#टेकडी
मुसळधार पाऊस बरसत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या निर्जन निवांत टेकडीवर निकिता एकटीच बसून होती. आत्ता या क्षणाला निकिताच्या डोळ्यातून बरसणारा पाऊस बाहेरच्या पावसाशी जणू स्पर्धाच करत होता. तिला आठवत होतं; अगदी याच ठिकाणी अशाच मुसळधार पडणाऱ्या पावसात ती आणि आदित्य या टेकडीवर आले होते. याच ठिकाणी तिला उमलत्या वयातील प्रेमाचा खरा अर्थ कळला होता. त्या पहिल्या प्रेमाच्या हळूवार स्पर्शाने आकाशातल्या विजेसारखी तिच्या शरीरातही वीज सळसळली होती. तिच्या मनात आलं सगळं अगदी तसच आहे पण बदलल आहे ते फक्त तिचं आयुष्य.
*********--
आदित्य म्हणजे तिचा आदि आणि पेंढारकर घराण्यातल शेंडेफळ. पेंढारकर घराण म्हणजे मोठ प्रतिष्ठीत घराणं. आदित्यचे आजोबा विष्णुशास्त्री पेंढारकर म्हणजे विद्वान पंडितच जणू. भगवद्गीता, वेद आणि एकूणच धार्मिक ग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांची स्वतःची वेदशाळा, गोशाळा आणि एक देउळ होते. सद्ध्या त्यांचा हा सारा पसारा आदित्यचे वडील आणि मोठा भाऊ सांभाळत होते .पुढे जाऊन आदित्यने हे सारं सांभाळावं अशी त्याच्या आजोबांची इच्छा होती पण जबरदस्ती मात्र नव्हती. आदित्य मात्र एकदम वेगळा. प्रचंड हुशार पण तितकाच शांत. मनातल पटकन कोणाशीही न बोलणारा. त्याला या साऱ्यामध्ये अजिबात रस नव्हता. नुकताच तो CA झाला होता आणि एका फर्ममध्ये नोकरी करत होता. त्याच्या आजोबांचा मात्र त्याचा प्रचंड जीव होता. त्यामुळे घरातले अनेक नियम त्याच्यासाठी शिथिल करण्यात आले होते. चला निदान त्याच्या या करिअरची आपल्या कामात काहीतरी मदत होइल म्हणून त्याच्या घरचेही खुश होते.
निकिता तशी साधी सरळ मुलगी. नुकतीच तिच्या वडिलांची बदली या नवीन शहरात झाली होती. ग्रॅज्युएट झालेल्या निकिताने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी L.LB साठी ॲडमिशन घेतली. आदित्यच्या CA फर्म च्या बरोबर समोर तिचं कॉलेज होतं. दोघांचा जायचा यायचा रस्ताही एकच होता. सुरुवातीला आदित्य बाईक घेऊनच ऑफिसला जायचा पण जेव्हापासून निकिताशी नजरानजर झाली तेव्हापासून बरेचदा तो निव्वळ तिला बघण्यासाठी म्हणून बसने जायचा. निकिताची नजरही नकळतपणे त्यालाच शोधत असायची अशा नजरानजरीच्या खेळातच सहा महिने सरले. अखेर आदित्यने हिम्मत करुन तिच्याशी बोलायचे ठरवले. पण कधी, काय, कसं असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले. पण त्या दिवशी तशी संधी त्याला मिळाली. डिसेंबरचे दिवस होते. निकिताच्या कॉलेजमध्ये 'डेज' चालू होते. त्या दिवशी 'सारी डे' होता. साडी नेसून नटून तयार होवून निकिता बस स्टॉपवर आली होती. तिची आणि आदित्यची नजरानजर झाली. तिच हे सोज्वळ सौंदर्य बघून आदित्य तिच्याकडे बघतच बसला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरुन हटतच नव्हती. तेवढ्यात बस आली. साडी सावरत निकिताला बसमध्ये चढता येइना. आदित्यने मात्र पटकन बसमध्ये चढून तिच्यासाठी जागा ठेवली आणि मग इतके दिवस न झालेला संवाद सुरु झाला. हळूहळू बसमधल्या भेटीगाठी वाढत गेल्या छान मैत्री झाली. अहो जाओ करता करता ती दोघं एकमेकांची आदी आणि निक्की कधी झाले ते त्यांच त्यांना पण कळल नाही. असेच अजून काही दिवस सरले. दोघांनाही एकमेकांच्या मनात असणारं प्रेम जाणवत होतं पण बोलत मात्र कोणीच नव्हतं. पण न बोलताही नजरेच्या भाषेतून दोघं खूप काही बोलत होती. पण त्यांच्या या भावना मात्र मुसळधार पावसाच्या साक्षीनेच व्यक्त होणार होत्या. मे महिन्याचे दिवस संपत आले होते. कॉलेजच्या सुट्ट्या चालू होत्या. त्यामुळे दोघांचे फक्त फोनवरच बोलणं होत होतं. पण त्या दिवशी आदित्यने निकिताला समुद्रावर भेटायला बोलावले होते. बस आणि बसस्टॉप सोडून आज ती दोघं प्रथमच बाहेर भेटणार होते. दुपारनंतर आकाशात पावसाळी ढग जमा झाले होते.ते बघून निकिता उदास झाली होती. अशा वातावरणात घरातून बाहेर पाठवणं थोडं कठीणच होतं. पण पावसाने जणू तिचं ऐकलं आणि तो त्यांच्या भेटिपर्यंत बरसायचा थांबला.
