेल सहन न झाल्याने शेवटी वैतागून तिनेही मोबाईल हातात घेतला आणि फेसबूक बघू लागली.  पण ३१ डीसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पोस्ट्स आणि फोटोज् बघून तिचा मूड गेला. ती वैतागून फेसबूक बंद करणार इतक्यात तिला फ्रेंड्स सजेशन मध्ये एक प्रोफाइल दिसली स्वरुप कानिटकर.... ५२ म्युचुअल फ्रेंड्स....  तिच्या छातीत धस्स झाल. स्वरुप........ गेल्या कित्येक वर्षांत क्वचितच कधीतरी  त्याची आठवण आली असेल. क्षणभर ती तशीच स्तब्ध बसून राहिली. अखेर हिम्मत करून थरथरत्या हाताने तिने ती प्रोफाइल ओपन केली.  प्रोफाइल चेक करता करता तिने फोटोज ओपन केले. तिथे स्वरुपच्या लग्नाचे फोटोज बघून तिला आश्चर्यच वाटल.  त्याची काहिशी जाड, गोरी पण चेहऱ्यावरुन थोडीशी म्हातारी अशी वाटणारी बायको बघून तिच्या मनात आल, "हिच्यात अस काय बघितल असेल याने". त्याच्या लग्नाची बातमी तशी तिला त्याच लग्न ठरल तेव्हाच म्हणजे जवळपास 6 वर्षांपूर्वीच कळली होती पण त्याची बायको कोण? कुठली? हे तिला माहिती नव्हते.  अर्थात त्याबद्दल चौकशीही तिने कधी केली नव्हती.  पण आज फेसबूकमूळे सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.  एवढ्यात तिला नोटिफिकेशन येते- "यू हॅव न्यू फ्रेंड रिक्वेस्ट" ती सहज चेक करते तर ती रिक्वेस्ट स्वरुपनेच पाठवलेली असते. तिच्या छातीत पुन्हा धडधडायला लागत. ती चटकन लॉग आऊट करते.  काही क्षण ती तशीच शांत बसून रहाते. छातीतली धडधड कमी झाल्यावर ती हळूच एक नजर मयंककडे टाकते. तो अजूनही त्याच्या लॅपटॉपमध्ये डोक खुपसून बसलेला असतो. ती काहीही न बोलता मोबाईल बाजूला ठेवून बेडवर आडव होवून डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करते; पण स्वरुप कानिटकरची प्रोफाइल आणि त्याची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट सतत तिच्या डोळ्यासमोर येत असते. एक क्षण तिला वाटत कि परत फेसबूक लॉग इन करून त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करावी, पण तिची हिम्मत होत नाही.  ती तशीच शांत पडून झोपायचा प्रयत्न करते. मनात उठलेल भूतकाळातील आठवणींच आणि विचारांच वादळ तिला काही स्वस्थ झोपू देत नाही. उगाच फेसबूक ओपन केल अस क्षणभर तिला वाटून जात. मग दुसऱ्या क्षणाला तिच्या मनात येत का पाठवली असेल फ्रेंड रिक्वेस्ट 'त्याने'? इतकी वर्ष मध्ये निघून गेल्यावर आता त्याला का वाटल असेल मला कॉंटॅक्ट करावासा ?
           स्वरुप कानिटकर म्हणजे रियाचा कॉलेजमधला मित्र...... आणि तिच्यासाठी तिचा फर्स्ट क्रश. रियाला तो दोन वर्षांनी सिनिअर. रिया तेव्हा BSC च्या लास्ट इअरला होती आणि स्वरुप MSC च्या लास्ट इअरला.  दोघेही NSS च्या एका कार्यक्रमाच्यावेळी भेटले. तिथेच त्यांची ओळख झाली आणि रिया चक्क त्याच्या प्रेमात पडली. तिथे आलेल्यांपैकी अजून काहीजण एकत्र आले आणि पाच सहा जणांचा छान ग्रूप जमला. रिया  ग्रूपमध्ये फक्त स्वरूपसाठी सामिल झाली होती. स्वरूप हॅन्डसम तर होताच शिवाय त्याचा मिश्किल स्वभाव रियाला फार आवडला. पण सतत ग्रूपमध्ये वावरणारा स्वरुप रियाच्या वाट्याला तसा कमीच येत असे. रिया तशी साधी सरळ. उगाचच कोणाच्यातरी  गळ्यात पडणाऱ्या मुलींसारखी ती कधीच नव्हती. ती तशी सुंदर होती; पण उगाचच फॅन्सी कपडे घालून आणि चेहऱ्यावर मेकअप थापून वावरणे तिला कधीच जमले नाही. अर्थात तिला ते आवडतही नव्हत. ती अगदी साधी सरळ होती.  बरोबर या विरुद्ध स्वरुप. खानदानी श्रीमंती असल्यामुळे मुळातच हाय- फाय लाईफस्टाईलची आवड. तो नेहमी ब्रॅंडेड वस्तूच वापरायचा. मॉडर्न लाईफस्टाईलच त्याला प्रचंड आकर्षण. पण तरिही सगळ्यात महत्त्वाच म्हणजे कोणालाही मदत करायला तो नेहमी एका पायावर तयार असायचा. तो हॅन्डसम असूनही त्याला गर्व नव्हता. श्रीमंत असूनही पैशाचा माज नव्हता. त्यामुळेच फक्त रियाच नाही तर कॉलेजमधल्या कितीतरी मुली त्याच्या प्रेमात पडल्या होत्या.
          नेहमी ग्रूपमध्येच भेटत असल्यामुळे स्वरुप रियाच्या वाट्याला खूपच कमी येत असे. पण तशी संधी त्या दिवशी चालून आली.जवळच्याच एका गावात NSS चा एक प्रोग्रॅम होता. प्रोग्रॅम संपायला थोडा उशीरच झाला. ग्रूपमधील काही जणांच्या घरी जायला त्या गावातून बस होती. तर काही जणांनी त्यांची स्वतःची टू व्हिलर आणली होती. पण रियाच्या घराकडे जाणारी शेवटची बस निघून गेली होती आणि तिच्याकडे गाडीही नव्हती. स्वरुपने तिला घरी सोडायची जबाबदारी घेतली त्यामुळे सगळेजण निर्धास्तपणे आपाआपल्या घरी निघून गेले. रियाही सुखावली. उशीर झाल्यामुळे दोघही वाटेतच एकत्र जेवले. त्यांच्याबरोबर दुसर कोणीच नसल्यामुळे खूप वेळ एकमेकांबरोबर घालवता आला.
         त्या दिवसानंतर दोघांच्या भेटी वरचेवर होवू लागल्या. कॉलेज डेज, NSS चे प्रोग्रॅम्स, ग्रूप पिकनिक काहीही असुदे नेहमी स्वरुपच तिला घरी सोडायचा. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली आणि रिया त्याच्यात अधिकच गुंतत गेली. बघता बघता वर्ष संपत आल. अखेर एक दिवस रियाने स्वरूपसमोर आपल प्रेम व्यक्त केल. पण स्वरुपने मात्र ते नाकारल. नुसत नाकारलच नाही तर,तू माझ्या टाईपची मुलगीच नाहीस" अस सांगून तिच मनही दुखावल. ती भेट त्यांची शेवटची भेट ठरली. त्यानंतर रियाने ग्रूपमध्ये जाणही बंद केल. काही जणांनी रियाला त्याच कारणही विचारल पण रिया आणि स्वरुप दोघांनीही ते सांगायच टाळल. पुढे परिक्षा झाल्यावर मास्टर डिग्रीसाठी रियाने दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि दोघे कायमचे दुरावले. त्यानंतर  आज इतक्या वर्षांनी आलेली स्वरुपची फ्रेंड रिक्वेस्ट बघून रियाच्या मनात कालवाकालव झाली. खास करुन त्याच्या लग्नाचे फोटो बघून तिच्या मनात आल,माझ्यात अस काय कमी होत म्हणून याने मला नाकारल?
     विचारांच्या तंद्रीत तिला कधी झोप लागली ते तिच तिलाच कळल नाही. तिला जाग आली ती डोअरबेलच्या आवाजाने.  तिचे सासू सासरे आणि तिच पिल्लू आभा गावाहून परत आले होते. आभा चटकन येउन आई म्हणून तिच्या गळ्यात पडली. अख्खा दिवस आभाची बडबड आणि गावाकडच्या गप्पा ऐकण्यात गेला.  दुसऱ्या दिवसापासून रिया आणि आभा दोघींचीही शाळा सुरू होणार होती रात्री अंथरुणावर पडल्यावर तिच्या मनात पुन्हा स्वरुपचा विचार आला. क्षणभर तिला वाटल फेसबूकवर लॉगइन कराव पण तिने हा विचार प्रयत्नपूर्वक दूर लोटला.  उद्या रेशम भेटल्यावर तिच्याशी बोलून मग ठरवू काय करायचे ते असा विचार करुन ती झोपी गेली.
       दुसऱ्या दिवशीपासून नेहमीच रुटिन सुरु झाल. रियाने आभाला मुदामच तिच्या शाळेत न घालता दुसऱ्या शाळेत घातल होत. सकाळी मयंक आणि आभा निघून गेल्यावर थोड्या वेळाने रियाही तिच्या शाळेत गेली. कधी एकदा शाळेत जाते आणि रेशमशी बोलते अशी तिची अवस्था झाली होती. रेशम म्हणजे रियाची B.ED पासूनची मैत्रीण.योगायोगाने एकाच शाळेत नोकरीसुद्धा मिळाली. लंच ब्रेकनंतर  रियाला जरा मोकळा वेळ मिळाला. ती  स्टाफरुममध्ये गेली तेव्हा रेशमही तिथेच होती. स्वतःच्याच विश्वात हरवलेली रेशम बघून रियाला क्षणभर तिचा हेवा वाटला. "काय मग रेशम कशी झाली न्यू इअर सेलिब्रेशनची पिक्निक?" रियाने विचारले.
 "खूप मस्त! तू बोल. तुझ सेलिब्रेशन कस झाल? रेशमने हसून विचारल.
"आम्ही घरीच. आमच्यासाठी सगळे दिवस सारखेच",रिया काहीशी वैतागून म्हणाली.
   "का ग काय झाल? एवढी का चिडली आहेस?" रेशम.
रिया: जाऊदे ग. नेहमीचच आहे. पण मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी B.ED ला असताना तुला सांगितल होत बघ स्वरुपबद्दल.
रेशम: हो तुझा तो फर्स्ट क्रश ना?
रिया: कमॉन रेशम
रेशम: इट्स ओके रिया वैतागू नकोस. बर बोल काय झाल त्याच?
रेश्मा: त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आलेय मला. पण कळतच नाहीये ॲक्सेप्ट करु का नको.
रेशम:त्यात विचार काय करायचा? त्याने रिक्वेस्ट पाठवली आहे ना मग ॲक्सेप्ट कर ना.
रिया: तस नाही ग पण...... जाऊदे काही नाही.
रेशम: काय झाल रिया स्पष्ट बोल ना.
रिया: बोलू नंतर. तू तुझ बोल. कस झाल थर्टी फर्स्टच सेलिब्रेशन?
रेशम:  मला पण तुला तेच सांगायच आहे.  अग अचानक माझ्या नवऱ्याला - शेखरला दिल्लीला जाव लागल. तस नेहमीचच आहे त्याच हे प्लॅन ठरवायचे आणि कॅन्सल करायचे. माझा तर पूर्ण मूड गेलाच पण आमच पिल्लू साहिल.. .. तो ही खूप वैतागला बाबांवर.
रिया: अग पण तुमची पूर्ण फॅमिली जाणार होती ना ? तुझ्या नणंदेची फॅमिली पण येणार होती ना तुमच्याबरोबर.
रेशम: हो ना तेच तर सांगतेय.  माझा तर मूडच गेला होता. ठरल्याप्रमाणे सगळच घडणार होत पण फक्त त्यात शेखर नसणार होता. माझी खूप चिडचिड झाली ग रिया. गेले कित्येक महिन्यात आम्ही एकमेकांना व्ययस्थित वेळच दिला नव्हता. वाटल होत या निमित्ताने तरी पुन्हा एकमेकांच्या जवळ येउ पण...
रिया: चला म्हणजे आपण दोघी एकाच वाटेवरचे प्रवासी आहोत तर.
रेशम: नाही रिया मला अजूनही काहीतरी सांगायच आहे.
रिया: काय झाल रेशम? काही प्रॉब्लेम आहे का?
रेशम: तू मला समजून घेशील का नाही ते मला माहिती नाही. पण तरीही तुला मी सांगणार आहे. तुला आठवतच असेल मी  तुला रोहितबद्दल सांगितल होत?
