Friday, 3 February 2017

कथा - मोगराफुलला

मोगराफुलला
ती तशी जरा अबोलच. दिसायला फारशी सुंदर वगैरे नव्हती पण लांबसडक केस आणि काळेभोर भावूक डोळे यामूळे अगदी आकर्षक दिसायची. त्याने तिला पहिल्यांदा बघितल ते एका नातेवाईकांच्या लग्नात. तिच्या भावूक डोळ्यांनी आणि लांबसडक रेशमी केसांनी त्याच्या हृदयाचा ठाव घेतला. त्याला ती फारच आवडली. मग काय पत्रिका जुळणे, दोन्हीकडची पसंती, मानापमान, मुहूर्त हे सारे सोपस्कार पार पाडले गेले आणि ती त्याची सौ. झाली. त्याला अबोलीची फुलं आणि त्या फुलांचा गजरा खूप आवडातो हे लग्नाआधी झालेल्या एकमेव ओझरत्या भेटीतच त्याने तिला सांगितलेले असल्यामूळेच की काय लग्नानंतर ती तिच्या लांबसडक केसात नेहमी अबोलीच्या फुलांचा गजरा माळायची.
      दुसऱ्याच मन जपणं हा तिचा मूळ स्वभाव तर आपल्याच धुंदीत जगणारा असा तो. दोघंही एकदम वेगवेगळ्या स्वभावाची. बघता बघता लग्नाला महिना उलटून गेला. दोघं एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. तरीही काहीसा नवखेपणा असतोच. तिच्या अबोल स्वभावामूळे तिला त्याच्यावर असणारं तिचं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करता येत नव्हतं. तर स्वतःच्याच विश्वात वावरणाऱ्या त्याला प्रेम व्यक्त करण्याची गरज आहे हे सुद्धा कळत नव्हतं.
       तो दिवस तिच्यासाठी तसा खासच होता. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस!
   तो तिला म्हणाला, "आज संध्याकाळी तयार रहा आपण तुझ्यासाठी साडी घ्यायला जाऊया."
    संध्याकाळी खास त्याला आवडतो म्हणून केसात अबोलीचा गजरा माळून ती तयार होते. तो ही ऑफिसमधून निघतो. त्याची ठरलेली बस त्याला मिळते पण, वाटेत झालेल्या मोठया अपघातामुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममध्ये तो अडकतो. तो मनातून खूप वैतागतो पण गप्प बसण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो.
    इकडे ती त्याची वाट बघत होती. घडाळ्याच्या पुढे सरकणाऱ्या काट्याबरोबर क्षणाक्षणाला तिचे मन उदास होत होतं. अखेर संध्याकाळ टळून अंधार सुरु होतो. 'नव्या नवरीने रात्रीच्या वेळी मुद्दाम बाहेर पडू नये' या नियमानुसार आता आपल जाण कॅन्सल होणार हे तिला कळून चुकतं.
      तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळून जातो. अखेर जेवणाच्या वेळेला तो येतो. तिच्या नाराजीची पूर्ण कल्पना असल्याने आपल्या उशीर होण्याच कारण तो मुद्दामच घरात सगळ्यांसमोर सांगून तिची माफी मागतो. ती  'ठिक आहे' अस म्हणून वेळ सावरून नेते.  सगळ्यांच मन जपणाऱ्या तिचं मन मात्र त्या दिवशी नकळत का होईना पण दुखावलेलं असतं.
    घरातली सगळी कामे आवरून ती बेडरुममध्ये जाते तेव्हा तो तिची वाटच बघत असतो. ती काहीही न बोलता केसात माळलेला अबोलीचा गजरा काढून ठेवते. नेमकं त्याच वेळी येऊन तो तिच्या केसांमध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळतो. मोगऱ्याच्या सुगंधाने तिचा रुसवा कुठल्या कुठे पळून जातो.  ती आश्चर्याने त्याला विचारते, "तुम्हाला तर मोगऱ्याच्या फुलांचा वास अजिबात आवडत नाही, मग तुम्ही आज मोगऱ्याच्या फुलांचा गजरा कसा काय आणलात?" 
"कारण तुला आवडतो ना म्हणून", तो.
"पण हे तुम्हाला कस कळलं?" ती.
"सांगेन, पण जर का आजच्या उशीराबद्दल मला माफ केलंस तरच!"
ती लाजून म्हणते, "ठिक आहे केलं माफ, आता तरी सांगा."
     अग आज ऑफिसमधून तुझ्या घरी फोन केला होता तुला कुठल्या रंगाची साडी आवडेल ते विचारण्यासाठी. कारण तुझ्या स्वभावानुसार तू काही तुझी आवड मोकळेपणाने सांगणार नाहीस. फोनवर तुझ्या आईने सांगितलं, "एकवेळ तिला साडी कुठल्याही रंगाची घेतलीत तरी चालेल पण मोगऱ्याचा गजरा मात्र आवर्जून घ्या. कारण तिला मोगऱ्याची फुले फार आवडतात. पण तुम्ही तिला पहिल्याच भेटीत सांगितल होतत की तुम्हाला मोगरा आवडत नाही म्हणून मग तिने लग्नातही हट्टाने अबोलीच्या फुलांचाच गजरा माळला."
   नेमका आज उशीर झाला. त्यामुळे साडी खरेदी तर राहूनच गेली, पण आधीच्या स्टॉपवर उतरुन आठवणीने तुझ्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घेतला."
    ती लाजून त्याच्या मिठीत शिरते आणि खऱ्या अर्थाने एक अबोल प्रीत बहरते.
        आज लग्नाला २५ वर्षे झाल्यावरही तो तिच्या वाढदिवसाला तिच्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणतो आणि आजही ती त्याच्यासाठी अबोलीच्या फुलांचा गजरा माळते.

©मानसी जोशी



2 comments:

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...