निकिता समुद्रावर पोचली तेव्हा आदित्य तिची वाटच बघत होता. तिला बघून त्याचा चेहरा खुलला. आज जवळपास महिनाभरानंतर तो तिला बघत होता. दोघांच्यामध्ये जुजबी बोलणं झालं आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु झाल्यावर निकिता गडबडीने आडोसा शोधायला धावणार तोच आदित्यने तिचा हात धरुन तिला थांबवलं आणि म्हणाला, "पहिल्या पावसात भिजायच असतं. मला आवडतं भिजायला तुला आवडेल ?" निकिताच्या छातीत अनामिक धडधड सुरु झाली काय बोलावं तिला काहीच कळत नव्हतं. ती तशीच शांत उभी राहिली. मुसळधार पाऊस सुरु झाला होता. अजूनही तिचा हात आदित्यच्या हातात होता. ना तिने तो सोडवून घ्यायचा प्रयत्न केला ना त्याने तो सोडला. "अशा मुसळधार पावसात बाईक घेउन शहराबाहेरच्या निर्जन टेकडीवर जायला; तिथे उभं राहून पाऊस बघायला तसही आवडतं मला; पण तू जर बरोबर असशील तर अजून आवडेल; येशील माझ्याबरोबर?" आदित्यने विचारलं. निकिताने उत्तरादेखल फक्त मान हलवली.
"बघ हा ती टेकडी तशी एरवीही निर्जन असते आज तर अशा पावसात कोणी फिरकणार पण नाही तिथे. येशील अशा ठिकाणी माझ्याबरोबर एकटीने? एवढा विश्वास आहे माझ्यावर?" आदित्यने पुन्हा विचारलं.
या वेळी मात्र निकिता हसून म्हणाली, "हो येइन. खूप विश्वास आहे माझा तुझ्यावर; स्वतःपेक्षाही जास्त!"
तिच्या या उत्तराने आदित्य खूष झाला. दोघजणं बाईकवरुन टेकडीवर गेली. तिथून पाऊस बघताना; पावसात भिजताना निकिता अगदी हरखून गेली होती. तेवढ्यात आदित्य तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेउन तिला म्हणाला, "I love you Nikita. Will you marry me?"
हे ऐकून निकिता काही क्षण तशीच शांत उभी राहिली. सळसळणाऱ्या विजेसारखी तिच्या अंगातूनही विज सळसळत गेली. तिच्या नजरेने त्याला होकार दिला पण हा होकार त्याला तिच्या शब्दांमधून ऐकायचा होता. "सांग ना तू करतेस प्रेम माझ्यावर?" आदित्यने पुन्हा विचारल. "Yes I love you very much Aditya". आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे", असं म्हणून निकिता त्याच्या मिठीत शिरली.
त्यानंतर मात्र सगळी चक्र वेगाने फिरली. सुदैवाने दोघांचीही पत्रिका अगदी छान जुळली. आदित्यच्या घरी सुंदर संस्कारी निकिता चटकन पसंत पडली. निकिताच्या घरी तर सगळे खूपच आनंदात होते. साक्षात विष्णुशास्त्री पेंढारकरांच्या घराशी नातं जोडलं जाणार म्हटल्यावर निकिताचे आई बाबा एकदम आनंदीत झाले होते. पण या सगळ्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे लग्न ठरलच आहे तर जवळचाच मुहूर्त बघून ते उरकून टाकावं असा आग्रह आदित्यच्या घरच्यांनी धरला. आदित्यच्या आजोबांची म्हणजेच विष्णुशास्त्रींची तब्येत आजकाल फारशी ठिक नसते त्यामुळे लवकरात लवकर विवाह उरकून घेणच योग्य या मतावर ती मंडळी ठाम होती. पण निकिताला मात्र L. LB कंप्लीट करुनच लग्न कराव असं वाटत होतं. तस पाहिलं तर आदित्यच्या घरच्यांना तिने लग्नानंतर शिक्षण चालू ठेवणं चालणार होतं पण एकूणच त्या घरातलं सोवळं ओवळं, धार्मिक वातावरण या सगळ्यात आपलं कॉलेज आणि अभ्यास हे सारं कसं जमणार हा प्रश्न निकितासमोर होता. अखेर आदित्यने समजूत काढल्यावर हो नाही करत निकिता लग्नासाठी तयार झाली. डिसेंबर महिन्यात लग्नाचा मुहूर्त निघाला. आदित्य आणि निकिता स्वप्नांच्या दुनियेतच वावरत होते. पण कोणाला माहिती होतं नियतीच्या मनात काय आहे? त्या दिवशी लग्नाच्या खरेदीसाठी म्हणून आदित्यच्या कुटुंबासोबत गेलेली निकिता परत आलीच नाही. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. पोलिस कंप्लेंट करण्यात आली. चौकशीचा ससेमिरा दोन्ही कुटुंबांच्या मागे लागला. घरी पोलिसांचा होणारा वावर त्यांची उलटसुलट प्रश्नोत्तरे या साऱ्यामूळे वयोपरत्वे आधीच आजारी असणाऱ्या विष्णुशास्त्रींनी अथरुण धरले. आदिची अवस्था तर बघवत नव्हती. काय झालं निकिताचं? कुठे गेली असेल ? काही बरं वाईट तर झालं नसेल या विचारांनी दोन्ही घरचे कुटुंबीय खूपच घाबरले होते. अगदी तिच्या वर्णनाशी मिळतीजुळती डेडबॉडी बघण्याचीही वेळ त्यांच्यावर आली होती. बघता बघता महिना होत आला पण निकिताचा मात्र काहीच पत्ता लागत नव्हता.
****
त्या दिवशी ॲडव्होकेट रमाचा मोबाईल मध्यरात्रीच वाजत होता. झोपेतून उठून तिने जरा वैतागूनच मोबाईल बघितला तर फोन इन्स्पेक्टर आकाशचा होता. इन्स्पेक्टर आकाश म्हणजे रमाचा भाचा तिच्या मोठ्या बहिणीचा मुलगा. आकाशचा फोन बघून तिला जरा आश्चर्यच वाटलं. तिने पटकन फोन रिसिव्ड केला. आणि काही मिनिटातच फोन ठेवून ती पोलिस स्टेशनला जायला निघाली.