रिया: हो तुझा एक्स बॉयफ्रेंड आणि आता तो तुझा चांगला मित्र आहे.फेसबूकवरच पुन्हा भेटलात ना तुम्ही?
रेशम: हो. आधी त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. मग मी ती ॲक्सेप्ट केली. मग व्हॉटस ॲप नंबर शेअर केले. व्हॉट्स ॲप वर चॅटिंग सुरु झाल. मग एकदा आम्ही कॉफीसाठी भेटलो आणि नंतर खूप चांगले मित्र झालो पण आता आमच नात त्याच्याही पुढे गेलय रिया.
रिया: म्हणजे? तुला नक्की काय म्हणायच आहे?
रेशम: थर्टी फर्स्टच्या प्रोग्रॅमला शेखर नाही म्हटल्यावर माझा मूड गेला होता पण साहिलला मात्र जायच होत. त्याच आणि माझ्या नणंदेच्या मुलांच चांगल जमत.मग मी साहिलला त्यांच्याबरोबर पाठवायच ठरवल. साहिलला त्यांच्या घरी सोडून मी घरी आले. घर खूपच उदास वाटू लागल. आता दोन दिवस एकटीने घरात बसून काढायचे या कल्पनेन रडू आल. तेवढ्यात रोहितचा फोन आला. माझ्या आवाजावरुनच त्याने ओळखल. काहीतरी बिनसलय. त्याने तस विचारल आणि मी सुद्धा सगळ खर सांगितल. मग तो हसत म्हणाला, "अग त्यात काय एवढ माझ पण प्लॅनिंग फसल. छान बायकोसाठी रोमॅन्टिक ट्रिप प्लॅन केली होती, पण तिलाही जमत नाही आहे.  तुझी हरकत नसेल तर आपण दोघ जाऊ शकतो.रोमान्स नाही पण मस्त गप्पा मारु. एकमेकांचा एकटेपणा तेवढाच दूर होइल. बघ विचार कर."
      मी त्याच्याबरोबर जायच ठरवल. नणंदेला फोन करुन मैत्रीणीबरोबर जातेय अस सांगितल. घरातून बाहेर पडले. पार्लरला गेले. थोड शॉपिंग केल. घरी येउन दोन दिवसांच सामान पॅक करुन घेतल आणि संध्याकाळी घरातून निघाले. घराजवळच्या कॉर्नरजवळून त्याने मला पिकअप केल. काही वेळापूर्वी उदास असणारी मी संध्याकाळी मात्र खूप उत्साहात होते.
      त्यानंतरच 'कॅन्डललाईट डिनर' , त्याच ते केअरिंग असण, माझी स्तूती करण, कधी जून्या आठवणीत रमण....... सगळ सगळ अगदी मी छान एन्जॉय करत होते. खर सांगायच तर कितीतरी दिवसांनी मी आयुष्य जगत होते. मला तेव्हा कसलाच विचार करायचा नव्हता. मला ते क्षण जगायचे होते. त्यानंतर आम्ही रिसॉर्टवर गेलो. एकदम मस्त रिसॉर्ट होता ते. मस्त बेडरूम त्याला ॲटॅच्ड ओपन टेरेस. त्या टेरेसमधून एका बाजूला स्वच्छ,  नितळ तळं  दिसत होत तर दुसऱ्या बाजूला दरी. चांदण्या रात्री सगळ इतक सुंदर दिसत होत कि मी हरखून गेले. कितीतरी वेळ मी शांतपणे उभ राहून निसर्गाच सौंदर्य अनूभवत होते. तेवढ्यात रोहित तिथे आला आणि म्हणाला, "जर आपल ब्रेकअप झाल नसत तर आज तू इथे माझ्याबरोबर माझी बायको म्हणून आली असतीस ना? आजही मी खूप प्रेम करतो तुझ्यावर अगदी पूर्वीइतकच! तू करतेस का तेवढच प्रेम माझ्यावर? सांगना?
   त्याच्या या बोलण्यावर काय बोलाव ते माझ मलाच कळत नव्हत. हवेतला गारवा,  ती चांदणी रात्र एकूणच सगळ रोमॅन्टिक वातावरण! मी हरखून गेले होते ग  या साऱ्यामूळे. तो पुढे होवून माझ्याजवळ आला,  माझे हात हातात घेउन डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाला,  "I Love you". हरखून गेले मी त्या क्षणात. कितितरी दिवसांनी मनात अनामिक हवीहवीशी वाटणारी धडधड जाणवत होती. काय चूक काय बरोबर काहीच कळत नव्हत. फक्त एवढच कळत होत, हाच तो क्षण! ज्या क्षणासाठी, ज्या अनुभवासाठी मी इतके दिवस तडफडत होते. मी झोकून दिल स्वतःला त्याच्या मिठित आणि त्यानंतर मी माझ सर्वस्व दिल त्याला.
"रेशम ....... रिया जवळपास तिच्यावर ओरडलीच. काय बोलतेयस तू? तुझ तुला तरी कळतय का?
   रियाच्या आवाजाने रेशम भानावर आली. पण तितक्याच शांतपणे म्हणाली,"ओरडायला काय झाल रिया मी खर तेच सांगतेय”
     रेशम तुला माहितेय का तू काय केलस ते आणि त्याच तुला काहीच वाटत नाहीये? इतक्या शांतपणे कस सांगू शकतेस तू हे सगळ?" रिया आश्चर्याने म्हणाली.
   "कारण मला त्यात काहीच चूक वाटत नाही रिया. अग ज्या सुखासाठी मी इतकी वर्षे तडफडत होते ते सुख स्वतः हात जोडून माझ्या समोर आल होत. तुला काय सांगू माझ्या मनाची किती तडफड होत होती ते. अग गेल्या पाच महिन्यात शेखरच्यात आणि माझ्यात शारीरिक जवळीक तर सोडच पण साध प्रेमाच संभाषणही झालेल नाही. ३१ डिसेंबरच्या पिक्निकची मी खूप आतूरतेने वाट बघत होते. शेखर दिल्लीचा स्टे कॅन्सल करू शकत होता पण नाही केल त्याने तस. कारण फक्त पैसा, करिअर. मी रोबोट नाही ग रिया! मलाही भावना आहेत. अशातच रोहित पुन्हा माझ्या आयुष्यात आला आणि मी पुन्हा जगू लागले. त्याच्या फ्लर्टमध्ये सुखाचे क्षण शोधू लागले. कितीही झाल तरी तो माझ पहिल प्रेम होता." बोलता बोलता रेशमचे डोळे भरुन आले.
    "ते सगळ ठिक आहे रेशम पण तू त्याच्याशी चक्क फिजिकल रिलेशन डेव्हलप केलस? अग तुम्ही दोघही मॅरिड आहात.तुला माहिती आहे का आपल्या समाजात अशा नात्याला अनैतिक संबध म्हणतात. अशा संबधांना ना समाज संमती देतो ना कायदा.  तू ज्या नात्याला 'प्रेम' अस गोंडस नाव देत आहेस ना त्या नात्याला समाजात व्यभिचार म्हणतात. आणि कशावरून तो तुझ्यावर प्रेम करतोय? कदाचित त्याला तुझ्याशी फक्त फिजिकल रिलेशन्स ठेवण्यातच इंटरेस्ट असेल. काही लक्षात येतय का तुझ्या?" रिया रेशमला फाडफाड बोलत होती.
    रिया जेव्हढा त्रागा करत होती रेशम तितकीच शांत होती. पश्चात्तापाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मुळात आपल काही चुकतय हेच तिला मान्य नव्हत. काही क्षण शांततेत गेल्यावर रेशमने रियाला विचारल, "रिया व्यभिचार,  अनैतिक संबध हे सार शारीरिकच असत का?
  " तुला काय म्हणायच आहे नक्कि?" , रेशम
   रिया इतके दिवस मी रोहितला भेटत होते, रात्री उशीरापर्यंत त्याच्याशी चॅटिंग करत बसायचे,  तासनतास फोनवर बोलायचे तेव्हा तर कधी नाही वापरलेस असे मोठे मोठे शब्द. आणि आज मी तुला सांगीतल कि आमच्या फिजिकल रिलेशन आले तर हे सार अनैतिक झाल?म्हणजे मनाने मी त्याच्यात गुंतले ते चूक नाही आणि जर शारिरीक जवळीक निर्माण झाली तर तो व्यभिचार? अग आम्ही आमचे संसार वाऱ्यावर नाही सोडून देणार आहोत. फक्त आमच्या आयुष्यातील एक पोकळी भरुन काढायचा प्रयत्न करतोय. रोजच्या धकाधकीच्या जिवनात चार प्रेमाचे, सुखाचे क्षण शोधत होते मी. असे क्षण ज्यामुळे मला जगल्यासारख वाटेल आयुष्य रेटल्यासारख नाही. आणि ते  क्षण मला रोहितने दिले."        
     रेशमच बोलण ऐकून रिया एकदम गप्प झाली. तिला रेशमच बोलण पटत होत पण तिच मन काही ते मान्य करायला तयार होत नव्हत. ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. अचानक मनात स्वरुपचा विचार आला आणि तिच्या गोंधळात अजून भर पडली. एक क्षण तिच्या मनात विचार आला, "आता स्वरुपचा विचार करण म्हणजे पण व्यभिचारच ठरेल का? या विचाराने तिला रडायला यायला लागल.  ती रेशमजवळ काही बोलणार इतक्यात पिरिएड संपल्याची रिंग वाजली आणि नेमक त्याच वेळी रियाला प्रिन्सिपल सरांनी 'इंटरस्कूल सायन्स एग्झिबिशनच्या संदर्भातल्या मिटिंगसाठी बोलावल. नाईलाजाने रिया मिटिंगला निघून गेली. रेशमही आपल्या पुढच्या कामाला निघून गेली.
    इंटरस्कूल सायन्स एक्झिबिशनची खूप मोठी जबाबदारी रियावर होती.  त्या गडबडीत पुढचे दोन दिवस कसे गेलेते रियाला कळल नाही. पण प्रत्येक कामाच्या वेळी तिला आवर्जून स्वरुपची आठवण येत होती. कॉलेजला असताना असे कितीतरी प्रोग्रॅम्स ॲरेंज करताना तिने आणि स्वरुपने एकत्रित कामे केली होती. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या होत्या. कधीही कुठलाही प्रॉब्लेम येउदे प्रत्येक प्रॉब्लेमच सोल्यूशन स्वरुपकडे असे.  स्वरुपची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट आणि त्यात इंटरस्कूल सायन्स एक्झिबिशनची जबाबदारी यामुळे रियाच्या मनातील आठवणींचा एक कप्पा तिच्याही नकळत उघडला गेला होता.  हे सार जरी तिच्या नकळत घडत असल तरी स्वरुपच्या आठवणीत हरवून पुन्हा वास्तवाच भान आल्यावर मात्र तिच तिलाच गिल्टी वाटत असे. याच कारण म्हणजे रेशमने तिच्या डोक्यात भरवलेली 'व्यभिचार' नामक शब्दाची दुसरी व्याख्या. 'व्यभिचार फक्त शारीरिक असतो का?' राहून राहून हा प्रश्न तिच्या मनात घोळत असे."जर मनात दुसऱ्या कोणाचा विचार येत असेल तर तो पण व्यभिचारच आहे का? म्हणजे आपल वारंवार स्वरुपच्या आठवणीत हरवून जाण पण एक प्रकारचा व्यभिचारच आहे का?" अशा विचारांनी रिया सुन्न होत असे. कामाच प्रेशर, स्वरुपची आठवण आणि रेशमच वागण बोलण या साऱ्यामूळे रिया प्रचंड मानसीक तणावाखाली होती.
  त्या दिवशी रियाला काम आवरुन घरी परतायला रात्र झाली. जेमेतेम चार घास पोटात ढकलून रिया झोपी गेली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून शाळेत जायच होत. सायन्स एग्झिबिशन अवघ्या पाच दिवसांवर आल होत. त्यामुळे सहाजिकच कामाचा ताण आणि एग्झिबिशन दोन्हीच प्रचंड टेंशन होत. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेता घेता रियाने सहज मोबाईल बघितला तर नोटिफिकेशन होत, "यू हॅव न्यू मेसेज रिक्वेस्ट". कुतूहल म्हणून रियाने मेसेंजर ओपन केला तर स्वरुपचा मेसेज होता," Hi Riya please accept my friend request" रियाच्या छातीत धडधड सुरु झाली. पण  वेळी मात्र तिला ती अनामिक धडधड सुखावत होती. समोर स्वरुपचा हसऱ्या चेहऱ्याचा फोटो बघून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटल. तिच्या मनात आल, " आजही हा पूर्वीइतकाच गोड दिसतोय असच याच्याकडे बघत रहाव...”