ॲडाव्होकेट रमा पोलिस स्टेशनवर पोचली तेव्हा ऐन मध्यरात्रीही पोलिस स्टेशनमध्ये प्रचंड गडबड चालली होती. अर्थात त्याला कारणही तसच होतं; सिनिअर इनस्पेक्टर विजय पाटील यांचा रेड लाईट एरियामध्ये त्यांच्याच रिव्हॉल्वरने गोळ्या घालून खून करण्यात आला होता. खून करणाऱ्या मुलीला अटक करण्यात आली होती. तातडीने सगळी सुत्र हलून केस इनस्पेक्टर आकाशकडे सोपविण्यात आली होती. पोलिस स्टेशनबाहेर प्रेस, मीडियाची गर्दी झाली होती. या गर्दीतून कशीबशी वाट काढत रमा आकाशच्या टेबलापर्यंत गेली. ॲडव्होकेट रमाला पोलिस स्टेशनला आलेलं पाहून बाहेर वेगवेगळ्या तर्क वितर्काना उत आला होता. बाहेरची गर्दी आटोक्यात आणता आणता पोलिसांची दमछाक होत होती.
"बोला मिस्टर आकाश काय प्रॉब्लेम आहे ?" आकाशच्या टेबलापाशी जाऊन रमाने खड्या आवाजात विचारले.
तिला आलेलं बघून आकाश विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. "अरे,मावशी तू आलीस पण; सॉरी ॲडव्होकेट रमा आल्यात पण तुम्ही." आकाश म्हणाला.
"मुद्द्याचं बोल काय झालय? अर्धवट झोपेतून उठून यायला लावलस म्हणजे नक्कीच सिरियस असणार."- रमा
"बस सांगतो सगळं सविस्तर", असं म्हणून आकाशने बोलायला सुरुवात केली.
"रात्री साधारणपणे १२/ १२. ३० च्या सुमारास मला कॉल आला इंस्पेक्टर विजय पाटील यांचा रेड लाईट एरियामध्ये तिथल्याच एका वेश्येने खून केला तो ही त्यांच्याच रिव्हॉल्वरने. आम्ही लगेच तातडीने तिथे पोचलो. ती मुलगी खूप विचित्र वागत होती. हातात रिवॉल्वर होतं डोळे आग ओकत होते. लेडी इंस्पेक्टरने मागितल्यावर मात्र तिने रिव्हॉल्वर लगेच त्यांच्या हातात दिलं आम्ही तिला अटक केल्यापासून ती एक शब्दही बोलत नाहीये. शांतपणे तशीच बसून आहे. चौकशीअंती कळलं इंस्पेक्टर पाटील तिथे रेड टाकण्यासाठी गेले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर फक्त एक हवालदार होता आणि तो ही झाल्या प्रकाराने भेदरलेला वाटत होता. त्याने सांगितलेली कुठलीही गोष्ट मनाला पटत नाहीये."
"बरं मग मी काय करणार यामध्ये हे सगळं तू तुमच्या सरकारी वकिलांशी बोल ना. मला कशासाठी बोलवल आहेस ?" रमाने विचारलं.
"सांगतो; तू त्या मुलीची केस घ्यावीस असं मला वाटतं", आकाश मूळ मुद्द्यावर आला.
"What ? Are you mad ? १८ वर्षे प्रॅक्टिस करतेय मी पण कुठल्याही गुन्हेगाराची केस कधी घेतली नाही आजपर्यंत. आणि तू मला म्हणतोयस तिची केस घेऊ?" रमा चिडून म्हणाली.
"ऐकून तर घे पूर्ण. मान्य आहे मला ती खूनी आहे तसे प्रत्यक्षदर्शी पुरावेही आहेत. पण मन मानायला तयार होत नाहीये. काहीतरी गडबड नक्की आहे. तिचं शांत बसून रहाणं, तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि मुख्य म्हणजे तिची नजर असं वाटतं खूप काही साचलय तिच्या मनात”. आकाश.
"पोरगी सुंदर आहे का रे ? अगदी नजर, मन वगैरे भाषा करतोयस. रमाने हसत विचारलं.
"ओह कमॉन मावशी. मी सिरिअसली सांगतोय. अगं एकदा तिला भेटून तिच्याशी बोलायचा प्रयत्न तर कर. मला खात्री आहे तू तिला बोलतं करु शकशील. नसेल घ्यायची तिची केस तर नको घेऊस. पण निदान ते तिच्याशी बोलून मग काय करायचं ते ठरव ना. तसही तुमच्या कायद्यानुसार, 'हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नाही' बरोबर ना?" आकाश.
"अरे वा ! मेरी बिल्ली और मुझेही म्याव. ठिक आहे चल भेटते तिला. बरं झालं हा आकाश तू इंस्पेक्टर झालास. वकील झाला असतास तर माझी प्रॅक्टिस बंद पडली असती", रमा हसत म्हणाली.
****
त्या दिवशी कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी होती मिडिया, प्रेस, सामाजिक संस्था साऱ्यांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं ते म्हणजे ॲडव्होकेट रमा यांनी एका रेड लाईट एरियातील गुन्हेगार मुलीची केस कशी काय घेतली. बरं गुन्हासुद्धा साधासुधा नाही तर चक्क खूनाचा आरोप होता तिच्यावर; तो ही एका नामांकित पोलिस इंस्पेक्टरचा खून तो ही त्याच्याच सर्विस रिव्हॉल्वरने केल्याचा.... ॲडव्होकेट रमा जेव्हा सुनावणीसाठी कोर्टात पोचल्या तेव्हा सगळ्यानीच त्यांना घेराव घातला. पण त्यांच्या असिस्टंटने संध्याकाळच्या पत्रकार परिषदेच्या आयोजनाबद्दल सांगून सगळ्यांना शांत केले.
ॲड्व्होकेट रमाच्या प्रेस कॉन्फरन्सला प्रचंड गर्दी झाली होती. ॲडव्होकेट रमाने सगळ्याना धन्यवाद देउन बोलायला सुरुवात केली-
"मला माहिती आहे तुम्हांला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की एका गुन्हेगाराची केस मी का घेतली. मी सगळं सविस्तर सांगते; पण त्या आधी सगळ्यांना विनंती आहे की माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय कोणीही मध्ये काहीही विचारणार नाही तसं झाल्यास ही प्रेस कॉन्फरंस मी तिथेच थांबवेन. माझं बोलणं पूर्ण झाल्यावर तुमचे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देइन हा माझा शब्द आहे. ॲडव्होकेट रमाची हुशारी, बोलण्याची पद्धत, एकूणच तिचं व्यकिमत्व इतकं प्रभावी होतं की तिच्याविषयी समोरच्याच्या मनात चटकन आदर निर्माण होत असे. जमलेल्या पत्रकारांनी तिचं म्हणणं अगदी सहज मान्य केलं आणि मग रमाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. -
"हो हे खरं आहे की माझी अशील मिस निकिता हिने खून केला आहे पण ज्या परिस्थितीमध्ये हा खून झाला ते बघता तिने जे केलं ते योग्यच असं म्हणावं लागेल. मी जेव्हा तिला भेटले तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती पण जे झालय त्याचा तिला जराही पश्चात्ताप होत नव्हता. निकिता एक साधी सरळ सुंदर मुलगी. पण या सौंदर्यानेच तिचा घात केला. लग्नाच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेली निकिता पुन्हा घरी गेलीच नाही. कसं ते तिला आठवत नाही पण तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती एका अंधाऱ्या खोलीत होती. सुरवातीला खूपच गोंधळली तिला काहीच समजत नव्हतं. पण जेव्हा पूर्ण शुद्ध आली तेव्हा तेव्हा तिच्या लक्षात आलं आपण एकस रेड लाईट एरियामध्ये आहोत. ती खूप रडली तिथून बाहेर पडण्यासाठी तिने खूप विनवण्या केल्या पण कोण तिला तिथून बाहेर जायला देणार होतं. त्यानंतर सुरु झाला तिला वेश्या बनवण्याचा खेळ. तिला समजावून, मारहाण करुन, उपासमार करुन कुठूनही तिला वेश्या होण्यासाठी तयार करायचं होतं त्या लोकांना. निकिताने मात्र या सगळ्या प्रसंगाला हिमतीने तोंड दिले ती डगमगली नाही. सगळ सहन केला. अखेर ती बधत नाही म्हटल्यावर जबरदस्तीने तिच्या खोलीत गिऱ्हाईके पाठवण्यात आली पण तिने मात्र स्वतःच्या हुशारीने त्यांनाही पळवून लावलं. मग मात्र तिचे अधिकच हाल सुरु झाले. अखेर तिथल्या चहावाल्या मुलाच्या मदतीने ती कशीबशी तिथून बाहेर पडली आणि तिने तडक पोलिस स्टेशन गाठलं. तिथे गेल्यावर तिथल्या इंस्पेक्टरना सगळी हकीगत सांगितली आणि घरी सोडायची विनंती केली. हे सगळं ऐकून इंस्पेक्टरनी क्षणाचाही विलंब न करता एक हवालदार सोबत घेतला आणि तिला घरी सोडायला निघाले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांची गाडी तिच्या घराच्या नाही तर रेड लाईट एरियाच्या दिशेने धावत होती. 'त्या' एरियाच्या आसपास आल्यावर निकिताच्या लक्षात आलं की पुन्हा आपण त्याच भागात आलोय जिथून आपण आपली सुटका करुन घेतली होती. तिला प्रचंड मोठा धक्का बसला. या धक्क्यातून ती सावरायच्या आत ती पुन्हा त्या अंधाऱ्या कोठडीत जाऊन पडली होती. प्रचंड संताप, दु:ख , हतबलता या सगळ्या भावना एकाच वेळी तिच्या मनात दाटून आल्या. ती स्वतःला सावरतेय न सावरतेय तोवर तिच्या कानावर शब्द पडले, 'काय नवीन मुलगी आणलीत ती पण एकदम हॉट आणि मला खबर पण नाही?'
'नाही साहेब पोरगी तयारच होइना काय करणार?' अजून एक आवाज
' मी करतो ना तयार कशी तयार होत नाही बघूयात... तू फक्त माझा ब्रॅन्ड घेउन ये कारण थोडी प्यायल्याशिवाय मजा नाही.... ... यानंतर छद्मी हास्याचे आवाज आले.
यानंतर मात्र निकिताने स्वतःला सावरलं आणि आलेल्या परिस्थितीला कसंही करुन तोंड द्यायचं आणि आपल्या शिलाचं रक्षण आपणच करायचं हा निश्चय करुन ती प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला तयार झाली.