    " रिया चल निघतो मी”, मयंकच्या आवाजाने ती भानावर येते. चेहऱ्यावर उसन हसू आणून तीने कसबस मयंकला 'बाय' केल. मयंक निघून गेल्यावर मात्र तिला खूप गिल्टी वाटायला लागत. त्यात रेशमने तिच्या डोक्यात भरवलेला व्यभिचाराच्या नविन व्याख्येचा किडा तिच डोक पोखरत असतो. आपण काहीतरी भयंकर केलय अस वाटून ती अधिकच अपसेट होते. रिया दिवसभर सगळी काम यांत्रिकपणे करत असते. स्वरुपच्या आठवणी ती थांबवू शकत नसते आणि त्या आठवणींसोबत वावरण म्हणजे व्यभिचार... तिच डोक सुन्न होवून जात. पूर्ण दिवस कामात जातो रात्री घरी यायला उशीर होतो. चला उद्या निदान लवकर जायच नाही असा विचार करुन ती सुखावते. थकलेला देह आणि हरवलेल मन दोन्ही क्षणात झोपेच्या आहारी जातात.
     दुसऱ्या दिवशी रियाचा वाढदिवस असतो. सकाळी तिला जाग येते तेव्हा मयंक तयार होवून ऑफिसला निघालेला असतो. "आज लवकर?" रिया मयंकला विचारते.
"अग हो US मधून हेड ऑफिसची लोकं आली आहेत,  मिटिंग आहे... जाव लागेल. तू शांत झोपली होतीस म्हणून नाही मुद्दाम उठवल तुला. तसही टिफिन नकोच होता आज.  बाहेरच जेवण होइल." मयंक.
     निघता निघता मयंक परत आला आणि रियाला म्हणाला, "Happy Birthday Riya. लक्षात आहे माझ्या पण गिफ्ट आणायला नाही जमल. आणि सॉरी घरी यायला कदाचित रात्र होइल....ओके? प्लीज समजून घे ....... बाय...... टेक केअर ..
       त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रिया बघतच राहिली आणि स्वतःशीच म्हणाली, "चला याच्या लक्षात होत हे काही थोड आहे". तेवढ्यात मोबाईलवर मेसेंजरची टोन वाजते. ती मोबाईल हातात घेते. फेसबूक, मेसेंजर, व्हॉट्स ॲप यावर मेसेजेस आणि शुभेच्छा यांचा पाऊस पडत असतो. अनेक मेसेज रिक्वेस्ट्स असतात. त्यामध्ये स्वरुपच नाव बघून ती चटकन त्याचा मेसेज ओपन करते. समोर  पिवळ्या गुलाबाच्या फुलांचा बूके आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बघून ती मनोमन सुखावते.  तिच्या मनात येत..... "आजही आठवतय याला मला पिवळ्या रंगाची गुलाबाची फुले फार आवडतात ते." काही क्षण ती स्वरुपच्या आठवणीत हरवून जाते. पण घडाळ्याचे पूढे सरकणारे काटे बघून तिला नाईलाजाने स्वरुपच्या विचारातून बाहेर पडाव लागत. पटापट आवरून रिया शाळेत पोचते. शाळेत पुन्हा रोजचे पिरिएअड्स एक्झिबिशनची तयारी. कामांचा डोंगर उपसता उपसता रिया थकून जाते. लंच ब्रेकच्या वेळी तिची आणि रेशमची गाठ पडते. त्या दिवसानंतर दोघींच फारच जुजबी बोलण झालेल असत. एक प्रकारचा दुरावा निर्माण झालेला असतो दोघींमध्ये.  रेशम स्वतः पुढे येउन रियाला वाढदिवसाच्या शूभेच्छा देते आणि एक छानस गिफ्ट तिच्या हातात देते. काही क्षण दोघी मोकळेपणाने बोलतात. तेवढ्यात रेशमचा मोबाईल वाजतो. रेशमच्या बोलण्यावरुन, "हा फोन रोहितचा आहे हे रियाच्या लक्षात येत. रिया काहीशी अपसेट होते. फोनवर बोलून झाल्यावर रेशम रियाला सहज विचारते , "मग आज काय प्लॅनिंग कुठे करणार बर्थडे सेलिब्रेशन? यावर मात्र रियाच्या डोळ्यात आसव जमा होतात. पण ती तशीच डोळ्यात थांबवून रेशमला मयंकच्या मिटिंगबद्दल सांगते. काही क्षण तसेच शांततेत गेल्यावर रेशम म्हणते, "मी आले असते तुझ्याबरोबर संध्याकाळी. गेलो असतो आपण कूठेतरी. गेला बाजार पाणीपूरी तरी खाल्ली असती पण आज संध्याकाळी मला......
 "रोहितबरोबर जायचय” बरोबर आहे ना? रेशमच बोलण मध्येच तोडत रिया विचारते.  रेशम होकारार्थी मान हलवते.
   रेशम थांबव हे सगळ अग या साऱ्याचे परिणाम किती भयंकर होणार आहेत हे तुला माहिती आहे का?अजूनही वेळ गेली नाहीये प्लीज सावर स्वतःला", रिया रेशमला समजवण्याचा प्रयत्न करते.
   "नाही रिया मी नाही थांबवू शकत स्वतःला. त्याच्याशिवाय तडफड होते ग जीवाची.त्याच्याशी बोलले नाही तर चिडचिड होते. त्याला भेटले नाही तर मन बेचैन होत. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय रिया, मनाने खूप गुंतलेय मी त्याच्यात", रेशम भावनिक होवून बोलत असते. त्यानंतर लंच ब्रेक संपल्याची बेल वाजते आणि दोघी आपआपल्या कामाला निघून जातात.
   रियाच्या मनात पुन्हा विचारांच विचारांच वादळ उठत. समोर असणारी काम ती यांत्रिकपणे करत असते. तेवढ्यात तिला प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये बोलावल असल्याचा निरोप येतो. रिया केबिनमध्ये जाते. एक्झिबिशनच्या तयारीतील काही गोष्टी खटकल्यामूळे प्रिन्सिपल नाराज होतात आणि रियाला त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. केबिनमधून बाहेर आल्यावर तिला रडूच कोसळत. तिच्या मनात येत, "एवढ मरमर काम करून पण शेवटी हे असच ऐकायच. घरी कोणाला किम्मत नाही आणि इथेही तिच परिस्थिती”. कसबस ती स्वतःला सावरते. त्यानंतर पूर्ण दिवस तिचा उदास जातो. संध्याकाळी काम संपवून ना घरी जायची इच्छा असते ना शाळेत थांबायची.  तिच्या मनात स्वरुपचा विचार येतो आणि मन पुन्हा हळव होत.
    संध्याकाळी रिया घरी पोचते तेव्हा घरी कोणीच नसत. सासूबाई आभाला घेउन पार्कमध्ये गेलेल्या असतात आणि सासरे ज्येष्ठ नागरीक कट्ट्यावर. मयंकला तर उशीरच होणार असतो.  ती नाईलाजाने दार उघडून घरात जाते. पर्स सोफ्यावर फेकून स्वतःलाही  सोफ्यावर झोकून देते. दिवसभरात घडलेल्या घटना, स्वरुपचे विचार, रेशमच वागण आणि व्यभिचाराची नवीन व्याख्या या साऱ्यामुळे ती खचून गेलेली असते. तिला खूप रडावस वाटत असत. या क्षणी आपल्याजवळ कोणीतरी आपल असाव. त्याच्या मिठीत स्वतःला झोकून द्याव आणि मनसोक्त रडाव अस तिला मनोमन वाटत असत. पण मयंक तर ऑफिसमध्ये आणि स्वरूप...... स्वरुपचा विचार येताक्षणी रिया दचकते. हा काय विचार करतेय मी....... नाही हे चूक आहे......... तिच्या घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी म्हणून ती किचनमध्ये जाते पण सगळा ताण असह्य होवून ती तिथेच खाली कोसळते.
      रिया जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती त्यांच्या बेडरूममध्ये असते. मयंक तिच्याजवळ बसून असतो. ती बेडवरुन उठायचा प्रयत्न करते पण मयंक तिला खुणेनेच नको म्हणतो. तिच्या जवळ सरकून तो प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवतो. आणि तिला विचारतो, "कस वाटतय रिया आता?" रिया हसून मान हलवते. मयंक तिचा हात हातात घेउन तिला विचारतो, "तुझा वाढदिवस म्हणून संध्याकाळी शक्य नव्हत तरी मी लवकर घरी आलो. घरी येउन बघितल तर तू किचनमध्ये चक्कर येउन पडलेली. घरी कोणीच नव्हत. मी पटकन उचलून तुला इथे बेडरुममध्ये आणून ठेवल. डॉक्टरांना फोन केला. तुझ BP  खूपच कमी झाल होत. डॉक्टरनी सांगितल ओव्हर स्ट्रेसमूळे अस झालय. एवढा कसला स्ट्रेस आहे रिया? नक्की काय प्रॉब्लेम आहे? गेले काही दिवस बघतोय मी तू खूप डिस्टर्ब आहेस. जे काय असेल ते मोकळेपणाने सांग. हे बघ मी लग्नापूर्वीच तुला सांगितल होत, 'तुझा नवरा व्हायच्या आधी मला तुझा मित्र व्हायला आवडेल. आज त्याच नात्याने मी तुझ्याशी बोलतोय. जे काही मनात असेल ते मला सांगून टाक अशी कूढत राहू नकोस. प्लीज बोल काहीतरी. अशी गप्प नको राहूस."
     मयंकच बोलण ऐकून रियाला रडू येत. ती त्याच्या मिठीत शिरुन रडू लागते. कितीतरी वेळ ती तशीच रडत असते.. एखाद्या लहान बाळासारखी. आणि मयंक तिला मायेने थोपटत असतो. भावनेचा आवेग  ओसरल्यावर ती स्वरुपच्या फ्रेंड रिक्वेस्टपासून घडलेल्या सगळ्या गोष्टी मयंकला सांगते अगदी रेशमबद्दलही..... आणि मयंकला सॉरी म्हणून पुन्हा रडू लागते. तिच रडून झाल्यावर मयंक तिला विचारतो, "आपण एकएक प्रॉब्लेम सोडवूया का? म्हणजे तुझ्या मनात जो विविध प्रॉब्लेम्सचा गुंता झालाय तो आपल्याला व्यवस्थित सोडवता येइल. चालेल? उत्तरादेखल रिया फक्त मान हलवते.
 "रिया सगळ्यात आधी मनातल गिल्ट काढून टाक तू काहीही चूकीच केलल नाहीस. स्वरुप कानिटकरची तुला आलेली फ्रेंड रिक्वेस्ट आणि रेशमच वागण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याची सरमिसळ करण आधी बंद कर. अग एवढ काय झाल त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर? एके काळी तुम्ही खूप चांगले मित्र होतातच ना.  ठिक आहे तुझ्या मनात त्या मैत्रीच्या पुढे जाऊन त्याच्याबद्दल काही भावना होत्या. पण त्याच्या मनात तर तस काहीच नव्हत. तो तुला फक्त त्याची एक चांगली  मैत्रीणच समजत होता. आज इतक्या वर्षांनंतर त्याला ते मैत्रीच नात परत निर्माण करावस वाटल असेल. तर त्यात चूक काय आहे. आज तूला तुझा संसार आहे तसच त्यालाही त्याचा संसार आहेच की. अग प्रत्येक नात्याच एक वेगळ महत्व असत आपल्या आयुष्यात. तुझ तेव्हा प्रेम होत त्याच्यावर त्याच नव्हत. त्यामुळे तुमच्या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. ज्या गोष्टीमूळे त्या वाटा वेगळ्या झाल्या त्या गोष्टीला आज काहीच अर्थ उरला नाहीये . त्यामुळेच कदाचित त्याने तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल." मयंक शांतपणे रियाला समजवायचा प्रयोग करतो.
  "माझ लग्न झालेल असताना त्याचा विचार करण,एक्झिबिशनच्या कामाच्या वेळी प्रत्येक वेळी त्याला मिस करण ह्यात काहीच चूक नाही का? हा व्यभिचार नाही का मयंक?" रिया रडवेली होवून विचारते.
 "अग वेडे काहिही झाल तरी आठवणी विसरता येत नाहीत.तुम्ही अशा अनेक कार्यक्रम नियोजनाच्या कामात एकत्रीतपणे काम केल आहे ना म्हणून आली त्याची आठवण त्यात व्यभिचार कसला?" मयंक सहज हसुन तिला विचारतो
  "तुला काहीच चूक वाटत नाही का माझी?" रिया
 "रिया आत्ता काय होतय माहितेय? तू तुझ्या विरुद्ध माझ्याशी भांडते आहेस" मयंक तिला हसवण्याचा प्रयत्न करत म्हणतो. तरिही रियाच्या मनातला गोंधळ अजूनही तसाच असतो तिची अवस्था बघून मयंकला वाईट वाटत. तिला कस समजवाव हेच त्याला कळत नसत. काही क्षण तसेच शांततेत गेल्यावर मयंक रियाला म्हणतो, "रिया तू इतकी निरागस आहेस ना कि व्यभिचार वगैरे करण्याचा विचार तू स्वप्नातसुद्धा करु शकणार नाहीस”
    "व्यभिचार फक्त शारीरिक असतो का मयंक?" अखेर रिया मूळ मुद्द्यावर येते. तिच्या मनातल्या गोंधळाच मूळ कारण मयंकच्या लक्षात येत. थोडा वेळ विचार करुन मयंक तिला विचारतो, "रिया तुला जेव्हा कोणाचा राग येतो अगदी प्रचंड राग येतो तेव्हा त्या व्यक्तीला मारावस वाटत?"  यावर रिया होकारार्थी मान हलवते." मग तू मारतेस का त्या व्यक्तीला?" मयंक तिला विचारतो.
 "नाही",  रिया शांतपणे सांगते.
"मग तुझ्या मनात त्या व्यक्तीला मारायचा विचार आला म्हणून तू गुन्हेगार ठरतेस का? तर नाही. जोपर्यंत तू मारण्याची कृती करत नाहीस तोपर्यंत तू गुन्हा करत नाहीस आणि गुन्हाच घडला नाही तर तू गुन्हेगार कशी ठरशील? येतय का काही लक्षात?" मयंक हसून विचारतो.
    रिया मान हलवून होकार तर देते पण अजूनही तिचा गोंधळ पूर्णपणे संपलेला नाही आणि याच कारण रेशम आहे हे मयंकला जाणवत. म्हणून मुद्दामच तो रेशमचा विषय काढतो. रेशमबद्दल रिया जेव्हा बोलायला लागते तेव्हा मयंकला जाणवत, रिया रेशमच्या वागण्यामूळे जेवढी डिस्टर्ब आहे तेवढीच तिच्या काळजीमुळे.
   रियाच बोलण संपल्यानंतर मयंक तिला म्हणतो, "रिया तुला एक सांगू? जे घडलय त्यात जेवढी चूक रेशमची आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चूक शेखरची आहे. अग प्रत्येकाला अटेंशन हव असत. अगदी एखाद्या लहान बाळापासून ते म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच. रेशमचही तसच झाल होतं. तिला शेखरच अटेंशन हव होत पण ते तिला मिळत नव्हत.  नवरा बायकोच्या नात्यामध्ये असे प्रसंग अनेक वेळा येतात. अशा वेळी जर एकमेकांशी बोलून प्रश्न सोडवले तर ते सहज सुटतात. पण रेशमच्या बाबतीत कदाचित तिने शेखरशी संवाद साधलाच नाही किंवा साधला असेल पण शेखरने तेवढ महत्व दिल नसेल. नेमक त्याच वेळी रोहित तिच्या आयुष्यात आला आणि तिला हव असलेल अटेंशन रोहितने तिला दिल. त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटू लागला. त्याच्याशी तासनतास बोलण, चॅटिंग, भेटीगाठी हे सगळ सुरु झाल. पण हे सगळ इथपर्यंत ठिक होत. एक स्त्री आणि एक पुरूष यांना जर एकमेकांचा सहवास आवडत असेल तर त्यात चूक काहीच नाही फक्त त्या नात्यामध्ये निखळ मैत्री असली पाहिजे. पण रेशम मात्र पुढे जाऊन यामध्ये वहावत गेली आणि तिने रोहितशी फिजिकल रिलेशन डेव्हलप केली. कस आहे ना कूठे थांबायच हे कळल पाहिजे. दुर्दैवाने हे तिला अजूनही कळत नाहीये. याचे परिणाम काय होतील यापेक्षा तिला यात काही चूक वाटत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे. मुळात रेशम जर चूक मान्यच करत नाहीये तर ती सुधारणार कशी?
रिया: मग आता काय करायच आपण? पुढे जाऊन जर शेखरला कळल तर काय परिणाम होतील या साऱ्याचे?
मयंक: परिणाम वगैरे या खूप पुढच्या गोष्टी झाल्या रिया.    परिणाम हे चूक ठरवण्यासाठीच  परिमाण नाही असू शकत. जे चूक आहे ते चूक आहे. परिणाम काहीही होतील किंवा नाही होणार.... तिला आत्ता सहानुभूतीची गरज आहे ती तिला दे . सहानुभूती दाखवता दाखवता हळूहळू ती कुठेतरी चूकतेय हे तिच्या लक्षात आणून दे. याचे परिणाम काय होतील या गोष्टी आत्ताच तिला नको सांगत बसूस. याने विरोधाला विरोध म्हणून ती पुन्हा चूकेल.
   रियाला मयंकच म्हणण पटल. तिने समाधानाने मान हलवली.  आज कितीतरी दिवसांनी तिला शांत वाटत होत. मयंकडे अभिमानाने बघत रिया म्हणाली "मयंक तुझे विचार किती प्रगल्भ आहेत, विचार करण्याची पद्धत किती वेगळी आहे. आज मी एका वेगळ्याच समजूतदार मयंकला बघतेय."
   " अस काही नाही ग रिया. एवढा तर समजूतदारपणा दाखवलाच पाहिजे ना. नाहीतर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग? शिक्षणाने नुसतच शिक्षित होण्यापेक्षा जर प्रत्येकजण सुशिक्षित झाला तर आजच्या जमान्यात नात्यांमध्ये  जे प्रॉब्लेम्स येत आहेत निदान ते तरी कमी होतील. तशी माझीही चूक झालीच ग. ऑफिसच्या या नव्या प्रॉजेक्टमूळे माझ तुझ्याकडे जरा दुर्लक्षच झाल आणि म्हणूनच तुझी ही अशी अवस्था झाली. पण आता पुढच्याच आठवड्यात हे प्रॉजेक्ट संपेल मग या मंथएंडला दोन दिवस आपण कुठेतरी फिरायला जाऊया फक्त तू आणि मी. आभाला आई बाबा बघतील. मी बोलतो त्यांच्याशी.." मयंकच हे बोलण ऐकून रिया आनंदाने त्याला मिठी मारते.तिच्या मनातले सगळे गोंधळ संपलेले असतात.  स्वरुप कानिटकरची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचा निर्णय ती घेते. तस करुन ती एका जुन्या मैत्रीची नव्याने सुरुवात करणार असते.
समाप्त.
©मानसी जोशी










 



 







 



Tuesday, 21 February 2017

कथा - कॉफी

कॉफी
संध्याकाळी कॅफेबाहेर उभा राहून तो तिची वाट बघत असतो. दर मंगळवारी सव्वासहापर्यंत येणारी ती आज साडेसहा वाजले तरी आलेली नसते. एवढ्यात त्याला ती धापा टाकत येताना दिसते. त्याच्या कपाळावरची आठी सरकून त्याच्या ओठांवर येते आणि स्मितहास्यात बदलते.
        ती समोर येउन गोड हसून 'सॉरी' म्हणते. तो उगाचच काहिसा वैतागून म्हणतो, "किती उशीर?" ती तेवढ्याच शांतपणे सांगते, "मीटिंग होती."
        दोघ कॅफेमध्ये जातात. तो ऑर्डर देतो, "दोन स्ट्रॉंग कॉफी."
       ती म्हणते, "चिडू नकोस पण मला लगेच निघाव लागेल. सासूबाईंना दवाखान्यात न्यायच आहे."
      तो वैतागून विचारतो, "आजचाच दिवस सापडला का?"
         "आजार दिवसवार ठरवून येतात का?" ती सवयीने तिच उत्तर प्रतिप्रश्न करुन देते.
       आता मात्र त्याची चिडचिड वाढते आणि तो काहिसा चिडून तिला विचारतो, " फक्त १०/१५ मिनिटेच भेटायच होत तर मग कशाला आलीस?"
        ती अजूनही शांतच असते आणि अगदी सहजपणे त्याला सांगते, "कारण दर मंगळवारी इथे भेटतो आपण. मी तुझ्याशी आणि माझ्याशी केलेली एक कमिटमेन्ट आहे ती. इथे आल्यावर ना मी कोणाची बायको असते, ना कोणाची आई, ना कोणाची सून आणि ना कोणाची एंप्लॉयी. काही क्षण का होइना मी इथे येउन फक्त 'मी' म्हणून जगते. तुझी निखळ निरपेक्ष मैत्री आणि त्यासोबतची स्ट्रॉंग कॉफी मला इतर भूमिका समर्थपणे पेलण्याची ताकद देतात.माझ्या मनाची मरगळ झटकून मी नवी आव्हाने झेलायला तयार होते."
     तेवढ्यात वेटर वाफाळणाऱ्या कॉफीचे दोन मग टेबलावर आणून ठेवतो. कॉफीच्या वाफेबरोबर त्याचा रागही उडून जातो. कॉफीच्या घोटाबरोबर त्याला जाणवत, तिने स्ट्रॉंग राहूनही तिच्यातला गोडवाही जपलाय अगदी या कॉफीसारखा!  नकळत तो तिला 'Thanks' म्हणतो.
       ती विचारते, "कशासाठी?" तो हसून म्हणतो, "For coffee -for everything". त्याला जे म्हणायच असत ते तिला कळत. त्यांच नात असच असत-  कडू कॉफीत विरघळलेल्या गोड साखरेसारख. या नात्यामूळेच त्यांच्या आयुष्यातला गोडवाही  टिकून असतो.
©मानसी जोशी.








Friday, 3 February 2017

कथा - मोगराफुलला

मोगराफुलला
ती तशी जरा अबोलच. दिसायला फारशी सुंदर वगैरे नव्हती पण लांबसडक केस आणि काळेभोर भावूक डोळे यामूळे अगदी आकर्षक दिसायची. त्याने तिला पहिल्यांदा बघितल ते एका नातेवाईकांच्या लग्नात. तिच्या भावूक डोळ्यांनी आणि लांबसडक रेशमी केसांनी त्याच्या हृदयाचा ठाव घेतला. त्याला ती फारच आवडली. मग काय पत्रिका जुळणे, दोन्हीकडची पसंती, मानापमान, मुहूर्त हे सारे सोपस्कार पार पाडले गेले आणि ती त्याची सौ. झाली. त्याला अबोलीची फुलं आणि त्या फुलांचा गजरा खूप आवडातो हे लग्नाआधी झालेल्या एकमेव ओझरत्या भेटीतच त्याने तिला सांगितलेले असल्यामूळेच की काय लग्नानंतर ती तिच्या लांबसडक केसात नेहमी अबोलीच्या फुलांचा गजरा माळायची.
      दुसऱ्याच मन जपणं हा तिचा मूळ स्वभाव तर आपल्याच धुंदीत जगणारा असा तो. दोघंही एकदम वेगवेगळ्या स्वभावाची. बघता बघता लग्नाला महिना उलटून गेला. दोघं एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. तरीही काहीसा नवखेपणा असतोच. तिच्या अबोल स्वभावामूळे तिला त्याच्यावर असणारं तिचं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करता येत नव्हतं. तर स्वतःच्याच विश्वात वावरणाऱ्या त्याला प्रेम व्यक्त करण्याची गरज आहे हे सुद्धा कळत नव्हतं.
       तो दिवस तिच्यासाठी तसा खासच होता. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस!
   तो तिला म्हणाला, "आज संध्याकाळी तयार रहा आपण तुझ्यासाठी साडी घ्यायला जाऊया."
    संध्याकाळी खास त्याला आवडतो म्हणून केसात अबोलीचा गजरा माळून ती तयार होते. तो ही ऑफिसमधून निघतो. त्याची ठरलेली बस त्याला मिळते पण, वाटेत झालेल्या मोठया अपघातामुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममध्ये तो अडकतो. तो मनातून खूप वैतागतो पण गप्प बसण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो.