थोड्यावेळाने इंस्पेक्टर जेव्हा खोलीमध्ये आले तेव्हा निकिताने त्यांच्याशी चक्क गोड बोलायला सुरुवात केली. आधीच प्यायलेल्या त्याच्यासाठी हा एक सुखद धक्का होता. निकिताने हुशारीने त्याला अजून दारु पाजली. आणि वासनेने बरबटलेली नजर घेउन जेव्हा तो नशेतच तिच्याजवळ गेला तेव्हा तिला त्या नजरेचा अक्षरशः किळस वाटला आणि त्याचा प्रचंड संताप आला. तिच्याकडे लाळघोट्या नजरेने बघत इंस्पेक्टरने आपलं सर्विस रिव्हॉल्वर बाजूच्या टेबलावर ठेवलं आणि शर्टाची बटणं काढायला सुरुवात केली. निकिता सावध झाली तिने क्षणाचाही विलंब न करता ती रिव्हॉल्वर उचलली आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या गोळ्यांचा आवाज ऐकून सगळे त्या खोलीकडे धावले पण निकिताने समोर रिव्हॉल्वर रोखून ठेवले. त्या क्षणी तिच्यात रणरागिणी संचारली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले इंस्पेक्टर आणि हातात रिव्हॉल्वर धरुन उभी असलेली निकिता हे बघून सगळेच भांबावले. कोणीतरी पोलिस स्टेशनला फोन केला आणि मग पुढचं काय ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. आणि हे इंस्पेक्टर म्हणजे इंस्पेक्टर विजय पाटील. जनतेचा रक्षकच जेव्हा असं वागला तेव्हा काय करायला हवं होतं निकिताने? मला कुठलेही प्रश्न विचारण्यापूर्वी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, काय चुकलं निकिताचं?
ॲडव्होकेट रमाचं बोलणं ऐकून सगळे सुन्न झाले होते. काही जुजबी प्रश्नोत्तरे झाल्यावर पत्रकार परिषद संपली. या पत्रकार परिषदेचा रमाला अपेक्षित परिणाम दिसला. सगळ्या न्यूज चॅनेल्स आणि पेपर्सनी निकिताची बाजू उचलून धरली. मिडियाला फक्त ब्रेकिंग न्यूजमध्ये इंटरेस्ट असतो. त्यात कोणाच्या दु:खाचं भांडवल करायला मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी 'सोनेपे सुहागाच' आणि हे रमाला चांगलच माहिती होतं म्हणूनच तिने मिडियाच्या या मानसिकतेचा उपयोग आपल्या केससाठी करायचं ठरवूनच पत्रकार परिषद आयोजित केली होती. या सगळ्याचा अपेक्षित तो परिणाम झाला आणि ही केस लवकरात लवकर संपवण्याचे आदेश कोर्टाला देण्यात आले. इंस्पेक्टर आकाशनेही भरपूर प्रयत्न करुन इंस्पेक्टर विजय पाटील यांच्याविरुद्धचे काही महत्वाचे पुरावे गोळा केले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अवघ्या सात महिन्यात ही केस संपली आणि स्वतःच्या शिलाचं रक्षण करणे आणि सेल्फ डिफेंस या कारणांमुळे निकिताला निर्दोष सिद्ध करण्यात रमा यशस्वी झाली. निकिता या प्रकरणातून निर्दोष सुटली पण पुढे तिच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे हे तिचं तिलाच माहिती नव्हतं.
आयुष्यातले भयाण आठ महिने विसरणं निकिताला सहज शक्य नव्हतं. झाल्या प्रकाराचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पण यापेक्षाही सगळ्यात मोठा धक्का तिला कुठला बसला असेल तो आदीच्या लग्नाचा. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी आदित्यचं लग्न झालं पण त्याच्या वधूच्या जागी निकिता नव्हती. ती दुसरीच कोणीतरी होती. निकिताबद्दलचा प्रकार आदीच्या घरी कळल्यावर त्यांनी लगेच लग्न मोडलं, "अशी रेड लाईट एरियात महिनाभर राहिलेली खूनी मुलगी पेंढारकर घराण्याची सून होणं शक्य नाही" अशा स्पष्ट शब्दात त्यांनी नकार कळवला होता. मनाविरुद्ध का होइना पण आदीने लग्न केलं याचा तिला प्रचंड धक्का बसला होता.
सुरुवातीला प्रेस, मीडिया यांच्या मुलाखतींमूळे गोंधळून गेली होती. त्यात सगळ्यांसमोर आलेलं तिचं आणि आदित्यचं नातं. पेंढारकर घराण्याच्या हितशत्रूनी निकिताला त्यांच्याविरुद्ध वापरायचा केलेला प्रयत्न, या साऱ्यामूळे ती हतबल झाली होती. तिच्या मनात आलं, 'काय साध्य केलं आपण निर्दोष मुक्त होऊन? हे एकाकी आयुष्य? का समाजाच्या दुषित, संशयास्पद नजरा? घराबाहेर जाणं तिला नकोसं वाटत होतं. घरात खिडकीजवळ शांत बसून एकटक खिडकीबाहेर बघण्यातच तिचा दिवस जात असे. तिची अवस्था बघून तिच्या आई वडिलांचा जीव तुटत असे. निदान वेगळ्या वातावरणात हळूहळू का होइना पण साऱ्या दु:खातून बाहेर येइल असा विचार करुन अखेर त्यांनी आपल्या गावी परत जायचा निर्णय घेतला. पण निकिताच्या बाबांची बदली इतक्या लवकर होणं शक्य नव्हतं म्हणून मग त्यांनी इथेच राहून निकिता आणि तिची आई गावाला जातील असं ठरलं.
मे महिना संपत आला होता. घरात सामानाची बांधाबांध चालू होती. निकिता शांतपणे खिडकीत बसून बाहेर बघत बसली होती. दुपार टळून हळूहळू संध्याकाळ सुरु होत होती. बाहेर ढग दाटून आले होते. कोणत्याही क्षणी पाऊस येइल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक निकिताच्या मनात काय आलं कुणास ठाऊक ती चटकन उठली आणि आवरून तयार होऊन आईला म्हणाली, "आई मी जरा जाऊन येते."
" अगं आत्ता कुठे निघालीस? बाहेर बघ किती अंधारुन आलय. कोणत्याही क्षणी पाऊस सुरु होइल. आई काळजीने म्हणाली.