    इकडे ती त्याची वाट बघत होती. घडाळ्याच्या पुढे सरकणाऱ्या काट्याबरोबर क्षणाक्षणाला तिचे मन उदास होत होतं. अखेर संध्याकाळ टळून अंधार सुरु होतो. 'नव्या नवरीने रात्रीच्या वेळी मुद्दाम बाहेर पडू नये' या नियमानुसार आता आपल जाण कॅन्सल होणार हे तिला कळून चुकतं.
      तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळून जातो. अखेर जेवणाच्या वेळेला तो येतो. तिच्या नाराजीची पूर्ण कल्पना असल्याने आपल्या उशीर होण्याच कारण तो मुद्दामच घरात सगळ्यांसमोर सांगून तिची माफी मागतो. ती  'ठिक आहे' अस म्हणून वेळ सावरून नेते.  सगळ्यांच मन जपणाऱ्या तिचं मन मात्र त्या दिवशी नकळत का होईना पण दुखावलेलं असतं.
    घरातली सगळी कामे आवरून ती बेडरुममध्ये जाते तेव्हा तो तिची वाटच बघत असतो. ती काहीही न बोलता केसात माळलेला अबोलीचा गजरा काढून ठेवते. नेमकं त्याच वेळी येऊन तो तिच्या केसांमध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळतो. मोगऱ्याच्या सुगंधाने तिचा रुसवा कुठल्या कुठे पळून जातो.  ती आश्चर्याने त्याला विचारते, "तुम्हाला तर मोगऱ्याच्या फुलांचा वास अजिबात आवडत नाही, मग तुम्ही आज मोगऱ्याच्या फुलांचा गजरा कसा काय आणलात?" 
"कारण तुला आवडतो ना म्हणून", तो.
"पण हे तुम्हाला कस कळलं?" ती.
"सांगेन, पण जर का आजच्या उशीराबद्दल मला माफ केलंस तरच!"
ती लाजून म्हणते, "ठिक आहे केलं माफ, आता तरी सांगा."
     अग आज ऑफिसमधून तुझ्या घरी फोन केला होता तुला कुठल्या रंगाची साडी आवडेल ते विचारण्यासाठी. कारण तुझ्या स्वभावानुसार तू काही तुझी आवड मोकळेपणाने सांगणार नाहीस. फोनवर तुझ्या आईने सांगितलं, "एकवेळ तिला साडी कुठल्याही रंगाची घेतलीत तरी चालेल पण मोगऱ्याचा गजरा मात्र आवर्जून घ्या. कारण तिला मोगऱ्याची फुले फार आवडतात. पण तुम्ही तिला पहिल्याच भेटीत सांगितल होतत की तुम्हाला मोगरा आवडत नाही म्हणून मग तिने लग्नातही हट्टाने अबोलीच्या फुलांचाच गजरा माळला."
   नेमका आज उशीर झाला. त्यामुळे साडी खरेदी तर राहूनच गेली, पण आधीच्या स्टॉपवर उतरुन आठवणीने तुझ्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घेतला."
    ती लाजून त्याच्या मिठीत शिरते आणि खऱ्या अर्थाने एक अबोल प्रीत बहरते.
        आज लग्नाला २५ वर्षे झाल्यावरही तो तिच्या वाढदिवसाला तिच्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणतो आणि आजही ती त्याच्यासाठी अबोलीच्या फुलांचा गजरा माळते.

©मानसी जोशी



Sunday, 15 January 2017

कथा- सुर्यास्त...... एक प्रेमकहाणी

सुर्यास्त....... एक प्रेमकहाणी
 ती काहीशी आधुनिक विचारांची. तर तो परंपरा जपणाऱ्या घरातला. तिची आई वर्किंग वूमन तर त्याची साधी गृहिणी. त्याचं एकत्र कुटुंब तर ती विभक्त कुटुंबात वाढलेली. तो शांत, समजूतदार तर ती काहीशी रागीट. तरीही दोघांचे सूर जुळतील का कधी? कशा जुळतील यांच्या रेशीमगाठी?
         त्याने तिला पहिल्यांदा बघितले ते कॉलेजमध्ये. ती 'रोझ क्विन' झाली होती आणि ज्याच्यामुळे ती 'रोझ क्विन' झाली होती त्या बड्या बापाच्या मुलाला झापताना ती रागाने लालबुंद झाली होती.
"मला देण्यासाठी या गुलाबांच्या फुलांवर जेवढा खर्च केलास ना तेवढा खर्च जर गरीब मुलांच्या पुनर्वसनासाठी केला असतास तर मी इंप्रेस झाले असते.”
ती बोलत होती आणि तो बिचारा हे सारं अनपेक्षित असल्यामुळे गोंधळून गप्प बसला होता. खरंतर ज्या गोष्टीसाठी बाकिच्या मुली तरसत होत्या ती गोष्ट तिला अगदी सहज मिळाली होती. पण ती खूप वेगळी होती.  ती एका लहान मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये काम करीत होती. बाकीच्या मुली शॉपिंग, फॅशन, बॉयफ्रेंड या सगळ्यासोबत 'कॉलेज लाईफ' एन्जॉय करत होत्या. पण ती अनाथ मुलांच्या, गरीब मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत होती.
     प्रेरणा तिच नाव. अगदी नावाला शोभेल असं तिचं वागणं. त्याला तिचं कौतुक वाटलं. पण तेवढ्या पुरतंच. तिला बघताक्षणी तो तिच्या प्रेमात वगैरे पडला नव्हता. त्या दिवसानंतर तो त्याच्या रुटिनमध्ये बिझी झाला. त्याचं हे 'एमबीए'चं  शेवटच वर्ष असल्यामुळे तो अभ्यासात गढून गेला. अधूनमधून ती कॉलेजला दिसायची. अनेक वेळा लायब्ररीमध्ये दोघं एकमेकांच्या समोरही आली होती. काही वेळा नजरानजरही झाली होती. पण त्याने कधी तिचा विचार केला नाही. पण त्याला तिचं दिसणं, नजरानजर होणं थोडं थोडं आवडायला लागल होतं. हळूहळू कॅम्पसची तयारी प्रोजेक्टस यात तो बिझी होत गेला आणि तिला काहीसं विसरुनही गेला. ती तर त्याला ओळखतच नव्हती.  
        असेच काही दिवस गेले. त्याला कॅम्पसमधून चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. यथावकाश परिक्षाही पार पडली. त्याच्याबरोबर त्याच्या अजून काही मित्रांनाही मनासारखी नोकरी मिळाली. परीक्षा संपल्यामूळे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅनस ठरलेले होते. बाहेरगावचे रुम घेउन / हॉस्टेलला रहाणारे मित्र दुसऱ्याच दिवशी घरी जायच्या तयारीत होते. कोणी फॅमिली फंक्शनला तर कोणी फॅमिलीसोबत 'व्हेकेशन ट्रिप'साठी जाणार होते. त्यामुळे  "आजकी शाम दोस्तोंके नाम", अस ठरवून तो आणि त्याचे मित्र आयुष्यातला हा 'टर्निंग पॉइंट' सेलिब्रेट करण्यासाठी संध्याकाळी 'सी व्ह्यू' रेस्टॉरंटमध्ये जमले. आज मेनूकार्डवरची उजवी बाजू न बघता मनाला वाटेल ते मागवायचं, धमाल करायची असं ठरवून सगळ्यांनी मेनूकार्ड वाचायला सुरुवात केली. सगळेजण मेनूकार्डवरच्या डीश वाचून त्याच्याबद्दलची माहिती विचारुन वेटरला भंडावून सोडत होते. वेटर वेगवेगळ्या डिश, टेबलावर आणून ठेवत होता. मस्त पार्टी रंगात आली होती. सहजच त्याचं खिडकीबाहेर लक्ष गेलं. बाहेरचं वातावरणही तितकंच मनमोहक होतं. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे संध्याकाळ बराच वेळ रेंगाळली होती. अस्ताला जाणारा सूर्य जणू लाटांशी लपंडाव खेळतोय अस वाटत होतं. सूर्याची पिवळसर किरणे हळूहळू लालसर दिसायला लागली होती. एवढ्यात त्याला प्रेरणा दिसली. तिच्या भोवती आजूबाजूला अनेक लहान मुले होती. आपल्या हातातले फूगे आणि चॉकलेट्स ती त्या मुलांना वाटत होती. त्या मुलांना खूष बघून तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मुळातच सुंदर असणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर समाधानाच्या तेजामूळे एक वेगळाच रंग आला होता. बस तिच्याकडे असच बघत रहावं असं त्याला वाटत होतं.  सूर्यास्ताच हे मनमोहक दृष्य सुंदर आहे की प्रेरणामुळे ते जास्त सुंदर वाटतंय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. आज प्रथमच कुठल्यातरी मुलीबद्दल त्याच्या मनात अशा भावना निर्माण झाल्या होत्या. प्रेरणा त्या लहान मुलांसह खेळून त्यांना आनंद वाटण्यात मग्न होती. आपल्याकडे कोणी निरखून बघतय याची तिला साधी जाणीवही नव्हती. "अमित कुठे हरवलास?" मित्राच्या आवाजाने तो भानावर आला.
"काही नाही सहज ..." असं म्हणून त्याने वेळ मारून नेली. पण मनाच्या एका कोपऱ्यात ती कधीच जाऊन बसली होती. त्यानंतर अनेकदा प्रयत्न करुनही मनात येणारे तिचे विचार तो थांबवू शकत नाही. त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत जातो. 
   असेच अजून काही दिवस सरतात.  नोकरीच्या व्यापात हळूहळू तिचा विचार मागे पडत जातो. तो त्याच्या रुटिनमध्ये व्यस्त होतो. एखाद्या संध्याकाळी ऑफिसच्या खिडकीतून दिसणारा सूर्याचा लाल गोळा पाहिल्यावर त्याने जपलेली तिची आठवण हळूच डोकं वर काढत असे. त्या दिवशीही तसंच झालं, ऑफिसच्या खिडकीतून दिसणाऱ्या सुर्यास्ताच्या मोहक दृष्यावरून त्याची नजर हटत नव्हती. त्याला तिच्या विचारांमध्ये हरवून जावंस वाटत होतं. पण टेबलावरच्या फाईल्स त्याला तसं करायची परवानगी देत नव्हत्या. सगळे विचार झटकून त्याने कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. ऑफिसमधून निघेपर्यंत नेहमीप्रमाणे संध्याकाळ उलटून गेली होती. खिडकीबाहेर अंधार पडलेला होता. त्याने मनातून झटकलेला तिचा विचार आता पुन्हा त्याच्या मनात डोकावू लागला होता. नकळत त्याने गाडी समुद्राच्या दिशेने वळवली. समुद्रकिनारी गर्दी थोडी कमी होती. सहज त्याची नजर समुद्राच्या किनाऱ्यावरच्या 'सी व्ह्यू' हॉटेलवर पडली. त्याला त्या संध्याकाळी झालेली पार्टी आठवली. गेल्या कित्येक दिवसात व्हाट्स अप ग्रूपवरचे बोलणे सोडले तर मित्रांशी आपलं फारसं बोलणंच होत नाही हे त्याला प्रकर्षाने जाणवलं. लाटांचे गुज ऐकून आणि आकाशातल्या चंद्राकडे बघून त्याला जाणवलं, हे सगळं आपण कित्येक दिवसात अनुभवलंच नाही. नोकरी लागल्यापासून ऑफिस आणि घर हेच आपलं विश्व बनलंय.  संपूर्ण आठवडा ऑफिसच्या कामात जातो आणि वीकएन्डचे दोन दिवस घरात लोळत पडण्यात नाहीतर मूव्ही बघण्यात संपतात. विचारांच्या तंद्रीत असतानाच त्याचा फोन वाजला.
"दहा मिनिटात घरी पोचतो आई" एवढं बोलून फोन कट करून नाईलाजनेच तो तिथून निघाला.
"काहीही झालं तरी उद्या ऑफिसची कामं लवकर आटपून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी समुद्रावर यायचं. असा विचार मनाशी पक्का करत त्यांने गाडीला किक मारली. "कदाचित 'ती' दिसेल" हा विचार मनात येताच, त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटते. 
     दुसऱ्या दिवशी तो जरा लवकरच ऑफिसमधून निघला. गाडी घेऊन सरळ समुद्राच्या रस्त्याला लागला. पून्हा त्याला त्या दिवशीची संध्याकाळ आठवली, पण क्षणभरच. खरंतर त्याची नजर तिला शोधत होती. उगाचच वेळ दवडायचा म्हणून तो हॉटेल 'सी व्ह्यू' मध्ये जाऊन बसला आणि त्याने कॉफी मागवली.  अस्ताला जाणारा सूर्य नारायण बघत आणि समुद्राच्या लाटांकडे बघत तिच्या विचारात हरवून गेला.  पण ती काही दिसली नाही. त्याचा मूड गेला. बिलाचे पैसे देऊन तो हॉटेलमधून बाहेर पडला. सूर्याचा गोळा आता लालबुंद झाला होता. तो जायला निघणार इतक्यात त्याला ती दिसली; एकटीच! वाळूत शांत बसून सुर्यास्ताच सौदर्य आपल्या सुंदर डोळ्यात साठवून घेताना. तिला बघून तो सुखावला. आज कितीतरी दिवसांनी ती त्याला दिसली होती. तो तिला डोळे भरुन बघत होता. वाऱ्यावर उडणारे तर कधी मध्येच तिच्या गालावर रेंगाळणारे तिचे केस बघून क्षणभर त्याच्या मनात आलं, नक्की काय सुंदर आहे? हिचे बोलके काळजाचा ठाव घेणारे डोळे, का वाऱ्यावर उडणारे तिचे हे केस?  त्याच्या मनात त्याला एक अनामिक पण हवी हवीशी वाटणारी धडधड जाणवू लागली. कितीतरी वेळ तो तिच्याकडे एकटक बघत होता. शेवटी हिम्मत करुन त्याने तिच्याशी बोलायला जायचं ठरवलं. पण तेव्हढ्यात कुठलातरी मुलगा तिच्या बाजूला येवून बसला. ती बहुदा त्याचीच वाट बघत असावी. त्या मुलाच्या एकंदरीत हावभावांवरुन तरी त्याला असंच वाटत होतं.
"तो उशीर झाल्याबद्दल तिची माफी मागत असावा. या मुलाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. पण आठवत नाहीये. तो स्वतःशीच बोलत होता.
एव्हाना सूर्य अस्ताला गेला आणि अंधाराचे जाळे पसरू लागले. त्याला घरी जायची घाई होती. तरिही त्या मुलाला आठवायचा प्रयत्न करत तो काही क्षण तिथेच रेंगाळला. अचानक त्याला आठवलं, हा तोच मुलगा आहे ज्याच्यामूळे ती "रोझ क्वीन' झाली होती. एका क्षणात त्याचा सगळा उत्साह मावळला. तो तसाच घरी जायला निघाला. वाटेत त्याच्या मनात विचार आला, "का या मुलीबद्दल मी इतका विचार करतो? का मला तिला सतत बघावंसं, तिच्याशी बोलावंसं वाटतं? शेवटी सगळ्या मुली सारख्याच. वाटलं होतं ही वेगळी असेल पण नाही. शेवटी काय तो बड्या बापाचा बेटा, त्याच्या हातात हात देणारच ती. उगाचच आधी नखरे करायचे. सवयच असते या मुलींची."  त्याच्या मनात विचारांच वादळ उठलं होतं. कधी त्याला स्वतःचा तर कधी तिचा राग येत होता. त्याला काय होतंय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. हे सारं काय चाललय? त्याच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण हो होते. "मला का वाईट वाटतय पण?  मी का तिच्यासाठी इतका बेचैन होतो नेहमी?" मी तिच्या प्रेमाबिमात तर पडलो नाही ना?" या विचारासरशी त्याने करकचून गाडीचा ब्रेक दाबला आणि तसाच थांबला. तेव्हढ्यात मागून येणाऱ्या एका फोर व्हिलरच्या ड्रायव्हरचा आवाज त्याच्या कानावर पडला, अरे ए XXXX मरायच आहे काय रे XXXX? अशी वाटेत गाडी काय थांबवतोस? मी स्पीडला असतो तर तू वरती आणि मी तुरुंगात गेलो असतो XXXX." तो भानावर येतो आणि सॉरी म्हणून गाडी स्टार्ट करतो. आता मात्र तो मनाशी पक्क ठरवतो, घरी जाईपर्यंत कुठलाही विचार करायचा नाही.
       तो घरी पोचतो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेलेले होते. तो आवरुन कसेबसे चार घास पोटात ढकलतो आणि खूप दमल्याचं कारण सांगून कोणाशीच काहीही न बोलता आपल्या खोलीत जाऊन बसतो. खरंतर त्याला या क्षणाला रडावंस वाटत होतं. पुन्हा पुन्हा तिचाच विचार मनात येत होता. त्याचं त्यालाच कळत नव्हतं त्याला तिचा राग का येतोय? आपल्याला नक्की कशाच वाईट वाटतंय? खरंतर  जे त्याच्या मनाला जाणवत होतं ते त्याची बुद्धी मानायला तयार नव्हती. त्याची बुद्धी त्याला सांगत होती, "असं कधी घडतं का? तिला धड ओळखतही नसताना तिच्यावर प्रेम करणं कसं काय शक्य आहे? प्रेम नाही हे निव्वळ आकर्षण आहे." पण त्याच वेळी त्याचं मन त्याला सांगत असतं, "अरे हेच तर प्रेम आहे. उगाच का ओळख नसताना तिची हुरहूर लागते."
    तो काही वेळ सुन्न होऊन बसून रहातो.  थोड्यावेळाने मनाची घालमेल कमी होते. तो शांतपणे विचार करतो, "प्रेम असेल किंवा नसेल आता या गोष्टींना काहीच अर्थ नाही. तिच्या आयुष्याचा जोडीदार बहुदा तिने निवडला आहे. आता तिचा विचार न करणे हेच योग्य आहे." आजपासून तिचा विचार करायचा नाही, अस मनाशी पक्क ठरवून तो शांतपणे झोपायचा प्रयत्न करतो. 
   त्यानंतर त्याने स्वतःला पूर्णपणे कामामध्ये झोकून दिलं. खूप काम झाल्यावर थकलेल्या मनाला कधीकधी तिची आठवण क्षणभर आनंद देउन जात असे. पण दुसऱ्या क्षणाला ती मन बेचैन करत असे. मग ही बेचैनी दूर करण्यासाठी तो पुन्हा स्वतःला कामामध्ये झोकून देतो. या चक्रात अजून दोन वर्ष सरतात. कधीकधी येणारी तिची आठवण आता क्वचितच कधीतरी येवू लागते.  पण या साऱ्यामध्ये त्याला त्याच आयुष्य अगदीच निरस वाटू लागत. अशातच त्याच्या आयुष्यात एक आनंदाची घटना घडते. त्याचं प्रमोशन होतं. चांगल्या इन्क्रीमेंटसह चांगला बोनसही मिळतो. त्याला त्याच्या मेहनतीच फळ मिळतं. तो खूप खूष होतो. 
       दिवस असेच पुढे जात होते. मेहनतीच्या आणि हुशारीच्या जोरावर तो यशस्वी होत होता. दुचाकीसोबत चारचाकीही येते. इनव्हेस्ट्मेंट म्हणून एक टू बिएचकेही तो बूक करतो.  त्याच्या घरी हळूहळू त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होतात. पण तो त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो.  अशातच त्याचा मित्राच संकेतच लग्न ठरत आणि सगळ्या ग्रूपचं पुन्हा एकदा हॉटेल 'सी व्ह्यू' मध्ये एकत्र जमायच अस ठरतं;  संकेतच्या आयुष्याचा दुसरा टर्निंग पॉइन्ट एन्जॉय करण्यासाठी!
  दुसऱ्याच दिवशी संकेतचा फोन, "अरे यार जरा लवकरच जमुया. संध्याकाळी समुद्रकिनारी मस्त भटकूया. खूप दिवसात हिरवळ पण बघितली नाही, ती ही बघुया, काय कशी वाटते कल्पना?"
संध्याकाळी समुद्रकिनारी जायच्या नुसत्या कल्पनेनेही तो खूष झाला. पण स्वतःला सावरत तो संकेतला म्हणाला, "संकेत XXXX  लग्न ठरलय तुझं आता. हिरवळ कसली बघतोस?" त्याच्या या बोलण्यावर मात्र दोघेही खळखळून हसले. फोन ठेवल्यावर मात्र आपण संध्याकाळसाठी उगाचच 'हो' म्हटलं अस त्याला वाटू लागलं.
     "पुन्हा ती दिसणार, मग काही दिवस तिची आठवण आपल्याला छळणार. छे, या चक्रातून बाहेरच पडता येत नाहीये मला. कितीही ठरवलं तरी ती काही मनातून जात नाही. खरंतर एव्हाना लग्नसूद्धा झालं असेल तिचं... त्याच्याबरोबर!मी मात्र उगाचच वेड्यासारखा तिच्यासाठी  झुरतोय."
तो खूपच अस्वस्थ होतो. काही केल्या आज त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. एकीकडे कधी एकदा संध्याकाळ होतेय आणि समुद्रावर जातोय असं त्याला वाटत होतं तर दुसरीकडे तिच्या आठवणीत हरवून जायची किंवा आपण तिच्या प्रेमात पडलोय हे मान्य करायची त्याला भीती वाटत होती.       
      सध्याकाळी सगळे मित्र जवळपास दोन अडीच वर्षांनंतर  एकत्र जमले होते. सुरुवातीला थोडा वेळ कोणाचं काय आणि कसं चाललंय हे जाणून घेण्यात जातो.  मग हळूहळू एकमेकांच्या जुन्या 'क्रश'बद्दल चर्चा चालू होते आणि गप्पा, हास्यविनोद याला उधाण येतं. तो मात्र या साऱ्यामध्ये सामील असूनही नसल्यासारखा होता. त्याची नजर नकळतपणे तिलाच शोधत होती. सहज त्याची नजर किनाऱ्याकडे जाते आणि ती त्याला दिसते. वाळूत बसून समुद्राच्या लाटांमध्ये हरवून गेलेली. सुर्यास्ताच्या सुर्याची किरणे आणि लाटांचा लपंडाव बघणं जेव्हढ सुंदर वाटतं ना तेव्हढंच सुंदर तिला सूर्यास्त बघताना बघणं.  त्याच्या छातीत धडधडू लागलं. पण दुसऱ्याच क्षणात त्याच्या मनात विचार आला,  "ती नक्कीच त्या बड्या बापाच्या मुलाची वाट बघत असणार. त्याने तिचा विचार झटकायचा आणि मित्रांच्या गप्पात रंगण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला. कितीही नाही बघायचं ठरवलं तरी त्याची नजर अधूनमधून तिच्याकडे जात होती. हळूहळू सूर्य अस्ताला जात होता क्षणाक्षणाला बदलणारं त्याचं रुप अधिकच विलोभनीय दिसत होतं. बघता बघता अंधारुन आलं तरी ती मात्र तशीच शांत बसून होती. त्याच्या मनात विचार आला, "त्या बड्या बापाच्या मुलाने हिला फसवलं तर नसेल? हिचं ब्रेकअप तर झालं नसेल? का आज येतो सांगून तो आला नसेल? एक क्षण त्याला वाटलं सरळ जाऊन बोलावं तिच्याशी पण मग नंतर वाटलं तिला चालेल का असं मी तिच्याशी बोलायला गेलो तर? ती तर धड ओळखतही नाही मला? जाउदे तिच्या विचारात हरवून न जाणं हेच योग्य आहे.  तिचा विचार झटकायचा प्रयत्न करुन तो पुन्हा गप्पांमध्ये सामील होतो.
 "काय मग अमित तुझं काय? कोणी आवडली का नाही? का अजूनही तसाच आहेस?" संकेत
क्षणभर त्याला वाटलं संकेतला कळलं की काय तिच्याबद्दल? पण मग स्वतःला सावरत म्हणाला, "अरे यार मी पण तुझ्याच ग्रूपमधला आपण ॲरेंज्ड मॅरेजवाले आपल्याला नाही झेपणार ते क्रश, लव वगैरे काही." त्याच्या या बोलण्यावर सगळे खळखळून हसले.
  "बरं चला आता आपण जेवायला जाऊया आता साडेसात वाजत आले आहेत. उगाच पुढे उशीर होइल नाहीतर", संकेत.
"बरोबर रे नंतर तुला महत्वाचा फोन करायचा असेल त्यामुळे घाई असणारच रे", असं म्हणून सगळ्यांनी संकेतची चेष्टा सुरु केली.
   त्याची नजर पुन्हा ती बसलेली होती त्या ठिकाणी गेली. पण ती तिथे दिसत नाही.  "ओह शीट गेली वाटत ती", तो मनातल्या मनात म्हणत आणि काहीसा नाराज होतो.