"अगं जिच्या आयुष्यातच अंधार झालाय तिला या अंधाराची कसली भीती? आणि पावसाचं म्हणशील तर तो माझ्या डोळ्यातून नेहमीच बरसत असतो. जाऊदे मला" , असं म्हणून निकिता घराबाहेर पडली आणि सरळ टेकडीवर गेली.
ती टेकडीवर गेली तेव्हा मुसळधार पाऊस सुरु झाला होता. तिला आठवलं, "याच पावसात गेल्या वर्षी आदीने तिला प्रपोज केलं होतं .... त्याच्या हळुवार स्पर्षाने मन मोहरलं होतं त्याच्या मिठीत जेव्हा स्वतःला झोकून दिलं तेव्हा आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण जगले होते...... आणि आज फक्त एकाच वर्षात सगळं संपल? जर असच घडायचं होतं तर मला आणि आदीला एकत्रच का आणलस देवा? तिचं मन आक्रोश करत होतं. ती हतबल होवून कितीतरी वेळ तशीच पावसात बसून रडत होती.
"निकिता, निकिता ......" तिला कोणाची तरी हाक ऐकू आली आणि ती भानावर आली. तिने मागे वळून पाहिल तर इंस्पेक्टर आकाश तिला हाका मारत तिच्या दिशेने येत होता. तिला आश्चर्य वाटलं.
"अगं वेडी आहेस का तू? अशा पावसात या निर्जन टेकडीवर एकटी आलीस? तुला भीती नाही वाटली ?" आकाशने विचारले.
" रेड लाईट एरियात महिनाभर कैदेत राहिलेल्या, हालअपेष्टा सोसलेल्या खूनी मुलीला कसली आलेय भीती? उलट आज खूप दिवसांनी मोकळं झाल्यासारख वाटतय इथे येउन. पण तुम्ही इथे कसे? " – निकिता.
"तुम्ही हे शहर सोडून निघाल्याचं कळलं म्हणून मुद्दाम तुला भेटायला तुझ्या घरी गेलो होतो. खूप महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. पण घरी गेल्यावर कळलं तू बाहेर गेली आहेस. तोपर्यंत पाऊस सुरु झाला होता मग मी अंदाज केला तू इथेच आली असशील." – आकाश.
"पण मी इथेच असेन हे कसं कळलं तुम्हाला?" – निकिता
"तुझ्या डायरीमूळे", असं म्हणून आकाशने हातातल्या प्लस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली डायरी तिच्यासमोर धरली.
"ही डायरी तुमच्याकडे कशी आली?" - निकिता.
"तू हरवल्यानंतर तुझ्या घरच्यांनी पोलिस कंप्लेंट केली होती. त्यावेळी केसचा भाग म्हणून ही डायरी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. पुढे तुला अटक झाल्यानंतर ही डायरी माझ्याकडे आली. माफ कर पण ही डायरी मी पूर्ण वाचली. तपासाचा एक भाग म्हणूनही आणि तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणूनही." – आकाश.
"माफी कसली मागता तुम्ही. तुम्ही खूप केलय माझ्यासाठी. तुमच्या उपकाराची परतफेड कशी करु तेच कळत नाहीये मला." – निकिता
"परतफेड करायची आहे ना मग एक काम कर माझ्यासाठी. या डायरीमध्ये मी एक फॉर्म ठेवलाय तो भरुन दे मला." -आकाश
"कसला फॉर्म ?" – निकिताने विचारलं
"L. LB च्या सेकंड इअरच्या ॲडमिशनचा फॉर्म. तू हुशार आहेस. आल्या प्रसंगाला खूप मोठ्या हिम्मतीने तोंड दिलस. तू जे केलस ते प्रत्येकाला जमतच असं नाही रादर क्वचितच कोणाला जमत असेल. पण तरिही या एका प्रसंगाने इतकी खचून गेलीस की आपली स्वप्न, आपलं आयुष्यच विसरुन गेलीस? आदित्य पेंढारकर तुझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा होता मान्य पण त्याने स्वतःच वेगळं आयुष्य सुरु केलं आहे. ज्याने तुझी साथ सोडली त्याच्यासाठी तू का दु:खी होत आहेस. त्याच्यापुढे तुला तुझ्या आई बाबांच दु:ख, त्यांच प्रेम, इतकच काय तर तुझी स्वतःची स्वप्नं या साऱ्याची काहीच किम्मत उरली नाही का? बघ विचार कर आणि तुझं तुच काय ते ठरव. झालं गेलं विसरुन जा असं मी म्हणणार नाही कारण मला माहिती आहे ते सोपं नाही. पण निदान आयुष्यात पुढे जायचा तरी प्रयत्न कर." – आकाश.
आकशचं बोलणं ऐकून निकिताला रडू कोसळल. तिला असं रडताना बघून काय करावं ते आकाशला सुचेना. आपण उगाच समजवायला गेलो तिला असं त्याला वाटू लागलं. "माझ्यामुळे तू दुखावली गेली असशील तर मला माफ कर पण विश्वास ठेव माझ्यावर माझा उद्देश फक्त तुला तुझ्या दु:खातून बाहेर काढणं हाच होता." , आकाश तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला.
"नाही तसं नाही तुमचं काहीच चुकलं नाही. उलट तुमच्यामुळे आज मी भानावर आलेय. माझ्या दु:खातून बाहेर पडायला वेळ लागेल मला, पण निदान यातून बाहेर पडायला हवं याची जाणीव झालेय मला आज." – निकिता
"लवकरच तू तुझ्या दु:खातूनही बाहेर पडशील. मी मदत करेन तुला यातून बाहेर पडायला." – आकाश.
"तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही." -निकिता
"आभार मानायचेच आहेत तर एक कर. हे अहो जाओ न म्हणता अरे आकाश म्हण. फ्रेंड्स?" असं म्हणून आकाशने तिच्यासमोर मैत्रीसाठी हात पुढे केला.
निकिताही आता जरा सावरली होती. मंद हसून तिनेही त्याच्याशी हात मिळवला. तिला आठवलं आज कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं होतं.
हे नवीन नातं निकिताला आयुष्यातल्या कुठल्या वळणावर घेऊन जाणार होतं; हे मात्र कोणालाच माहिती नव्हतं.
आकाश आणि निकिता टेकडीवरुन निघाली. आकाशने निकिताला घरी सोडलं. घरी गेल्यावर निकिताने आपला निर्णय आई बाबांना सांगितला. दोघांनीही इनस्पेक्टर आकाशचे आभार मानले. कितीतरी दिवसांनी त्यांना त्यांची आत्मविश्वासी मुलगी परत मिळाली होती.
निकिताची सेकंड इअरची ॲडमिशन प्रोसिजर रमा आणि आकाशच्या मदतीने पार पडली. निकिताने मुद्दामहून मॉर्निंग बॅचसाठी ॲडमिशन घेतली आणि कॉलेज संपल्यानंतर ती ॲडव्हॉकेट रमाच्या ऑफिसमध्ये जॉब करु लागली. निकिताचा पूर्ण दिवस आता बिझी जाऊ लागला. कॉलेज, अभ्यास आणि ऑफिसचं काम यात स्वतःला गुंतवून घेतल्यामुळे निकिता हळूहळू आपल्या दु:खातून सावरत होती. आकाशबरोबरच्या अधूनमधून होणाऱ्या भेटिंमूळे तिच्या चेहऱ्यावरचं हरवलेल हसू परत येत होतं. खूप सुंदर मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं दोघांमध्ये. कुठलीही गोष्ट आकाशला सांगितल्याशिवाय निकिताला चैन पडत नसे. आणि आकाशची तर शॉपिंग पासून सेलिब्रेशनपर्यंत प्रत्येक गोष्ट निकितासोबतच होत असे. या दोघांमध्ये मैत्री पलीकडे जाऊन काहीतरी नवीन नातं निर्माण झाल्याची जाणीव ॲड्व्होकेट रमाला झाली होती. पण आकाश आणि निकिता मात्र या बाबतीत अनभिज्ञ होती. सुरुवातीला रमाने विचार केला, त्यांचं त्यांना कळतय का ते बघावं. काही वेळा तिने आडून आडून सुचवण्याचाही प्रयत्नही केला. पण दोघांनीही समजून न समजल्यासारखं केलं.
बघता बघता निकिताचं L.LB कंप्लिट झालं. परिक्षा संपल्यानंतर निकिता ॲडव्होकेट रमाच्या ऑफिसला पूर्णवेळ जाऊ लागली. यथावकाश रिझल्ट लागला. निकिता फर्स्ट क्लास मिळवून पास झाली होती. असच अजून एक वर्ष सरलं. निकिता हळूहळू इंडिपेंडंट केसेस हॅन्डल करायला लागली होती. तिची हुशारी आणि कामाप्रतीची निष्ठा पाहून ॲडव्होकेट रमा तिच्यावर खूश होती.
सरणाऱ्या काळाबरोबर निकिता आणि आकाशची मैत्रीही बहरत होती. रमाने त्या दिवशी आडून न बोलता दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे विचारलं इतकच नव्हे तर पुढे विचार करण्याबद्दलही सुचवलं. निकिता आणि आकाशने कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरवलं. त्या दिवशी कितीतरी दिवसांनी ती आणि आकाश निवांतपणे कॉफी शॉपमध्ये भेटत होते. थोडं जुजबी बोलणं झाल्यावर आकाश म्हणाला, "निकिता आता आपण आपल्या रिलेशनशिपबद्दल सिरियसली विचार करायला हवा”
म्हणजे? नक्की काय म्हणायचं आहे आकाश तुला ? – निकिता.
"आपल्यामध्ये खरच फक्त मैत्री आहे का त्याच्या पुढे जाऊन अजूनही काही आहे हेच कळत नाहीये मला. तुला काय वाटतं निकिता?" आकाश.
"खरं सांगू आकाश मी या साऱ्याच्या पलीकडे गेलेय. माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यातून मी अजूनही पूर्णपणे सावरु शकलेले नाहीये. अजूनही कधीकधी त्या रेड लाईट एरियामध्ये काढलेले भयाण दिवस आठवून रात्री दचकून जाग येते. आदित्यचं लग्न झाल्याचं कळलं तेव्हा तर मी कोलमडून गेले होते. कितीही झालं तरी आदित्य माझं पहिलं प्रेम आहे. त्याला असं सहजासहजी विसरणं शक्य नाही. त्यात माझा भूतकाळ असा असताना तुझ्या घरातून या नात्याला कितपत परवानगी मिळेल मला नाही माहिती."- निकिता.
"प्रश्न तुझ्या भूतकाळाचा नाही निकिता आपल्या नात्याचा आहे. जर आपलं नातं क्लिअर असेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाहीत. पण मलाच काही कळत नाहीये. मी खरच खूप गोंधळून गेलोय ग." आकाश.
"आकाश, मला नाही सांगता येणार पण माझ्यादृष्टिने आपलं मैत्रीचं नातं जास्त महत्वाचं आहे."- निकिता.
"मैत्री तर नेहमीच राहील निकिता. कारण हे नातं सगळ्यात आधी आहे. पण आपल हे नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे का नाही ते शोधायचं आहे आपल्याला."
"आकाश आपण पहिल्या पावसात टेकडीवर जाऊया? कदाचित तिथे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जिथून आपली मैत्री सुरु झाली तिथेच आपण आपल्या नात्याचाही शोध घेऊया, तोपर्यंत आपण जरा थांबूया, चालेल?"- निकिता.