       पार्टी आटपून घरी पोचायला त्याला काहिसा उशीरच झालेला होता. पण तरीही तो खूप फ्रेश होता.  खूप दिवसांनी मित्रांबरोबर घालवलेली संध्याकाळ आणि बराच वेळ दिसलेली 'ती' यामुळे तो चांगलाच सुखावला होता.  काही दिवस असेच सरले. तो पुन्हा रुटिनमध्ये बिझी झाला. संकेतच्या लग्नानंतर त्याच्या घरीही त्याच्या लग्नाचा विचार जोर धरु लागलेला होता. आई, आजी, काकू जोमाने या कामाला लागलेल्या होत्या.  तो मात्र या साऱ्यातून शक्य तितकं अलिप्त रहायचा प्रयत्न करत होता. त्याच्या घरी सगळ्यांना एकत्र कुटुंबात रहायला तयार असणारी मुलगीच सून म्हणून हवी होती. ओळखीतून, नात्यातून त्याला काही स्थळे सांगूनही येत होती पण काकू, आई, आजी हे टप्पे पार करण्यात यशस्वी न झाल्यामुळे ती स्थळे त्याच्यापर्यंत पोहचतच नव्हती. तो अलिप्त राहूनही हे सारं खूप एंजॉय करीत होता. सहज त्याच्या मनात आलं,  "तिचंच स्थळ आलं तर? या नुसत्या कल्पनेनेही तो मनोमन सुखावला. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात आलं असं होणं शक्य तरी आहे का? तिचं तर .......पण मग त्या दिवशी ती एकटी का बसली होती? त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरु झाला. तेवढ्यात लंचब्रेक झाल्यामुळे कलिग लंचसाठी बोलवायला आला. "चला काही क्षण तरी सुटलो तिच्या विचारातून", असं स्वतःशीच म्हणून तो लंचसाठी जायला निघाला. 
       संध्याकाळी घरी पोचला तेव्हा घरी उत्साहाचे वातावरण होतं.  हॉलमध्ये सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसून गप्पागोष्टी करत होते.
तो आल्याचं पाहून त्याची काकू लगबगीने पुढे आली आणि त्याला म्हणाली, "अमित लवकर फ्रेश हो तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे.
फ्रेश होऊन अमित हॉलमध्ये आला. सगळ्यांचा उत्साह बघून त्याने विचारलं, "काय स्पेशल काय आहे आज?"
"सगळंच स्पेशल आहे", आई हसून म्हणाली.
अमित गोंधळून गेला. त्याला असं गोंधळलेले बघून त्याचा काका म्हणाला, अरे आपल्या घरातल्या महिला मंडळाने एक मुलगी पसंत केलेय तुझ्यासाठी. चक्क एकमत झालंय त्यांचं. हा बघ फोटो मुलीचं नाव प्रेरणा देशमुख."
मुलीचं नाव ऐकून अमित दचकला आणि काकाच्या हातातला फोटो जवळपास ओढूनच घेतला.  अरे ही तर तिच आहे. आपण स्वप्नात तर नाही ना अस वाटून तो स्वतःलाच एक चिमटा काढून बघितला.
"काय रे मुलीच्या फोटोवरुन नजर हटत नाही वाटतं", काकूने हसून विचारलं.
यावर तो जरा ओशाळला आणि म्हणाला, "नाही काकू तसं नाही ...."
म्हणजे मुलगी पसंत नाही का?" काकाने मिश्किलपणे विचारलं.
"आवडली ना खूप आवडली."तो नकळतपणे अगदी सहज बोलून गेला आणि घरात चेष्टा मस्करीला उधाण आलं. 
       रात्री जेवण आटपल्यावर तो आपल्या रुममध्ये गेला. खरंतर आज त्याला खूप आनंद झालेला होता. सगळंच अनपेक्षित पण सुखद होतं. तरिही त्याच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती. नक्की काय चूकतंय? कुठे चुकतंय? त्याला काहीच कळत नव्हतं. पण कुठेतरी मन उदास होत होतं. सगळ्या गोष्टी तिला प्रत्यक्ष भेटूनच कळतील असा विचार करुन त्याने मनाची घालमेल थांबवण्याचा प्रयत्न केला. 
    सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी त्याने घरच्यांना सांगितलं, "कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी मला एकदा मुलीला प्रत्यक्ष भेटायचं आहे. तेव्हा प्लीज आत्ताच काही ठरवू नका."
तुझ्या मर्जीशिवाय लग्नाची बोलणी पुढे सरकणार नाहीत हा विश्वास घरच्यांनी दिल्यावर निश्चिंतपणे तो ऑफिसला निघून गेला. ऑफिसला पोचल्यावर कामाच्या गडबडीत तिचा विचार पुन्हा मागे पडला. दुपारी लंच टाईमच्या आधी त्याचा मोबाईल वाजला. लवकर कामे आटपून जेवायला जायच्या विचारात  असलेल्या त्याने काहिशा नाराजीनेच फोन घेतला. पलिकडून एका मुलीने गोड आवाजात विचारलं, "हॅलो मिस्टर अमित कुलकर्णी का?
तो: हो बोलतोय. 
ती: सॉरी आपण ओळखत नाही एकमेकांना. मी प्रेरणा देशमुख बोलतेय. ॲक्चुली तुमचं स्थळ सांगून आलंय माझ्यासाठी. बिझी नसाल तर दोन मिनिटे बोलू शकते का?
आता तर तो क्लिन बोल्ड झाला होता. हृदयाची धडधड वाढयला लागली होती. कसंबसं स्वतःला  सावरत तो म्हणाला- "हो बोला ना." 
ती: सॉरी डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला?
तो: नाही इट्स ओके. बोला तुम्ही 
ती: आपण भेटू शकतो का?
 तो: (स्वतःला चिमटा काढून स्वप्नात तर नाही ना याची खात्री करुन घेत) हो चालेल. कधी आणि कुठे भेटायचं?
ती: संध्याकाळी ६ वाजता हॉटेल 'सी व्ह्यू', चालेल?
तो: हो चालेल ना. अगदी माझ्या मनातल बोललीस सॉरी बोललात 
ती:  इट्स ओके.  चालेल अगं तुगं केलंत तरी.
तो: थॅंक्यू.
ती: ठेवू मग मी फोन. संध्याकाळी भेटूच 
तो:  ओके बाय. 
खरंतर त्याला फोन ठेवू नकोस असं म्हणावंसं वाटत होतं पण त्याने धावणाऱ्या मनाला तिथेच थांबवलं. तिचं स्थळ येणं, तिचा फोन येणं या साऱ्या गोष्टी त्याच्यासाठीच जेवढ्या अनपेक्षित होत्या तेव्हढ्याच आनंददायी. आज संध्याकाळी तिला भेटायला जायच; ज्या 'सी व्ह्यू' हॉटेलमधून तिला बघत बसायचो त्याच सी व्ह्यू हॉटेलमध्ये आज तिच्यासमोर बसायच या कल्पनेने तो खूश झाला होता. पण अचानक मनात विचार आला, "कशासाठी बोलावलं असेल तिने? तूम्ही मला नकार द्या असं तर सांगणार नाही? जाऊदे आता काहीही झालं तरी दुसरा कुठलाही विचार न करता आलेला क्षण एन्जॉय करायचा. कुठल्याही कारणाने का असेना तिने आपणहून फोन करून भेटायला बोलावलं आहे आणि ते ही हॉटेल 'सी व्ह्यू'मध्ये! आता फक्त तिचा विचार करायचा असं मनाला दटावून तो चक्क हाफ डे घेऊन घरी गेला. जाता जाता संध्याकाळच्या भेटीसाठी नवा शर्ट खरेदी केला. तिच्यासाठी काहीतरी खरेदी करायच्या विचारात असतानाच त्याला 'रोझ डे' च्या दिवशीची ती आठवली त्यामुळे तो तिच्यासाठी फक्त एक कॅडबरी विकत घेतो. अगदीच तिने नाही घेतली तर निदान आपण ती खाऊ तरी शकतो हा सूज्ञ विचार करून! त्याच्या घरापासून समुद्रावर जायला अवघा १५ ते २० मिनिटांचा रस्ता. पण उगाच ट्रॅफिकमूळे उशीर नको म्हणून तो सव्वापाचलाच घरातून निघाला. 
      तो समुद्रावर पोहचतो तेव्हा साडेपाच झाले होते. सुर्याची किरणे शांतपणे लाटांवर विसावलेली होती. संध्याकाळ व्हायला अजून थोडा वेळ होता. सुट्टीचे दिवस नसल्यामुळे फारशी गर्दीही नव्हती. त्याने विचार केला, "हॉटेलमध्ये बसून सुर्यास्त बघण्यापेक्षा वाळूत किंवा एखाद्या खडकावर बसून तो अनुभवावा. जर सगळं ठिक असेल तर सुर्यास्ताच्या साक्षीनेच तिला आपल्या प्रेमाची कबुली द्यावी."
त्याने तिला मेसेज केला, आपण हॉटेलमध्ये न बसता किनाऱ्यावरच्या वाळूत बसून बोलूया का? दुसऱ्या मिनिटाला तिने रिप्लाय केलं. "Ok Thanks. मला पण हेच वाटत होतं.१० मिनिटांत पोचते."
खरोखरच १० व्या मिनिटाला ती तिथे हजर होती. त्याच्याशेजारी बसता बसता ती म्हणाली, "फारच लवकर आलास तू.”
उत्तरादाखल तो फक्त हसला. ती बाजूला बसलेय, हे स्वप्नही त्याने कधी पाहिलेलं नव्हतं पण आज प्रत्यक्षात ती बाजूला बसलेली बघून त्याच्या छातीतली धडधड अजूनच वाढली. काही क्षण तसेच जातात. ती लाटांकडे आणि पाण्यात बुडणाऱ्या सुर्याकडे बघत शांत बसली आणि तो तिला बघत सूर्यास्त अनुभवत होता.
अचानक तिची नजर त्याच्याकडे  जाते. चोरी पकडल्यासारखी त्याची अवस्था होते. काहीतरी बोलायचं म्हणून तो उगाचच विचारतो, " तुला खूप आवडतं का सुर्यास्त बघायला?"
ती गोड हसून म्हणते, "सॉरी मी हरवून गेले या सुर्यास्ताच्या देखाव्यामध्ये. जगातील सर्वात सुंदर गोष्ट कुठली असेल, तर ती समुद्रात बुडणारा सुर्य पहाणे. बरं झालं तू इथे वाळूत बसूया म्हणालास. मी दर बुधवारी संध्याकाळी येते इथे आणि काय योगायोग बघ आजही बुधवारच आहे".
काही क्षण पुन्हा शांततेत गेले. मग हिम्मत करुन त्याने विचारलं, तुझ्या आयुष्यात कोणी आहे का?"
तिने काहीसं आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं.
"तू रागवू नकोस पण मला वाटतं की आपण एकमेकांपासून काहीही लपवू नये. तुझा भूतकाळ माझ्यासाठी महत्त्वाचा नाहिये पण मला माहिती असावा एवढीच माझी अपेक्षा आहे”, तो.
ती: नाही रागावले नाही मी. तुझं म्हणणंही पटतंय. मी आज त्यासाठीच तुला भेटायचं ठरवलं होतं. तुला जे काही सांगावंसं किंवा विचारावंसं वाटतंय त्याबद्दल तू मोकळेपणाने बोल.
तो: मी ओळखतो तुला आधीपासून. GS कॉलेजची रोझ क्वीन झाली होतीस ना तेव्हापासून! त्या वेळी मी MBA च्या फायनल इअरला होतो.  त्या दिवशीनंतर तू दोन तीन वेळा समुद्रावरही दिसलीस. कधी लहान मुलांना फुगे आणि चॉकलेट्स वाटताना, कधी एकटीच बसून सुर्यास्त बघताना तर कधी ..... (बोलता बोलता तो तसाच थांबतो.)
ती:  तर कधी? काय बोलना....... थांबलास का?
तो: नाही काही नाही.
ती: तर कधी एका मुलाबरोबर right? 
तो: (काही क्षण गप्प राहून) हो बरोबर! तो तोच मुलगा होता ज्याच्यामूळे तू 'रोझ क्वीन' झाली होतीस आणि त्याला तू झापलंही होतस.  
ती: (मंद हसून) हो तोच होता तो. मंदार! त्याला खूप झापलं होतं मी. पण त्याचा इतका मोठा परिणाम त्याच्यावर होइल असं मला वाटलं नव्हतं तेव्हा. 
तो: म्हणजे?
ती: त्या दिवशीनंतर मंदार एकदम बदलला. त्या दिवशी मी सगळ्यांसमोर त्याला झापल्यामूळे तो माझ्यावर खूप चिडला होता. रागारागानेच तो कॉलेजमधून बाईक घेवून निघाला. डोक्यात राग घालून गाडी चालवत होता त्यामुळे सहाजिकच गाडी स्पीडमध्ये होती. त्यातच त्याने सिग्नल तोडला आणि त्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं. पोलिसांना काहिशी उर्मट उत्तरे दिल्यामुळे त्यांनी त्याला तिथेच उन्हात ताटकळत उभं ठेवलं. त्याचवेळेस त्याने पहिल्यांदा अनुभवलं ते सिग्नलला छोट्या वस्तू, खेळणी,  फुले विकणाऱ्या मुलांचं, तिथे भीक मागणाऱ्या मुलांच दु:ख. त्याच्या मनाला कुठेतरी माझं म्हणणं बरोबर वाटू लागलं होतं. त्या दिवसानंतर तो अंतर्मुख झाला. विचार करु लागला. स्वत:च्या श्रीमंतीचा माज हळूहळू उतरु लागला. त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर त्याने स्वतःहून माझी माफी मागितली आणि आमच्या NGO साठी काम करायची इच्छ व्यक्त केली. मला त्याच्यातला बदल जाणवला आणि मी त्याला आमच्या संस्थेत घेऊन गेले.  त्यानंतर आमची छान मैत्री झाली. पूर्वी बुधवारी मी एकटीच यायचे पण नंतर तो ही अधूनमधून येऊ लागला.
तो: त्याचं प्रेम होतं तुझ्यावर? 
ती: हो. आमच्यात खूप छान मैत्री निर्माण झाली होती.  तो मला नेहमी म्हणायचा, "तू मला माणूस म्हणून जगायला शिकवलंस."  अशाच एका संध्याकाळी त्याने मला प्रपोज केल. तेव्हा तो म्हणाला, "आधी मला फक्त तुझा चेहरा आवडला होता पण आता मी त्या चेहऱ्यामागच्या खऱ्या प्रेरणावर प्रेम करु लागलोय. तू नाही म्हणालीस तरी हरकत नाही कारण आता मला प्रेमाचा खरा अर्थ कळला आहे. तुझ्या होकाराने किंवा नकाराने मला काहीच फरक पडणार नाही 
तो: तुझं प्रेम होत त्याच्यावर?
ती: माहिती नाही. 
तो: म्हणजे? नक्की काय म्हणायचं आहे तुला? तुझं हे उत्तर पूर्णपणे अनपेक्षित आहे माझ्यासाठी.
ती: मला कळतंय की आत्ता या क्षणाला तुला माझ्याबद्दल काय वाटत असेल ते. पण प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न कर.
तो: कसं आणि काय समजून घेऊ मी? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 'हो' किंवा ‘नाही' एवढंच असू शकतं. निदान मला तरी तेच अपेक्षित होतं. 
ती: हो बरोबर आहे तुझं. पण मी खरंच सांगतेय मला नाही माहिती आमच्यात नक्की काय होतं. पण जे होतं ते नक्कीच मैत्रीच्या पुढे काहीतरी होतं. त्याने प्रपोज केलं त्या दिवशी माझ्या मनात त्याच्याबद्दल मैत्री व्यतिरिक्त कुठल्याच भावना नव्हत्या. त्यानंतरही आम्ही पूर्वीसारखच भेटत होतं. अगदीच दर बुधवारी संध्याकाळी नाही पण शक्य असेल तेव्हा तो माझ्याबरोबर समुद्रकिनारी यायचा. इथे आल्यावर संस्थेचा विषय काढायचा नाही असा एक अलिखित करार झाला होता आमच्यामध्ये. इथे फक्त काही क्षण स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलायचो आम्ही. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी त्याची आई आली होती मला भेटायला. त्यांच्याशी बोलल्यावर तो पूर्वी जसा होता तसा का होता हे कळल. श्रीमंतीच प्रदर्शन, पैशाची मगरुरी सारं काही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. त्यांना किंबहुना मंदारच्या घरच्या कोणालाही त्याचं NGO मध्ये काम करणं पसंत नव्हतं. त्याने आपलं शिक्षण पूर्ण करुन घरचा बिझनेस सांभाळावा हीच त्यांची अपेक्षा होती. अर्थात त्यात काही चूकही नव्हतं. तो कोल्हापूरचा. त्याचे आजोबा म्हणजे कोल्हापूरातील एक बड प्रस्थ. हजारो एकरांमध्ये शेती, प्रिंटिंग प्रेस, साखर कारखाना एक ना अनेक. त्यांनी मला स्पष्टच सांगितलं, " तुमच्या सस्थेला जमेल तेवढी आर्थिक मदत आम्ही देऊ पण आमचा मुलगा नाही देवू शकत. तुझ्यामुळेच तो या नको त्या गोष्टीत अडकला आता तूच यातून त्याला बाहेर काढ”.
     त्याची आई मला येऊन भेटून गेल्याचं कळल्यावर मात्र तो खूप चिडला होता. त्यानंतर आम्ही जेव्हा इथे भेटलो तेव्हा त्याने त्याच्या घरातल्या त्याला न पटणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्या दिवशी 'बडा घर पोकळ वासा' या म्हणीचा खरा अर्थ मला समजला. तो खूपच भावूक झाला होता. खूप रडला तेव्हा आणि माझा हात हातात घेऊन म्हणाला, "तुझ्यामुळे मला जगण्याचा खरा अर्थ कळलाय आता मला पुन्हा त्या नरकात जायची इच्छा नाही. आपल्या संस्थेत काम करुन मला खूप समाधान मिळतंय. मी माझं आयुष्य फक्त संस्थेसाठीच द्यायचं ठरवलं आहे.  त्यानंतर आम्ही फारच कमी वेळा भेटलो.  जवळपास दोन महिन्यानंतर त्याने मला सांगितलं की त्याने वैशालीशी लग्न करायच ठरवलं आहे. त्याच्या या निर्णयाचं मला खूप आश्चर्य वाटलं. त्याला कारणही तसंच होतं.  वैशाली आमच्याच संस्थेत काम करते. उत्तम पगार असलेली नोकरी सोडून तिने तिचं आयुष्य संस्थेला वाहायचं ठरवलं होतं. 
तो: मग त्यामध्ये काय वावगं आहे? मंदारनेही तसंच ठरवलं होतं ना?
ती: दोन वर्षांपूर्वी वैशालीवर बलात्कार झाला होता आणि त्या घटनेमध्येच तिने दुर्दैवाने आपल मातृत्वही गमावलं. ती कधीही आई होऊ शकत नाही.
तो: काय?
ती: हो. मी मंदारला या निर्णयापासून थांबवायचा खूप प्रयत्न केला पण त्याने माझं ऐकलं नाही. त्याने मला सांगितल, "आता तू जरी हो म्हणालीस ना तरीही मी माझा निर्णय बदलणार नाही. तुला काय माझ्यासारखा किंबहुना माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला जोडीदार मिळेल पण वैशालीच काय? कोण स्विकारणार तिला अशा परिस्थितीत? माझं तुझ्यावर प्रेम होतं, आजही आहे आणि कायम राहील. वैशालीलाही मी तुझ्याबद्दल सारं काही सांगितलं आहे.  आपल्यातली मैत्री अशीच कायम राहिल. पण आता काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. पूर्ण विचार करुन निर्णय घेतलाय मी. काळजी नको करुस."  त्या दिवशी पहिल्यांदा हातून काहीतरी निसटत तर नाही ना? असं वाटत होत मला. कळतच नव्हतं नक्की काय चुकतंय? मला तो खरंच आवडत होता, का त्याच्या मनाच्या मोठेपणामूळे भारावून गेल्यामूळे असं होतय? त्यानंतर महिन्याभरातच मंदार आणि वैशाली लग्न करुन संस्थेच्या एका प्रोजेक्टसाठी नागालँडला निघून गेले. ते निघून गेल्यावर अनेकदा एकटेपणात मी विचार केला. पण तू विचारलेल्या प्रश्नाच खरं उत्तर मला कधीच मिळालं नाही. आज पहिल्यांदाच मी माझ्या मनाची घालमेल कोणाजवळतरी बोलून दाखवतेय. प्लीज तू गैरसमज नको करुन घेऊस."
       काही क्षण शांततेत जातात. कोणीच काही बोलत नाही. तिने सांगितलेलं सारं ऐकून त्याला मंदारबद्दल चूकीचा विचार केल्याचा पश्चात्ताप होतो. तिने 'हो' म्हणावंसं त्याला मनापासून वाटत होतं. तिच्या नकारासाठीही त्याने मनाची तयारी केली होती. पण हे असलं काही समोर येइल ही त्याने अपेक्षाच केलेली नव्हती. पण काहीही न लपवता तिने सगळं खरं सांगितलंच आहे, तर आपणही सगळं खरं सांगावं असा विचार करुन त्याने तिला विचारलं, "तू रागावणार नसशील, तर मी एक गोष्ट सांगू?"
तिने मान हलवून होकार दिला.
 "मी तुला आधीपासूनच ओळखत होतो हे तर मी तुला सांगितलंच आहे पण त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं तर तू मला आवडायचीस, तुला बघण्यासाठी अनेकदा मी या समुद्रकिनारी यायचो. त्या दिवशी तुला मंदारबरोबर बघून मी खूपच अपसेट झालो होतो. पण तरीही तुझ्या ओढीने मी इथे यायचो. तुझ्यामुळेच इथला सुर्यास्त आवडायला लागला मला. अनेकदा वाटायचं तुझ्याशी बोलावं पण कधी हिम्मतच झाली नाही. तुझं स्थळ मला सांगून आलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण कुठेतरी काहीतरी चुकतंय असं सारखं वाटत होतं. पण काय ते मात्र कळत नव्हतं. तुला भेटून तुझ्याशी बोलायचं मी ही ठरवलं होतं. पण त्याआधीच तुझा फोन आला. मी सुद्धा तुझ्यासारखंच एका प्रश्नाच उत्तर शोधतोय; 'तू मला फक्त आवडतेस का मी प्रेमही करतो तुझ्यावर? खूप प्रयत्न करुनही या प्रश्नाच उत्तर मला मिळाल नाही."  
    काही क्षण पुन्हा शांततेत गेल्यावर कोणीच काही बोललं नाही.  खरंतर काय बोलायचं हे कोणालाच सुचत नाही. अखेर त्याने न राहवून तिला विचारलं,"तू रागावलीस का माझ्यावर?"
ती: नाही रे खरं सांगू मी सांगितलेल जसं तुझ्यासाठी अनपेक्षित आहे तसंच तू सांगितलेलं माझ्यासाठीही अनपेक्षित आहे.
तो: तू मला इथे भेटायला का बोलावलंस?
ती: म्हणजे?मला कळल नाही तुला काय म्हणायचं आहे?
तो: तू आत्ता मला जे काही सांगितलंस ते फक्त मलाच का सांगितलंस? तुला स्थळ म्हणून मी आवडलो होतो का?  
   त्याच्या या प्रश्नावर मात्र ती जराशी लाजली.  तिला असं लाजलेलं बघून तो म्हणाला,  "तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल की नाही मला माहिती नाही. पण मला मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर आज इथेच मिळालंय. खूप आवडतेस तू मला आणि मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुला तुझ्या प्रश्नासकट स्विकारायला तयार आहे मी. लग्न करशील माझ्याशी?"
 त्याच्या या प्रश्नावर ती लाजली. तिच्या छातीत अनामिक धडधड सुरु झाली ती स्वतःला सावरत म्हणाली, "स्थळ म्हणून खरंच चांगलं होतं तुझं स्थळ पण तू ही खूप चांगला आहेस. कदाचित मलाही माझ्या प्रश्नाच उत्तर मिळालंय, तू प्रपोज केल्यावर माझ्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या तशा भावना माझ्या मनात मंदारबरोबर असताना कधीच निर्माण झाल्या नव्हत्या. आज अजून एक गोष्ट कबूल करते तुझ्यासमोर 'कॉलेजमध्ये असताना तू खूप आवडायचास मला अनेकदा लायब्ररीमध्ये आपली नजरानजरही व्हायची. पण नंतर तुझ कॉलेज संपल आणि तू निघून गेलास. उगाच मृगजळामागे धावायला नको म्हणून मग मी सुद्धा सगळं विसरायचं ठरवलं. 
"काय? तू खरं सांगतेयस का? त्याने आनंदमिश्रित आश्चर्याने विचारलं.
तिने मानेनेच होकार दिला आणि ओंजळीत आपला चेहरा झाकून घेतला.  सुर्यास्ताच्या साक्षीने दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ रहायचं वचन एकमेकांना दिलं. त्यांना एकत्र बघून सूर्यही समाधानाने लाटामध्ये बुडून गेला. 
समाप्त.
©मानसी जोशी 









Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...