आकाशला निकिताचं म्हणणं पटलं. पहिल्या पावसात काहीही झालं तरी टेकडीवर जायचं असं ठरवून दोघं एकमेकांच्या घरी निघून गेली.
मे महिना संपून जूनचा पहिला आठवडा सरला तरी पावसाची काहीच चिन्ह दिसत नव्हती. निकिता आणि आकाश पहिल्या पावसाची आतुरतेने वाट बघत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली. त्या दिवशी सकाळपासूनच ढगांचा खेळ सुरु झाला होता. दुपारपर्यंत पाऊस नक्की येणार असा अंदाज होता. साधारण सकाळचे ११ वाजले होते. निकिता ऑफिसमध्ये बसून महत्वाच्या केसचा अभ्यास करत होती. सहज तिची नहर खिडकीबाहेर गेली. तिने बघितलं बाहेर चांगलच अंधारुन आलं होतं. 'म्हणजे आज पाऊस येणार तर' , नकळत तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. आकाशला फोन करावा का? या विचारात असतानाच तिचा फोन वाजला. तिने बघितलं फोन आकाशचा होता. तिने तो चटकन रिसिव्ह्ड केला पण ती काही बोलणार इतक्यात पलिकडून आवाज आला, "मॅडम मी इंस्पेक्टर राघव बोलतोय आकाश सरांचा खूप मोठा अपघात झालाय.त्यांना सिटी हॉस्पिटलला ॲडमिट केलय. कंडिशन खूपच क्रिटीकल आहे. रमा मॅडमचा फोन लागत नव्हता म्हणून तुम्हाला फोन केला. रमा मॅडमना फोन देता का प्लीज?" फोनवरचं बोलणं ऐकून निकिता सुन्न झाली. काय बोलावं तिला काहीच सुचत नव्हतं. "हॅलो , हॅलो निकिता मॅडम ऐकताय ना?" पलिकडचा आवाज ऐकून निकिता भानावर आली. " अं ....हो..... रमा मॅडम एका केसच्या कामासाठी शहराबाहेर गेल्यात ... मी पोचते थोड्याच वेळात. असं म्हणून निकिताने फोन कट केला आणि ती हॉस्पिटलमध्ये जायला निघाली.
निकिता हॉस्पिटलमध्ये पोचली तेव्हा सगळं संपलं होतं. आकाश हे जग सोडून निघून गेला होता. बाहेर जमा झालेले काळे ढग विरुन निकिताच्या डोळ्यात जमा झाले. आकाशचा निष्प्राण देह बघून तिच्या डोळ्यात जमा झालेले ढग बरसायचच विसरुन गेले.
****
मुसळधार पाऊस बरसत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या निर्जन निवांत टेकडीवर निकिता एकटीच बसून होती. आत्ता या क्षणाला निकिताच्या डोळ्यातून बरसणारा पाऊस बाहेरच्या पावसाशी जणू स्पर्धाच करत होता. तिला आठवत होतं; अगदी याच ठिकाणी अशाच मुसळधार पडणाऱ्या पावसात ती आणि आदित्य या टेकडीवर आले होते. याच ठिकाणी तिला उमलत्या वयातील प्रेमाचा खरा अर्थ कळला होता. इथे याच ठिकाणी तिला आकाश भेटला होता. एका सुंदर मैत्रीच्या नात्याची सुरवात इथूनच झाली होती. इथे येउनच ती आणि आकाश त्यांचं खरं नातं जाणून घेणार होते. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. "अजून किती भोग भोगायचे? किती दु:ख सोसायची. प्रत्येकवेळी एका सुंदर नात्याची सुरवात होते पण ते नातं मात्र आयुष्यभरासाठी पुरत नाही, का? मी काय करु जगून? काय अर्थ आहे या जगण्याला? बास कंटाळा आलाय सगळ्याचा आता." निकिताच्या मनात उठलेलं वादळ शांत होत नसतं. इथेच आयुष्य संपवावं आता असा विचार करुन निकिता तिथून उठून जायला निघणार तोच तिचा फोन वाजतो, " हॅलो, निकिता मॅडम, मी इंस्पेक्टर राघव बोलतोय.... मॅडम एका स्त्री ने आपल्याच पतीचा खून केलाय..... आम्ही तिला अरेस्ट केलय ..... पण अरेस्ट केल्यापासून ती फक्त गप्प आहे. असं वाटतय काहीतरी गडबड आहे..... तिच्याकडे बघून ती खूनी वाटत नाही उलट तिची निष्पाप नजर खूप काही सांगतेय...... मी रमा मॅडमना फोन केला होता पण त्या शहराबाहेर आहेत, त्यांनी तुम्हाला बोलवून घ्यायला सांगितल आहे”. " ओके , येते मी तासाभरात", असं म्हणून निकिताने फोन ठेवला. ती स्वतःशीच हसली. आज या टेकडीने पुन्हा तिला जगण्याचा एक नवा मार्ग दाखवला होता. तिने आजूबाजूला बघितलं तर तिथे तुरळक गर्दी दिसली. ही निर्जन टेकडी आता निर्जन राहिली नव्हती.ती ही आता बदलून गेली होती; निकिताच्या आयुष्यासारखी !
समाप्त.
©मानसी जोशी

Wowww.... Great... खरं तर सुरवातीचा भाग वाचला होता तेव्हाच आवडली होती आज संपूर्ण वाचली .. खरंच मस्त जमलीये...
ReplyDeleteखूप छान... प्रत्येक भागात excitement भरलेली आहे..
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteChaan katha lihili aahe
ReplyDeleteछान लिहीतेस, please send me blog link everytime you post on FM messenger. Thanks in advance :)
ReplyDelete